ब्लॉग संग्रहण

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

मला कधीकधी बरं वाटतं.

एका पोरगीबरोबर बोलत होतो, दोनचार महिने भारीपैकी. ती माझ्या लांबच्या मामाच्या मुलीची मैत्रीण होती. म्हणजे त्या मुलीचं ह्या आमच्या मामाच्या घरी येणं जाणं होतं. मामा मम्मीपेक्षा मोठ्ठा तरीपण आक्का म्हणतो. एकदा तो मला भेटला आणि म्हणटला काय आमची पोरगी कशी आहे ? 
मी हादरलो, भेदरलो, डोस्कं गच्च झालं. तरीपण नाटकीपणाच आव आणत कोण पोरगी ? म्हणटलं. तो म्हणटला आमची आक्का रे ! 
मग बरं वाटलं. नाहितर त्या मामाचं टक्कल संध्याकाळच्या सात वाजता पण आग वकणारं सुर्य वाटत होतं.
.............................................
एक मैत्रिण माझ्यापेक्षा वयानं एकवर्ष मोठ्ठी आहे. तिचा वाटसप नंबर गावला. म्हणजे तिच मला मेसेज केली. मग मी पण सुट्टी द्यायची नहो म्हणटलो आणि रात्री बारा काय पहाटं एक काय मोबाईलात चार्जिंग संपतंय म्हणून झोपायच्या ठिकाणी स्विच बोर्डच तयार करून चॅटींग करू लागलो. महिनादोनमहिना गेल्यावर चारपाचदा भेटल्याबोलल्यावर एकदिवस चांगल चार स्क्रिनशाॅट भरतील एवढा मेसेज उर्फ प्रेमपत्र टायीप केलो. अर्धा तास वाचली आणि रिप्लाय दिली नरद्या बेक्कारा !म्हणटली. मग मी तिच्याबरोबर बोलायचंच बंद केलो. त्याच दिवशी संध्याकाळी तिचा मोठ्ठा भाऊ आणि बाबा एकदम दिसले. मी बिनबोलता सटकायच्या बेतात होतो तेवढ्यात त्या भावानं जोरात बोलवलं श्रेण्या !
बोंबलंल म्हणटल हि दोघं मिळून निरमा लावत्यात असं वाटलं. तर तिचा भाऊ म्हणटला आमची एक म्हस द्यायची हाय कुणाला लागली तर सांग. मी थरथरत म्हणटल सांगतो नही गिराईकच घिवून येतो. मग धडधड बंद झाली आणि आतल्याआत दिल डान्स मारे झालं.
................................................
एकदा कोल्हापूरला एका जवळच्या मैत्रीणीबरोबर विद्यापिठात गेलतो. असंच हिंडायला. जाताना रेल्वेन गेलो. येताना यष्टीनं. ईचलकरंजीतन थेट जायच्या वाटणीच व्हाया यष्टीनं जयसिंगपूरला जायची दूर्बुद्धी सूचली. माझ्या गावावरून यष्टी जाणार होती. साहजिकच गावातली कोणतर असणार बघणार आणि गावभर हुणार मग गावातन घरापर्यंत कळणार ही भिती मनात होती. म्हणून मी म्हणटलं तु आधी जाऊन बस मग नंतरनं मी येतो. ती म्हणटली तु गंडवतोस मला या बसमध्ये बसवून तु दूसर्या गाडीतन जाशील. मग तीनं माझ मोबाईल ओलीस ठेवून घेतला. आणि वर गेली यष्टीत. तेवढ्यात गावातलं एकटं बी आलंच म्हणटलं गावाकडं जात्या काय ? मी म्हणटलो नही जात अजून अर्ध्या तासानं. मग ते गेलं. कोण नही ते बघून पद्धतशीर डायवर यायच्या टायमाला गेलो तर ही शेवटच्या काॅर्नर शिटाला. गाडी पाचशे मीटर गेली नशील तेवढ्यात स्टाप आला. जूनी वर्गमैत्रीण तिच्या पोराला अधिक जाउबाईला घेवून आली ते थेट शेवटच्या शिटवर. मग मी तिच्या पोरग्याला घेवून उगचच नको नको त्या गोष्टी तळमळीन विचारलो. तेवढ्यात मास्तर अवतरला. हिकडं डावानं तिकीट काढलं आणि वरनं उपकारार्थ मी काढलंय म्हणून सांगितलं. एवढ्या उशीर गंडवलेल्यावर पाणी गेलं. खरं काय ते तिनं ओळखलं. त्यानंतर एकदा सगळे एकत्र भेटणार होते त्यावेळी ती वर्गमैत्रीण आलीती ती कुठतर बोंबलून व्यक्त व्हायची चारचौघात या विचारानं मी घाबरलो होतो. नंतर तासाभरानं तीच म्हणटली मी काय कुणाला सांगितलं नाही. मी म्हणटलं सांगू पण नकोस.
...........................................
सतराशे साठ गोष्टी केल्या की बोंबाबोंब होते. पुढचा माणूस कसा येतो काहीच कळत नाही. आज परत एकट्यानं विचारलं काय म्हणत्या ?
कोण ?
तब्येत ओ.
मी म्हणटलं मला कधीकधी बरं वाटतं.

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

सातवी शिकलेला माझा एक मित्र. बर्यापैकि उद्योगपति झाला. काल तो आणि मी त्याच्या आॅफिससाठी लागणार्या वस्तुंची खरेदी करायला गेलो होतो. जोरात बोलनं, बुडाखाली बुलेट, चांगल्या चांगल्या गाण्याची पार वाट लावून टाकावं असं गाण जोरात म्हणंनं. ही त्याची काहि वैशिष्ट्ये. दुकानाचं बीलं झालं 330 रूपये ह्या गड्यानं त्याला अडीचशेच दिले. तोंड वेडवाकडं करत त्यानं ती रक्कम स्विकारली, कारण ही तसंच त्याचं गोडं बोलनं. (इथंच जर एखादा शिक्षक असता तर ? किंवा कुणीही शिकलेलं)
दुकानातल्या सामानाची खरेदी आटोपल्यावर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. आईस्क्रिम च्या गाड्यावर जातो ना जातो तोपर्यंत ह्याचं राजस्थानी भय्यासोबत बोलनं चालू झालं - लै मिळवालाय गा तुम्ही ! त्या बिचार्याला बहुधा मराठी कळत नव्हती. मी सांगितलो त्याला मराठी कळतं नाही. हिंदीतनं बोल(अर्थात मला ह्येची हिंदी ऐकायची हौस पह्यल्यापास्नं) परत हा चालू झाला. लै कमाने लगे गा तूम, हमारे रांडचे वर भी नही जाते ओर दुसरे को भी नही जाते. और तूम गोड बोलके हमे घोडा लगा देते हे.
तिथंली आसपासची माणसं ह्याच्यावर ईमप्रेस झाली होती. आमचं खावून झालंत ह्यानं बील विचारल ते म्हणालं साठ रूपय्ये, ह्यो पन्नासची नोट त्याच्या हातात देत म्हणाला लै कमवायचं नसतंय दुसरीकडंन इवून ! ते म्हणाला क्या भाई ?
ह्यो : नाराज नह्यीस नव्हं ?
त्यो : नही
ह्यो : मग आणि वीस रूपये देतोस का ?
तिथुन बुलेट ला किक बसली मला गाडीवर डोस देत होता व्यवहाराचे मी पण ऐकत होतोचं.
संकष्टी असल्यामुळं जयसिंगपूरातल्या एका नामांकित गणेश मंदिरात आम्ही गेलो. आरती झाली दर्शनाची रांगेत तीन हजार लोकांची गर्दी हा एक्झीट गेट मधून आत गेला. मी बाहेरंच ऊभा होतो. एक्झीट गेट मध्ये सिक्युरीटी गार्ड ह्याला आडवला तिथंच त्या मंदीराच्या ट्रस्टीमधले नवरा बायको गार्ड जवळं थांबून होते. गार्ड म्हणालाहिकडंन जाता येत नाही आत !
ह्यो: का ?
गार्ड : हिकडंन बाहेर पडायचं असतंय !
ह्यो: मला काय माहित नही काय ?
गार्ड : मग हिकडनं कशाला आला ?
ह्यो: मामा दुपारी चार वाजल्यापास्नं रांगेत राहिलोय त्यात माझा ऊपवास चककर यायल्या !
रांग काय फुडं सरकना म्हणून आलोय.
तिथच बसलेली ट्रस्टीची बायको तिच्या नवर्याला मारवाडी भाषेत कायतर म्हणटली. (बहूतेक शिव्या दिली असेल) त्यानं ह्याला थेट गाभार्यापर्यंत आत नेंल आदरानं दर्शन दिलं आणि येतानं वीसभर पेढ्याचा एक बाॅक्स दिला. मंदिरातुन आला. गावाकडं यायलो हा मला त्याच्या लुच्चेगिरीच्या कथा सांगत होता. मी पण मन लावून ऐकत होतो. एका ठिकानी बसलो मी म्हणटलो दर्शन घेतलासं मला पेढं दे! त्याला दोनं पेढं दिलो बाकिची मी फस्त केलो.
नाटकीपणाचा आव काही ठिकाणी आणावाचं लागतोय का ?

फेसबुकवर असली तर

एकटं पोरगं सोबत दोन मित्रांना घेवुन विद्यापिठात गेलं होतं. निकाल घ्यायला. दुपारी बारा वाजताअर्ज केला. विद्यापिठातल्या मॅडम सरांनी सांगितलं साडेपाच वाजता रिझल्ट मिळेल. बारा ते साडेपाच तिघं जण मिळून विद्यापिठ सगळं हिंडून पालथं घातलं. मज्जा केली. साडेपाचला त्या ठिकाणी आले. पावणे सहा वाजता त्याचा रिझल्ट त्याला मिळाला. तरीपण तो त्या तिथल्या पुढच्याच खुर्च्यांवर बसून होता. बाकिच्या दोघांना काय कळंना म्हणून ते दोघे आले. झालं नव्हं काम. हे म्हणटलं झालं की....
मग चल की...
थांबा जरा...
मग सव्वा सहा वाजले तरी पण ते उठना तिथंन.
ह्या दोघांना भलतंच टेन्शन आलं.
मग साडेसहा वाजल्यावर ह्या गड्यानं खुर्ची सोडली.
मग बाहेर पडू पर्यंत ह्याला त्या दोघांनी काय बोलंल नाही. ( आपन कायतर बोललो तर हे परत आत जावून बसायचं gasp emoticon )
बाहेर आल्यावर विचारले पाऊण तास तिथं का बसला हूतास ?
असंच !
सांग की आम्हाला माहितंय प्रिथ्वी गोल हाय तुझा ईषय ख्वोल हाय !
मग हा जरासं फुगत आणि हसत सांगितला. ' तिथं पुढं एक पोरगी हूती माहित हाय का ? तीच ती लाल सँडल घातली हूती बघा, तीच नाव देवयानी हूतं'
मग काय तिचं नाव घेवुन काय रेशन कार्डावरंच तांदूळ घेणार हूतास ?'
'नाही रे तिच आडनाव ऐकायचं हूतं, फेसबुकवर असली तर.. रिक्वेष्ट वगैरे.....'
दोघं एकदम -सुक्काळीच्याऽऽऽऽऽऽऽऽऽ

शाकाहार आणि मांसाहार

शाकाहार आणि मांसाहाराबद्दल अनेक चर्चा चालू आहेत. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत मी शाकाहारी होतो. आहारात शाकाहार मांसाहार असली काय भानगड खरं तर नसते पोटात जातंय ते सगळं पवित्र असतंय असं माझ मत झालं. आठवीत असताना एका जवळच्या मित्राबरोबर जावून आम्लेट खाल्लं. चिमटीत उचलून ऊचलून. त्यात अति काय महान नसतं हे कळालं. 
त्यानंतर अंडा आम्लेट, बुर्जी, बाईल रेगूलर झालं. 
मग त्यातंच कोणत्यातरी महान माणसानं अंडी ही शाकाहारी असते असं सांगितलं, त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या. एकंच अंडीचा पराक्रम नावावर होता. त्यातंच ते पण शाकाहारी.
मग ईतर मांसाहारी पदार्थ शोध घेतले तर त्यात आम्हास 'मासा' बरा वाटला. म्हणजे कोंबडी, बोकाड हिकडे तिकडे बोंबलत हिंडत असतात त्यामूळे ते बादगड असा समज होता. त्याउलट मासा हा पाण्यात असतो. सूरमई ही चांगली असते असे समजून मित्रांनी खावू घातलं. मला ते प्रचंड आवडलं. म्हणावे एवढे काटे नसतात त्यात. आणि जे असतात ते काढताना मज्जा येते. (मला हे काटे काढण्याचा प्रकार भारी वाटतो.).
त्यानंतर चिकन आलं. ते देखील भजी प्रमाणे असतं असे समजून खाल्लं. सूरवातीला साॅसची आर्धी बाटली लागायची ज्यावेळी आमची श्रद्धा चिकनवर नव्हती. कालांतराने चिकन हेच जीवन असलेले दोन मित्र भेटले. ते रोज नवीन नवीन दूकानं बदलत तीनशे ग्रॅम चिकन खायचं मी त्यावेळी शंभर ग्रॅम पर्यंत कुठतर पोचलो. हे बोलून दाखवलं तर ते मारायचे खाल्लं पिलेलं मोजायचं नसतंय म्हणायचे.
मग बिर्याणी.......
मित्राची छावी होती त्या गावच्या देवीची जत्रा हूती. आता त्या गावाला जावून यायची माझ्या मित्रवर्यांची ईच्छा होती. त्यासाठी महिन्याभर आधीचं जूळणा करून त्या गावचा एक मित्र केला. आपसुक त्यानं जत्रेला बोलावलं. थोडा पाऊस होता, रस्ता खराब आणि ते गाव कर्नाटक बाँड्रीला होतं. तरीपण नऊ वाजायला आम्ही त्या गावात गेलो. त्याच्या घरी जावून मंदीरात गेलो. ह्याची नटी आलती मित्र खूश झाला म्हणला 'देवी पावली' मग जत्रेत गेलो, पाळणं वगैरे झाल्यावर त्या मित्रानं त्याच्या मळ्यात सगळी सोय केलती जेवणाची दहा एक लोक जेवणार होते. माझा मित्र शाकाहारी त्याला वेगळी सोय केला. मला बिर्याणी खायची होतीच. आधी आम्ही लांबचे म्हणून त्यानं मला एकट्याला वाढलं अगायायाया काय टेस्ट लागली माहितंय ? अर्धं भोगूनं मीच हालवलं. शाकाहारी मित्राला म्हणटलं 'आता मला देवी पावली बघ !' मग घरात ज्याज्यावेळी मसाला भात असतो तेव्हां हटकून बिर्याणीच्या उचक्या लागतात.
पुढं जावून असं वाटालं कि कोंबडीची हाडकं चावण्यात काय पाँईट नाही. मग आम्ही बोकडाच्या मटणावर डोळा ठेवलो मग परत मित्रमंडळी मिळाली मग बर्यापैकी बरं वाटलं. बिरोबा वगैरे देव आणि त्यांचे नवसाळू भक्त खास मटणासाठी मला अत्यंत प्रिय वाटतात. पुढे फेसबुकवरचे मित्र देखिल मला मटण खावू घातले. अशा रितीने मी घरातला प्रथम मांसाहारी व्हायचा मान मिळवला.
तुम्ही ज्यावेळी प्रथम खात असता तेव्हां तुमचे मित्र, मित्रांच्या घरातील व्यक्ती आपूलकीने जेवायला वाढतात. म्हणून पोटात जातंय ते सगळं पवित्र असतं.

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

पुस्तक लिहायचा विचार

काय नुस्तीच सगळी बोंबाबोंब आहे. सकाळी उठून पुस्तक लिहायचा विचार मनात आला. तसा विचार करत असताना अंघोळ करावी की नको ? हे पण मनात आलं. आता अंघोळ केली तर आपन ग्रामिन लेखन चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही. साबणाचा वास, डोक्याला लावायच्या तेलाचं वास इत्यादीमूळे आपन ग्रामिन लिहू शकणार नाही असं वाटलं. पण काही साबणं चांगली असतात ती तुम्हाला अधिक तरूण बनवितात त्यांचा विचार आला म्हणजे आपन नव्या दमाचे लेखक होइन अस वाटलं. हे सगळं असं विचार करत बसलो तर कधी पूस्तक लिहून व्हायचं असा वास्तविक विचार ठपकला मग जीवात जीव ओतून मी गोठ्यातल्या दावणीत जावून बसलो तिथं गेल्यावर लक्षात आलं. होल्सटन फ्रिझन गाय ही परदेशातली गायीची जात आहे मग आपल्या लिखानावर त्याचा परिणाम होईल असं गाय मनात हंबरडा फोडून गेली नेहमी पालंच का चुकचुकावी ? गायीचं काय क्रेडीट आहे की नाही ?
परवाच एका मेडीकल मध्ये मी झटपट पावडर ही झूरळं मुंग्या पाल इत्यादी पेस्टांची कंट्रोल करणारी पावडर आणायला गेलतो. तिथला तो दूकानदारचं भिंतीवरचं तळहाताच्या पसार्याएवढं झूरळ पकडून बाॅक्सात धरला आणि मला टाकून यायला लावला. त्यामूळे मी झटपट घेतलो नाही.
आता लेखन करायचं म्हणजे वही पाहीजेलंच की....
आता सगळ्या वह्या तर एंगेज आहेत त्यामूळे जरा एखादीची पहिली चार पानं फाडून तिचा त्या विषयाबरोबर ब्रेकअप केला तर ????
नकोच उगाच तिच्या भावना दूखवायच्या.
मग लक्षात आलं आपल्या जर्नलातील काही पानं शिल्लक आहेत त्या तावांचा वापर करता येइल. मी ते जूनं जर्नल शोधायला लागलो. कपाटात बघितलो तर तिथं सापडलं नाही. मंचाच्या खाली कॅरेटात बघितलो तर तिथंही नव्हती. चूलीत गेली असतील का ? असा विचार आला. पण नाही. गहूभुशाच्या पोत्यात ते जर्नल असेल म्हणू ते शोधायला गेलो तर वरती खूप नोट्स होत्या झेराॅक्स मारलेल्या तसंच चाचपडत असताना मला हाताला काहीतरी मऊ आणि ओलसर जाणवलं चिकीत्सात्मक दृष्टीने त्याला हात घातला. म्हणजे डोळ्याने हात घातला नाही प्रत्यक्षात हात घातला तर घरातल्यांनी त्या पोत्यात पपई पिकायला घातली होती. मस्त पिकली होती. ती दृष्टी ते तिथंच ठेवून पपई घेवून स्वयपाकघरात जावून चाकू शोधला आणि त्याच्या फोडी केल्या बिया काढल्या. आणि वीस मिनटं ती पपई खायला लागली. पोट भरलं सकाळी सकाळी मनाच समाधान झालं. मनात आलं -लेखन करायचा नुसता विचार केला तर एवढं पोट भरलं. लिहायला लागलं तर ????
दाणदाण पळत ते पोरगं मास्तरकडं आलं. मास्तर उठून ऊभा राहिले खूर्चीतून. एवढ्या सांच्याला का हे आलं. ते पोरगं अलिकडं हूशार व्हायलतं. मास्तरला आवडणार्यापैकी एक. मास्तर नं स्काॅलरशीपचा फाॅर्म भरला होता पोराचा. धापा बंद व्हायची वाट पाहनं मास्तरला झालं नाही. काय रे महेश ईतक्या गडबडीत काय झालं ? 
शांत झालं पोरगं. तस डोळ्यातून पाणी यायला चालू झालं. 'बाबा म्हणालाय शाळा सोड आणि कारखान्यात कामाला लाग.'
ह्याचा बाप बसायला असायचा तिथल्याची पोरं वर्ष दोनवर्ष झालं कामाला चालेली. शिकून काय धन पडत नही अशी धारणा झाली होती त्याच्या बा ची.
महेशला आता काहिच कळत नव्हतं. बाप घरातनं बाहेर गेल्यावर हा मास्तरांकडे पळत आला होता.
मास्तर म्हणाले 'तूझ्या वडीलांना समजावनं अवघड आहे, तू असं कर माझे एक मित्र आहेत ते रात्रशाळा चालवतात. मी तूझ्याबद्दल त्यांना बोलेन.'
एवढं ऐकला तो आणि माघारी फिरला. मघाशी पळत आला होता आता कधीतर एक पाऊल उचलून टाकतोय....

योगा .....!!!!

गावात एकदा मराठी शाळेत योगा -प्राणायम ह्या गोष्टी तेजीत असताना एकदा ते पतंजली वाले लोक आले होते. मी सातवीला असेन. माझे सगळे दोस्त लोकांचे असे मत होते की आपन हे केलं की आपन हूशार होईन, अभ्यास चांगला होईल त्यामूळे मी बी रामपारी उठून घरातली समृद्धी प्लॅस्टीकची चटई घेऊन जात असे. अशी चटई घेऊन जाणे पण समृद्धीच लक्षन असे. त्या दगडामातीच्या ठिकाणी आपली चांगली हातरताना मला वाईट वाटत असे, पण हूशार झालो तर पैसे फिटतील असं समजून चटई पसरायची. मग त्यांच स्टेजवरचं सेटींग हूपर्यंत चटयी वर स्वतःला पसरून घ्यायचं. सूरवात झाली की पहीला लूझनींग असायचं म्हातारे कोतारे लोक बी आधीच हलत असताना आणखी हलायचे म्हणजे एखाद्याचं मान हलत असलं तर त्यो बी आणि जरा जोर लावायचा.
बायकापोरींच्या झिंज्या वेण्या पलिकडचीला बडवायच्या कधी कधी.
हसायला लावायचे हॅ हॅ हॅ असं गावातले हसायचे आणि हा हा हा असं ते हसायचे मध्येच कुणाला तर हसताना खाकरायला यायचं. आलेलं मटरेल तसंच त्यो बिचारा आत ढकलायचा.
हात पाय सट्रेटनींग करायला लावायचे. त्यावेळी माझी खाकि चड्डी फाटली होती. म्हणून मी दोन दिवस शाळेलाच गेलो नव्हतो.
मग आलकट पलकट घालून बसायला लावायचे आवदान येवूपतूर हाल व्हायचं. एकहात खांद्यावरनं आणि एक हात मागनं धरायला लावायचे त्यात एकेकाचे शर्ट फाटले होते.
मग ध्यान लावायला लावायचे होऽऽऽऽऽऽ करून वरडायचे सगळे त्यातल्या त्यात चार सुशिक्षीत लोकं ओऽऽऽऽ आणि शेवट म्म्मऽऽऽऽ करायचे बाकिचे सगळे होम पेटवून रिकामे. त्यात अनेक घोळ म्हणजे कोण पहिला ओ करतोय ? मला तर सूर चुकायची लै भ्या वाटत असे.
शेवटच्या दिवशी आयुर्वेदिक चहा होता मी तीन वेगवेगळ्या रांगेत चटईसकट जागा बदलून तीन कप चहा झाडला होता.
मी कायम जर योगा करत राहिलो असतो तर आतापर्यंत इंजनेर झालो असतो असं आमच्या एका पाव्हण्याचं मत आहे.

'तो' मेलाय.

परिस्थिती घरची जेमतेम चांगली होती. म्हणजे झाली होती. डोक्याला ताप किंवा त्रास करून घ्यायचं काही काम नव्हतं. दोन्ही पोरं हाताखाली आलेली. त्यामूळं त्यांच रूटीन लावून द्यायचं हे एक काम होतं आता. मोठ्ठा पोरगा कामावर जात होता. तो महिन्याकाठला चारपाचहजार आणायचा. बारकं पोरगं हिकडं तिकडं हिंडत होतं. ते बी थोड्या दिवसात लागील नोकरीला आणि दोघा भावांचं मिळून दहा हजार पर्यंत महिन्याला येतील. असं त्याला वाटायचं.
एक दिवस मोठ्ठं पोरगं नोकरीवरून संध्याकळी पाच ला यायचं ते आलंच नाही. फोन करूनबघितलं तर मोबाईल स्वीच ऑफ येत होता. संध्याकाळी एक फोन आला. तुमचं पोरगं दवाखन्यात हाय आणि या.
लहान पोरग्याला घेवून हा दवाखन्यात गेला. तिथं गेल्यावर कळलं. पोराला कंपनीतल्याच माणसांनी मारल्यात. कारण होतं. हा तिथलं काही पार्ट चोरायचा आणि एका दुकानात विकायचा. चोरी उघड झाली होती. मालकानं आणि कंपनीतल्या पोरांनी मरूस्तवर मारून दवाखन्यात आणून टाकलं होतं आणि सत्तर हजार रूपये नुकसानभरपाई दिली पाहिजे नाहीतर केस घालणार.
ह्यान दोन दिवसाची मुदत मागितली. बँकेत एक पावती होती पन्नास हजारची. ती मोडली आणि मेव्हण्याकडनं एक दहा हजार घेऊन त्यांच भागवलं.
हात खूब्यातंन मोडला होता. दवाखान्याचं बिलं झालं बारा हजार आठ दिवसाचं. नवीन श्रीमंत आणि जुना गरीब असल्याने त्याने लाज बाळगून आणि पोलिसांना भिऊन ते पैसे भरले होते. आता शिलकीत कायचं पैसे नव्हते मग पंधरा गुंठ्याच्या तुकड्यावर दहा हजार सोसायटीतलं काढलं. मोठ्ठ्या पोरग्याची दोन महिन्याची सक्तीची विश्रांति संपली होती. बारकं पोरगं कुठतर दूकानात कामाला लागलं होतं. त्याचा तीन हजार पगार त्यालाच अपूरा पडालता. घरच्यानी पण नाही मागितलं.
हिकडं मोठ्ठं पोरगं आता गावातंच कुणाच्यातर रानात कामाला जात होतं. व्यसनं जडली होती. दहा हजार भर देण त्या मोठ्या पोरानं करून ठेवलं होतं.
हा एककलेचा होता. पण ह्या असल्या पोराच्या वागण्यामुळं त्याला कुठंच तोंड दाखवू वाटना झालतं.
एक दिवस असाच सांजच्याला हा रानात गेला होता. 'सक्सेस' नावाचं एक किटकनाशकाची बाटली त्यानं कालंच दुकानातंन घेऊन आला होता टाम्यटो ला मारायला. त्याच बाटलीतलं औषध पिवून तो रानात पडला होता कधीचा काय. शेजारनं जाणार्यानं ते बघितलं आणि गावात जावून त्यानं त्याच्या घरी सांगितलं. त्याची बायको याला म्हणाली भऊजी कुठं सांगू नकासा ह्यनी असं केल्यात म्हणून. एवढं बोलली आणि तोंडाला पदर लावून पळतंच सूटली रानाकडं...
पोरं गाडी घेवून गेली होती ती परत येतानं हिला दिसली मधी घालून आणत होती. हिच्याजवळं थांबाव अस वाटत असताना त्या दोघांनी न थांबवताच गाडी दवाखान्याकडं घालवली जायाला वीस मिनटं लागली. त्या दवाखान्यात गेल्यावर तिथं एडमिट करून घेतलं. चौदा दिवसानं ठणठणीत करून पाठवलं.
घरी आल्यापासून तो कुणाशीच बोलत नाही. जास्त खात पीत नाही आणि घरातून बाहेर देखिल पडत नाही. त्याचा रंग गोरा होतोय दिवसागणिक आणि तो रोज मरतोय किंवा 'तो' मेलाय.

एक हाॅरर स्टोरी

तूम्हाला रात्री कि नाही एक हाॅरर स्टोरी सांगतो काय....
मी पाचवीला हूतो एकदा. म्हणजे सगळे एकदाच असतात. मी पाचवी एका झटक्यात सूटलो होतो. माझा पाचवीत असताना एक मित्र होता अक्षय म्हणून. त्याचा वाढदिवस हूता. मी गेल्तो. रात्रीचं दहा वाजलं तिथंन येताना. मला नळीवरून सायकल मारता येत नसे त्याकाळात. मी मधी पाय घालून मधन सायकल मारत यायलो होतो. सायकल आणि गाडी चालवणे ऐवजी मारणे का म्हणत असतील लोक मला अजूनपर्यंत कळलं नाही. असो. तर मी सायकल मारत येत होतो. अंधारघूडूक...... त्यातंच चवथीला असताना मी राज पिक्चर बघितला होता. आता घरं संपत आलेली. दोन्ही बाजूला ऊस होता. ऊसात रानडूक्करं असत्यात. मला खरंच भ्या वाटत होती. मी नरसोबाला नवस केल्यामूळे जन्मलो असे घरातले म्हणतात. अनेक देवांना पण नवस बोलली होती घरातल्यांनी आणि इतरांनी पण. पण त्याकाळात माझा जोर जरा नरसोबावरंच जादा होता. म्हणून मी नरसोबाच्या नावान चांगभलं अशा घोषना मनातल्या मनात देत चाललो होतो. आता पुढं एक पडकी विहीर म्हणून प्रसिद्ध होती त्यात पडून चारपाच बायका मेल्या होत्या. त्या विहीरीजवळनं जाताना मला दूसरं काय म्हणजे कायचं आठवायचं नही. भूत लमान्याची बई एवढंच काय ते आठवायचं आणि मी कधी त्या भूतांच्या तावडीत गावतो असं वाटून मला लै दुःखी आणि रडू यायचं. झक मारलो आणि वाढदिवसाला गेलो. त्यातंच केक वगैरे कापने आणि मेणबत्या विझवने ह्या गोष्टीमूळे देव कोपायची भयंकर शक्यता होती. त्यामूळ आणि जरा भिती वाटाली.
मग कडांग कडांग असा पायंडलिचा आवाज तेवढाच बरा वाटत होता. आता पडकी विहीर जवळ आली आणि मी सायकल मारत होतो. तेवढ्यात कह्णतेला आवाज आला 'बाबा रे, बाबा रे, बाबा रे म्हणून आता कुठल्यातर पोरगीचा आत्मा भटकालाय अस फिल आला. तेवढ्यात माझी सायकल जावून कशाला तर तटली. आणि बा बा रे हे जोरात ऐकू आलं. सायकल जाग्यावर टाकायच्या बेतात असतानाचं माझा पाय अडकला आणि मी पडलो. तसंच वायूवेगानं पाय काढलो आणि मागं पळत सूटलो. एवढ्या जोरात मी कधी पळलोय कि नाही हे मला आता आठवतंच नाही. पळत येत असतानाच दोनतीनवेळा पडलो. हात पाय खरचटलं होतं. तसाच काहीतर करत एका कारंड्याच कडेला असलेलं दार ठोठावलो. ती घाबरली आतली लोकं एवढ्या रात्रीचं कोण ब्याद म्हणून... काठी घिवूनंच त्यो पठ्ठ्या बाहेर आला. मी रडायला लागलो होतो. त्यांच्यातलं एकट्यानं पाणी आणून दिलं ते पिलो. मग तो मला घराकडं सोडायला यायला तयार झाला. काठी आणि बॅटरी घेतलं आणि आम्ही दोघं चाललो. चालत चालत गेल्यावर माझी पडलेली सायकल दिसली. आणि त्या सायकल वर कायतर काळं मोठ्ठंच्या मोठ्ठं बसल्यागत दिसालतं. तो आश्वासक पावलं उचलालता आणि मी त्याच्या ऊजव्या हाताला होवून चाललो होतो. जावूनबघतो तर काय चव्हाणांची म्हातारी गठळं घिवून सरकत सरकत यायलती. तिचं ये बाबा ये बाबा म्हणून बोंबलालती. डोस्कं हालंल माझं. तिला दै शिव्या घाथलो मनातल्या मनात. ती म्हणाली कोण बाराबोड्याचा माझ्या गठ्ळ्यावर सायकल घाटला आणि बोंबलत गेला बघ. सायकल उचललो. त्या माणसाबरोबर घरापर्यंत आलो. त्यानं सगळ सांगितलं घरात. मी आत जावून मुसकी घालून झोपलो. आणि मूदलात दोन दिवस शाळेला दांड्या पण मारलो. wink emoticon
आता ती म्हातारी नाही आणि पडकी विहीर पण नाही.

नविन मास्तर

आज लेक्चरला नविन मास्तर येणार होते. पोरं पोरी क्लासमधली हारखलेली काहीजण नविन काय शिकवणार तो ? असा विचार करत असतील. तीन ते पाच असं दोन तासाचं लेक्चर होतं. विषय ईतिहास होता. दोनचार पोरं आणि चौदा पंधरा पोरी. 
तीन वाजायला पाच मिनटं कमी असताना ते सर आले. नविन होते म्हणजे अलिकडंच पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं. इनशर्ट वगैरे केला होता. काय मनात आलं कोणास ठाऊक त्यांच्या ? परत बाहेर गेले आणि पाच मिनटानं आले. त्यावेळी केस व्यवस्थित भांग पाडलेले होते. सरांनी खडू उचलला आणि फळ्यावर लिहलं 'ईतिहास'. अतिबारिक अक्षरात. नविन म्हणजे तसं होणारंच की. पोरं पोरी पण डिग्रीवाली त्यामूळ जाणिव असायचीच त्यांनाही. तर सर आता बोलायला चालू केले. मध्येच ते पोरींच्याकडं बघत. आणि पुढंच सगळं विसरत मग कुठतरं बाटलीतलं पाणी पीत ते आठवायचं. तर कधी रूमालानं घाम पुसतं. आणि तेवढ्यातंच चटका मारायचे. पण एका पोरीकडं बघताना त्यांचे डोळे ह्यकने व्हायचे आणि बोलताना चरफडायचे. ईतिहासात एका गोष्टीमूळ अनेक परिणाम व्हायचे. म्हणजे आता पण होतात खरं. पण मास्तर त्या पोरीकडं बघताना काय आठवायचं नही म्हणून 'परिणामी' असं जोरात म्हणायचा. आणि सगळ्यासनी विचारायचा. काय झाले असतील परिणाम ? पोरं आठवूपर्यंत ह्यो गडी मेंदूवर परिणाम करून फजिती होऊ नये म्हणून त्या शाॅर्ट ब्रेक मध्ये शाॅर्ट टर्म मेमरी लाॅस भरून काढायचा आणि घोडं पुढं दामटायचा. पुढं तासानंतर मास्तर लैच म्हणजे लैच बिघडला. पेशव्यांनी प्रयत्नांची पराक्रमे केली. आणि म्हणायचा प्रयत्नांची काय करतात ? मग कोणतरं एखादं पराकाष्ठा असं सांगितलं. अस चालू असतानाचं कधी कधी परिणामीचं 'परिमानी' करत. मध्येच ज्या पोरीकडं सर बघत होते तिच्याकडं एकटाक बघत होते. एकदम म्हणटले 'तुम्ही कानात पाॅड घातलाय का ? ती पोरगी जरा गोंधळून मागं बघितली. सर म्हणटले तुम्हीच ओ. पोरगी म्हणटली काय ? कानात हेडफोन घातलाय का ? नाही. मग ते काय आहे ? तीनं कान चेक केलं. तर बट पुढं आलती. सर हसाले. अच्छा केस आहेत होय ? पोरगी बी जरा लाजली. सगळी हसायला लागली. सर पण हुंदका देत हसत होते. एकदोन मिनटं ह्यातंच गेली. जोक चा पार्ट राहू दे आपन इकडे वळू आता. आणि अनेकदा बारिक हसले. कायतर करून पावणे दोन तास काढलं गाफट्यानं. मग लेक्चर थांबवल आला नसलेला खोकला काढत विचारलं टायमिंग काय झालं. पावणेपाच, चार पंचेचाळीस अशी उत्तर आली. सर म्हणले अजून अर्धा तास....
तसं पोर म्हणटली सर पंधरा मिनीटे ओ.
ओह साॅरी साॅरी...
आपन पुढच्या लेक्चरला अठराशे सत्तावनच्या ऊठावापासून पुढे बघू. आता शिकवलंय त्यात कुणाला काय डाऊट आहे ?
एकदोघांनी डाउट विचारले सरांनी पुस्तक उघडून त्यांच समाधान केलं. मग पुस्तंक झाकून बॅगेत भरले. आणि सगळ्यांच्याकडं बघत होते. म्हणटले जरा सगळ्यांच इनट्राडक्शन द्या. मग सगळीजन नावं सांगू लागले. ऊगाचंच सर काळ्या पोरींना पण आपुलकीने विचारत होते. मग ते जिच्याकडं बघत होते. तीचं पण डिटेलमध्ये चवकशी केली. परत सरांचा चेहरा लाल. सगळं झालं. सरांनी एक बेसिकंच पुस्तक पण तिलाच दिलं. आणि क्लासरूममधनं बाहेर पडले. आणि जाताना एकदा खिडकीतून तिच्याकडे बघत होते. ती सरांनी दिलेल्या पुस्तकातली पानं उलगडण्यात मग्न होती......

ग्रॅव्हिटी

त्याच्या गावात समुद्र किनारा नाही. म्हणून त्यानं वातावरण निर्मीतीसाठी 140 ग्रॅम मीठ सुमारे 8 लीटर पाण्यात विरघळवून ते एका टबमध्ये भरलंय. खूर्चीवर बसून तो त्याचे दोन्ही पाय त्या टबात बूडवून खूप काही विचार करत बसला आहे. 
पोर्णिमेला भरती येते पण टबमध्ये फारसा काही फरक पडत नाही. ग्रॅव्हिटी कमी होऊन पाय आपलेआपन वर येत आहेत असं त्याला जाणवत आहे. 
ग्रीस ला साडे तेरा हजार किलोमिटरपेक्षा जास्त लांबीचा समूद्रकिनारा आहे. तरी तिथं गोव्यासारखं काहितरी उद्योग राबवून तिथल्या नाणेनिधीच्या प्रतिनिधी देशांच्या प्रमूखाना तसेच जर्मनीच्या जोखमा ला बीचवर एखांद दूसरी पार्टी या विकेंडला दिली तर ? ते खूष होतील. जर्मनीवाल्याला गंडवून काय केलं नाही असं प्रामाणिकपणे सांगितलं तर ?
पाऊस गायब झालाय त्यामूळे दूष्काळाची परिस्थिती भारतात आहे. एका लिटरमध्ये 35 ग्रॅम मीठ असतंय. बर भारताछी लोकसंख्या जास्त आहे म्हणून 40 ग्रॅम धरू... ते मिठ काढून तेच पाणी शेताला वापरलं तर ? फडणवीसांना सांगावं की पवारसाहेबांना ?
पवारसाहेबांना नको फडणवीसांनाच सांगूया त्यांनीच गोवंश हत्या बंदीचा कायदा आणला. गोमुत्र आणि समुद्राचं साॅल्टमायन्सडं पाणी यांच्यामूळे शेती चांगली पिकेल.
अजून बरेच विचार ???

bahubali review

कुठलं हाॅलिवूड आणि बाॅलिवूड घिवून बसलायस मर्दा बवूबल्ली बघून ये एकदा !
आग्गायाया कसलं डोंगार चढतंय. धा बारावेळा वरनं पडलं खरं अजाबात काय झालं नही बघ त्येला. लै वांड नट हाय !
नटी तर काय तमन्ना ला घेतल्या. चायना मोबाईल असताना तिचाच वालपेपर ठेवत हूतो मी.
ती तर धनुश्य आणि बाण घिवून ह्यच्या मागं. ह्येनं पाण्यातंन जवून बिनआक्सीजनचं. टॅटू काढलं हूतं.
त्यातंच आमचं दोस्त पिच्चर बघाय आलतं. म्हणजे त्येनंच माझं बी तिकीट काढलं हूतं. जाताना मला म्हणटलं कपल टॅटू घिवून जावूया म्हणून. आता ते कुठं ऊठवतंय कुणास ठौक ?
गावातल्या पाचसाजनास्नी बोलावलं आणि म्हणला मी यळवाची काठी फिरवणार हाय तुमी गोल वुभं रहून दगडं मारा. पहिला दोनतीन मिनटं असलं काठी फिरवलं एक बी दगूड त्याला लागला नही.
दूसरा एकटा मित्र त्याची डेअरी हाय. रोज त्यो कॅन ऊचलताना गड्याला घिवून ऊचलत होता. पिच्चर बघून आल्यावर ते शिवलिंगचं शीन बघिटल्यापासनं कॅनंच ऊचलून खांद्यावरंच घेतंय.
मला येताना चरायला सोडलेला रेडा दिसला खरं मी बाजूनं आलो रे. 

म्हणून बिरबल हूशार वगैरे असतो.

तर बिरबल चतूर असतो. अकबरच्या बायकूला हे काय हे पटतंच नही. ती म्हणत्या माझा भौ बिरबलकिंदा हूशार हाय. अकबर म्हणतोय घंटा !
बायकू म्हणत्या तुमची सगळी लफडी बिरबलाला ठौक असतील म्हणून तुमी माझ्या भावाला नाकारतासा.
हिला कसं समजवायचं म्हणून अकबर विचार करतंय. संध्याकळी म्हणतंय ' हे बघ बई ऊगंच लोकशयी हाय म्हणून तूझं ऐकलंच नही असं व्हायला नको, आपन उद्या काॅनटेस्ट घिवू आणि ठरवू कोण किती ख्वाल हाय ते.' 
बायकू खूष हूत्या, जावून भावाला सांगत्या उद्या कानटेस्ट हाय म्हणून.
रात्रभर बुद्धिमत्तेची गणित ते सोडवून घेत्या भावाकडंन. ते बो गाफटं सगळं सोडवतंय. नावनाव भावाचं आयक्यू डेव्हलप झालेलं बघत्या. खूष हूत्यात राणीसायेब.
सकाळी लवकर ऊठवून भावाकडंन प्राणायाम ते करून घेत्या.
तिकडं बिरबल हिकडं तिकडं बोंबलत हिंडून राज्यकारभार ते बघून येतंय.
पर्देच्या ठिकाणी दोघं येत्यात. अकबरची येंट्री हूते. मूजरा, रामराम शामशाम हूतंय.
मग दोघाकडं बघून अकबर खेळाचं नियम समजवून देत्यात.
मग दोघांच्या हातात चारआणे देतंय. म्हणजे शेप्रेट शेप्रेट. आणि दोघास्नी सांगतंय. चाराण्याची सूतळी घिवून यायची आणि इकडं येताना ट्रंक भरील येवढं पैशे आणायचं. बिरबल ऐकतंय आणि जातंय ट्रंक घिवून. ह्ये मेव्हण पण लगेच बाहेर पडतंय मनातल्या मनात शिव्या घालत. (आय घाटलो आणि बुद्धिमतेचा अभ्यास केलो असं त्याला वाटतंय)
मग एका दूकानात जातंय आणि सूतळी मागतंय हे. दूकानदार देतोय आणि पैसे मागतो. ह्यच्याकडं मोजून चारआणे असत्यात. आता कसं करायचं ? म्हणून विचार करतंय ते. डोस्क्याला आऊट आल्यागत हूतंय आणि पळत सूटतंय हे. मग त्यो दूकानदार बी पक्के शेठजी असतोय. हरवलेला आठआणे शोधण्यासाठी पन्नास रूपयाचा गडी लावनारा. दूकानातली दोनचार कंड पोरं त्याच्या माग लावतो. ते पळत सूटदेलं असतंय. मागनं पाठलाग करतेलं बघून हे भित्रं राजवाड्यात पळून जातंय.
तिकडं बिरबल दुकानात सूतळी मागतंय. दकानदार फ्रि मध्ये देतोय ह्याला. रस्त्यावरंन सूतळी टाकतंय दुकानपर्यंत आणि दूकानदाराला म्हणतंय दूकान धा फूट अतिक्रमणात हाय. दूकानदार घाबरतंय. म्हणतंय पाश्शे देतो मिटवा. ह्ये म्हणतंय. हजार !
दूकानदार गप्पगुमानं हजार रूपये देतो आणि रिकामं होतंय. ह्यो गडो गावभरं सूतळीनं माप काढत जनतेला लूटून ट्रंकभर पैसे भरून नेतंय. राजाला म्हणतंय घे. नेहमीप्रमाणे अकबर खूष हून बक्षिस वगैरे देतो. बायकूचं भवू कारकून म्हणून ठिवून घेता यील असं राजाला वाटलं असलं तरी ते पण चान्स देत नही राजा त्याला. म्हणून बिरबल हूशार वगैरे असतो.

'Impossible is Nothing'

झक मारली आणि इंजनियरींग पुर्ण केलं असं त्या चौघा-पाचजणांना वाटलं. नोकरी ते बी पुण्याला !
आणि पगार सात हजारच्या वर देत नहीत. गावातली लोकं घरच्यांच्यापेक्षा जादा बोंबलाय लागलेली. घरचे पण उठता-बसता, खाता-पिता, येता-जाता काय वाट्टलं ते बोलायची. जीव नको असं वाटालंत पोरास्नी. मग ते रोजच्या बैठका घेत आणि ह्या गावच्या लोकास्नी एकदा घोडा लावूनंच गप्प बसायचं असं ठरवित असतात. रोज वेगवेगळे प्लॅन्स करत असतात. मग एकदिवशी असंच ठरवत्यात आपन एकदा तरी जगात फेमस झालं पाहिजे असं कायतर करूया असं ठरतं. त्यातलं एकटं लॅपटापवर कायतर खटकं दाबत बसलं हूतं. ते म्हणटलं 'चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्या.'
बाकिची म्हणाली मग काय हिथलं रान घालून तिकडं चंद्रावर तुमचा बाबा ऊस लावणार हाय काय ?
मग सगळी पोरं हसत्यात. पण त्ये लॅपटाॅप घिवून बसलेलं पोरगं म्हणतंय, 'आरे आपन बी यान तयार करायचं आणि एकदा चंद्रावर जावून यायचं.'
दूसरा म्हणाला, 'तुमचा बा परवानकी देणार हाय काय ? आणि यान काय तुमचा आज्जा तयार करणार ?'
'तुमच्या प्रत्येकात एक इंजनेर दडलाय. आणि यान सोडणारी सगळी इंजनेर असत्यात, आपन पण यान तयार करायचं आणि चंद्रावर एकदा ट्रिप काढून यायचं बघ.'
आत्ता जरा प्रत्येकाला त्याचं विचार पटायला लागत्यात. मग ह्यानं नेटवरंन डाऊनलोड केलेली व्हिडीओ, पीडीएफ फाईल्स, काहि ईमेजेस दाखवतो. आणि म्हणतो 'सगळी लोकं टनात वजनं असलेली यान तयार करत्यात आपन क्विंटल मध्येच तयार करायचं. म्हणजे बज्येट कमी बसतंय. तेवढ्यात त्यांच्यातलं एकटं त्वांड उचकटतंय म्हणतंय 'यानाच्या सायलेन्सर ची पुंगळी काढणार असला तरंच मी मोहीमेत सहभाग घेणार बघा !'
बरं सगळ्यानच्या सगळ्या अटी पुर्ण करायचं म्हणजे लै वेळ लागणार. त्यापेक्षा ज्याला ज्यो पार्ट पायजे तसा डेव्हलप करायचं. उद्याला सगळीजनं पाच पाच हजार घिवून त्या आयट्या केलेल्या अरण्याच्या फॅब्रिकेटच्या कारखान्यात यायचं. महिन्याभरात यान तयार झालं पाहिजेच.
सगळेजन होकार देतात.
दूसर्या दिवशी सगळेजन ते कारखाना उघडायच्या अगूदरंच कट्ट्यावर यिवून बसत्यात. मग आर्ध्या तासानं आरण्या येतोय. त्याला सगळेजन बघून हसू येतंय. काय रे इंजनेरानु काय सकाळपारीच आलायसा ?
कोण कायचं बोलत नहीत. आरण्या शटर उघडून आत जातोय तसं सगळी त्याच्या मागनं जात्यात. मग त्याला सगळं काही सांगतात. ते म्हणतंय हे तयार करायचं शक्य असतं तर सगळी लोकं तेच केली आस्ती.
मग त्यांच्यातंल्या एकट्यानं मोबाईलचा वाॅलपेपर त्याला दाखवतोयं त्यावरं लिवलेलं असतंय 'Impossible is Nothing'
आरण्या पण म्हणतंय हु दे खर्च ! तुमाला चंद्रावर नही घालवलो तर नावाचा आरण्या नही. येकदा धूरळा ऊठवायचंच !
मग आरण्या आणि दोघं जनं पैसे घेऊन एक छोटा हात्ती ट्रक ठरवून मटरेल आणायला जात्यात. शहरातल्या मोठ्या दूकानातंन, जून्या बाजारतंन, चोरं बाजारातंन सगळं मटरेल गोळा करत्यात.
दूसर्या दिवसापास्नं सगळीजनं देहभान वगैरे इसरून कामाला लागत्यात. दीड महिन्यात म्हणजे यान तयार हूतंय. हे सगळं गुप्त पद्धतीने तयार करत्यात. दोन दिवसाने यान लाँच करायचं म्हणेन ठराव करत्यात. आदल्या दिवशी रात्री एका टॅकटरातंन यान माळावर नेत्यातं. टॅक्टरच्या ट्राॅलीतन यान वर ऊडवायचं ठरतं.
परत रात्री अकराला एक मिटींग हूते. सगळ्यासनी सूचना देत्यात. लै दिवस जाणार हाय त्यामूळं जास्त टिकीलं असं डब्बा घ्या. आथरून पांघरून कमी घ्या, एक कुत्रं बी घ्याय पाहिज्ये हे लक्षात येतंय त्यांच्या. मग एक ह्यनं कुत्र बी आणत्यात. दशम्या शंकरपाळ्या शेंगाच्या पोळ्या, ग्लूकोज डी, पाण्याचं पीप वगैरे घेत्यात.
पहाटे पाचला म्हणजे यान ऊडवायचं ठरतंय. सगळे तीन वाजता येत्यात कुत्रं बी घेत्यात. ऑक्सीजन सिलेंडर ते चेक करत्यात म्हणजे वजनं वगैरे. मग यानात चढल्यावर खिडकीकडंला कोन बसणार ह्याच्यावरंन भांडन हूत्यात. मग दर दोन तासानं जागा बदलायचं ठरतंय. सिटबेल्ट ते लावून घ्येत्यात. आणि बटन दाबत्यात काऊंट डावून सूरू होतंय.
5
4
3
2
1
0000
यान उडतं.
गावातली लोकं पुंगळीच्या आवाजानं जागं हूत्यात. आणि तिकडं येत्यात. तोपर्यंत यान पृथ्वीपासून बर्याच लांब आलेलं असतंय. यानात बाहूबल्ली मधली गाणी लावलेली असत्यातं. smile emoticon

मेथीचा नवरा मेथा

मेथीची भाजी छान असते. त्यातले तांदुळ पण भाजी बरोबर शिजतात. मेथीचा नवरा मेथा असतो तो कडवट लागतोय. एकेक हुशार बायका भाजीवाल्याला विचारतात कि मेथा आहे की मेथी ?
पंधरावर्षापुर्वी आमच्या एका लांबच्या मामाचं लग्न होतं. तो नाव घेतला भाजीत भाजी मेथीची शुभांगी माझी प्रितीची ! मला मेथीची भाजी खाताना हे कायम आठवतं. मग बदल्यात त्याच्या बायकोने मेथा चा आदर का राखला नसेल ? असे प्रश्न छळत असतात. पण मेथ्याला रायमिंग शब्द नाही आहे. म्हणजे ते नाव देखील बेचव वाटतं. तरीपण मी कधीतर मेथ्यावर अन्याय नको म्हणून एखादं नाव सुरात जुळवायचा प्रयत्न करतो पण ते काही वेगळंच होतं.
' भाजीत कडवा आमचा मेथा, अगोदरचा याच्यापेक्षा बरा होता' पण हे मान्यतापुर्वक नाव नाही अशा मुळे लग्न व्हायच्या वाटणीचं मोडायच्याच जास्त शक्यता. पण त्या लग्नात जिलेबी होती. मग ह्याला मेथीच का आठवावी, मठ्ठा होता, कोशिंबीर पण होती. पण ह्ये गडी भर लग्नात मेथी शिजवले. आणि त्यांच्यामुळं माझ्या डोक्यात असलं काहीतरी शिजत असतं. म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी नावं वगैरे पाठ करणं महत्वाचं असावं. त्यापेक्षा पत्नीच नाव लक्षात ठेवनं महत्वाचं grin emoticon
त्याचं असं झालं की, एक जवळच्या मित्राचं लग्न होतं, मी त्याच्याजवळच होतो तेवढ्यात त्याच्या बायकोच्या मैत्रीणी आल्या, जीजु नाव घ्या ना, नाव घ्या ना...
जीजु लाजला, मी म्हणटलं घेवून टाक रे...
ह्यानं तोंड उचकाटलं घ्येटलं जुन्या लफड्याचं नाव. सगळी भांबावली, मला बी चक्रम झाल्यागत वाटलं. गडी पाक गळाला. सारवासारव केली नाही तर माझा काय उपयोग ? म्हणून मी हसलो. म्हणटलं वैनींना नाहीस का सांगितलं ?
ह्ये परत भांबावलं म्हणटलं क्वाय ?
ह्येच की तु त्यांच दुसरं नाव काल ठेवलास ते ?
मग ह्यो लाजला. वैनीपण लाजल्या. पोरी पण म्हणटल्या किती क्युट नावं ठेवलंय जीजू !
ह्यला घाम आलता माझ्याकडं नॅपकीन हुता पुढं होवून पुसलो. म्हणटलं जातो जरा जेवनाकडं कसं काय ते बघून येतो. ह्यनं हात वढला म्हणटला इथन हालायचं नही तु आजच्यादिवस.
नंतर सगळ आटपल्यावर तिकडंची एकटी बया गाठलीच म्हणली, जीजु सिरीयस का झाले होते ? मी म्हणटलं लाजतात ते !
नंतरनं त्या मित्राने खुप आभार मानले. अजूनही तो मला नेहमी जेवनं देत असतो. वैनीना तो जुन्या लफड्याच्याच नावाने हाक मारत असतो.
मेथीची भाजी खाल्यानं बुद्धी वाढते augast29 2015. grin emoticon

पंढरपूर

सकाळी पहील्या यष्टीनं पंढरपूरला गेलतो, आत्ता आलो. असं कुठतर जायच झालं तर घरात मोबाईल घेवून जावू देत नाहीत, मी भलतीच काम करतो अशी शंका घरातल्याना असते. 
सोलापूर जिल्ह्यात आवंदा पाऊस चांगला झालाय आमच्यापेक्षा, ज्वारी कंबरबरोबर आल्या, डाळींब आणि द्राक्षे बागं कमी झाल्यात, द्राक्षे कमी झाल्यात याचा अर्थ लोक शहाणे व्हायलेत. 
एस.टी त मज्जा येतेच. सकाळी एकटा तिरसट काका आला मागच्या शिटावर बसला, माझाच पेपर वाचायला घेतला, प्रत्येक बातमीवर कमेंट द्यायला लागला गडी. धूडकूस घालालता नुसता. मग कुठनतर घसरत कारगील युद्ध ऊकरून काढला. आणि म्हणटला, कारगील जिंकलय तिथन सात देशावर आक्रमन करता येतंय. मी म्हणटलं काका कोणची सात देश ? काका म्हणटला तेवढं काय मला माहित असतंय काय ? यष्टीतली सगळी हसायला लागली मग काकानं माझ्या पेपराची फूकनी केली आणी एका हातानं दूसर्या हातावर बडवत बसला.
सांगलीत माझ्या शिटवर एक पोरगं यिवून बसलं, ते येडशीला सोलापूर जिल्ह्यात शिकायला हाय. सांगलीस्नं सोलापूरला. त्यांचा बाबा पुण्याला असतात. मग तो म्हणटला माझा अभ्यास होत नाही म्हणून मी तेवढ्या लांब हाॅस्टेलला गेलोय. मग माझं सगळ विचारून घेतला, मला म्हणटला मी अभ्यास कसं करू सांगा. 
बोंबलंल कुणाला काय विचारायच हे एकेकदा कळत नसतं पोरास्नी. 
मग मी बारावी कशा प्रकारे पास झालो ते त्याला सांगिटल. मग तो खूश झाला. मग तो देवावर आला. मी म्हणटल देव नसतोय. त्यो पण तसंच म्हणटला. मग मला विचारला पंढरपूरला कशाला चाललाय ? मग मी त्याला पिशवीतल्या भाजलेल्या शेंगा, गुळ, खजूर, राजगिरं लाडवाची पाकिट दाखवली आणि जरा खायला घातलो मग तो खात खात जोरात हसला. 
सांगोल्यात गाडी थांबते दहाएकमिनटं रिकामं व्हायला ....
यष्टीतला एकटा गेला त्यो काय पंधराच वीस मिनटं झालं तरीबी गडी आलाच नही, मग यष्टी त्याच्या पिशवीसकट यष्टी पंढरपूराला गेली. 
पंढरपूर हे काय आवडावं अस तिथ काहीच नाही. लोक सगळी कशी पांढरीफेक, तरूणांच प्रमाण हे पंधरावीस टक्केच असावं. प्रत्येक जण दिंड्या घेवून येतात, मग पालख्या वगैरे असतात. एका दिंडीचं भजनं माईकवरून दोन पोरी गात होत्या, रघूपती राघव राजाराम , पतित पावन सिताराम असं. त्याना आपन सिंगर असल्याचं फिल आलं असेल. वेगवेगळे सूर आळवत होत्या. चंद्रभागेत पाणी गढूळ असतं, तरीपण ऊड्या मारत लोक पळतात, पोहतात, एकमेकांना बूडवतात, बाहेर आलं की गंधाचा साचा घेऊन लोक तयार असतातंच. मग असंच त्या गर्दीबरोबर हिंडत गेलो, तांबडा मारूती वगैरे स्ट्रांग देव पण आहेत, सनातन प्रभात आहे, संभाजी ब्रिगेड आहे. नारायण राणे आणि खडसेंची जास्त पोश्टर लागलेली आहेत. हिंडून फिरून
परत यष्टीत येवून बसलो. तर यष्टीत एकटा फूल्ल टाईट होऊन आलता, मास्तर म्हणटला तुझ्याआयला सगळी येवून इथ दारू सोडत्यात आणि तु माळ घालून हिथनंच उद्घाटन केलंय काय रे ? मास्तर जाम भडकला. 
मग ह्यो गडी यष्टीतंच झोपला. बायका शिव्या घालालत्या. असं कायतर करत परत परत सांगोल्यात आलं. तेवढ्यात दारूड्याला हुक्की ऊठली विठ्ठल विठ्ठल गाण म्हणाय लागला. 
गाडी परत चालू झाली. सांगलीत आल्यावर निम्मी गर्दी कमी झाली, आणि उतरलीतीत त्याच्या डबल चढलीत. माझी सिट रिकामी होती, पुढं बघितलो तर पाव्हण्याची पोरगी वाटली म्हणून हाक मारली, तोपर्यंत ती वेगळीच निघाली. हारकून थँक्स म्हणटली आणि मोबाईल काढलं बॅटरी क्रिटीकली लो होवून मोबाईल झोपला. मग हसत मला म्हणटली तुला कुठतर बघितलंय. मी म्हणटलं कुठं ? तु जे. जे ला इंजिनीयरींगला आहेस ना ? मी म्हणटलं नाही. मग म्हणटली तु कॅफे क्रश ला सारखं येतोयस की नाही, होय म्हणटलो. तुला कसं माहीत? विचारलो भाव खात म्हणटली, तू एकदा स्प्राईट आणि कोल्ड काॅफी एकदम पित होतास आणि त्याचे फायदे जोरात सांगत होतास. मी तूझ्या पलिकडच्या बाजूला बसलीती ते मला ऐकू आलते, मी एकदा ट्राय केलंसूद्धा. 
मला लै हासायला आलं, कधीतर आलेली वेळं मारून नेण्यासाठी मी काहीही गंडवत असतो, हीनं ट्राय केलं grin emoticon 
मग पलिकडच्या शिटवरचा काका तिच्याकडं माझ्याकडं कानात काटकी घालून बघत होता. मग ती परत एकदा थँक्स म्हणटली, मी म्हणटलो रहू दे सोड ! 
घरात आलो. घरात भावानं पिशवी घेतली, एक डिस्क आण म्हणटलाता म्हणून आणलोतो ते बघत बसला. त्यात एक गाणं होतं नागाच्या पिल्लाला च्या चालीवर ...... 
कलियुगाच्या पुंडलीकानं आइबापाला बाहेरं काढलं, जाता जाता देव आठविलं ! 
आमचे बापा माझ्याकडे बघत होते. smile emoticon

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

पुढंच पुढं 2

काल रम्या कडन आणलेला शर्ट इस्त्री केला. नीट इन्शर्ट केला. रोज हापिसात साडेदहाला जायचं ते आज दहालाच गेला. ती पण बरोबर टायमावरंच आलती. सॅक ठेवलीत दोघंबी आणि जवळच्या कॅफे मध्ये गेलीत. ह्यो म्हणला तुमच्या बा नं स्वारी पप्पांनी कशाला बोलवल्यात मला ?
ती : मी सांगितलो पप्पांना तुझ्याबद्दल ! मग पप्पा म्हणटले त्याला बोलवं उद्या. तुला सांगितलं होतं काल फोन करून, तस्सा माझा हिरो आज तयार होवून आलाय. असं म्हणली आणि काच्चदिशी डोळा मारली. हे तंतरलं हुतं तरीबी हसला. 
तेवढ्यात कोल्ड काॅफी आली. दोघांनी उचलंल. ह्यनं स्ट्राॅनंच चाॅकलेटी दिल तोडलं. सुरसुर दोघंबी वढलीत. ह्यनं पैशे टेकवलं. परत हापीसात गेलीत. CAआला हुता. गुडमार्निंग ते केलीत. दिवसभर काय काय करायचं ते त्यनं सांगिटलं. दोघं बी आपापल्या जागी गेली. कामाला सूरवात केलीत. तासादीडतासानं ह्यचं डोस्कं काहीच काम देईना झाल्तं, ऊठला आणि तिच्याकडं गेला. ती म्हणटली आता काय ? 
अगं बाई मला मघासपस्नं एक प्रश्न लै डोकं खातोय काय सुधरना झालय. तुझ्या पप्पांना मी काय म्हणु ? काका म्हणटलं की माझी बोंब आणि मामा म्हणटलं की तूझी बोंब ! नेमकं काय म्हणु ?
हीनं ढेच्याकतलं ताक रवीनं घूसळावं तसं पेन गालात खूपसून ढवळत हूती. 
म्हणटली अरे वेड्या 'अंकल' म्हण की ! 
ह्ये डोक्याची केसं उपडत म्हणालं आहा तूझं डोक किती चालतंय गं. ? इंग्लीश इज फन्नी लँग्वेज ! असं जोरात वरडला आणि तिला टाळी दिली. आय कॅन वाॅक इंग्लीश, टाॅक इंग्लीश, टीकटाॅक इंग्लीस असं गुणगुणत परत कामाकडं गेलं. 
ऊत्साच्या भरात हिशेब चुकतात असं साह्यबानं सांगितलं हूतं ते आठवलं. 
घड्याळाचा काटा पुढं सरकत होता. आणि हा विचार करत होता तिच्या मम्मीला आंटी म्हणटलं तर चालेल काय असा एक विचार तो करत होता. 
(पुढंच पुढं)

पुढंच पुढं 1

ह्ये बी.काॅम केलतं. एका C.A च्या हाताखाली काम करत हूतं. तिथंच एक पोरगी पण येत हूती कामाला. मग सगळं हिशेब करता करता ह्यांचा बी हिशेब जुळला. हे बेनं मुलखाचं उडाटप्पू हुतं. गावात ह्यला कोण शिवा देणार नही ते त्या गावचं नसणारंच. गाडीवरनं गेलं की मागं म्हणायची गेलं बघ बेणं बा च्या जीवावर डबा घिवून ! 
मग निबार व्हायलतं म्हणून बाबा म्हणला दोन वर्षात लगीन लावून टाकू या. पाव्हण्यात काय पोरी कमी नहीत तु बाॅट करून दाखव नुस्तं ! हे म्हणलं बाबा माझं झंगाट हाय. तिच्याबरोबरंच करणार.
जात बित जुळत हुती त्यनं बाबा काय आडव तिडवं नही बोल्ला. तिकडं पोरगीचा बाप वकील. ही सगळ्यात बारकी त्यनं हीच बी घरात अप्रम लाड !
ती म्हणलं ते सगळं मिळत हुतं तिला.
मग असंच एका सन्डेला ही दोघं गेली पिच्चरला. कार्नर सिटवर एकमेकाला पाॅप कार्न भरवत बसली हूती. त्यातंच ईमोशनल सीन. ती ह्यच्या खांद्यावर मान टाकली हात घट्ट धरली. ह्ये पण ईमोशनल झाल्याचं नाटक केलं. कानावर बसलेली माशी तंद्रीत झटकावी तसं तीच टक्कूरं थोपटलं. बारिक आवाजात लग्नाचा ईषय काढला. ती पण हं हं करत ऐकाली. जरा भडकणार असं दिसली की हा पेप्सीचा स्ट्रा तिच्याकडं करायचा. मग ती भडकायची नाही. असंच शुद्ध टेलंट वापरून एकेक गोष्टी तिच्या ध्यानी मनी उतरावलं. नंतर म्हणला काय प्राबलेम झाला तर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे !
ती म्हणटली आमचे पप्पा माझे लाडके आहेत. ह्ये मनातल्या मनात म्हणटलं, माझा बी लाडका हुं दे !
घरला गेली दोघं आपापल्या. ह्याला बापानं इचारलं काय म्हणली ? व्हायल्या तयार ! परत बाबा वरडू लागलं म्हणाला कशाला झक माराय शारातल्या पोरी कटवायच्या ? गावातल्या सगळ्या काय जुन्या हिरीवर गेलत्या काय ?
हे परत बाबाला ईमोशनल केलं. बाबा म्हणटला कसं हुईल तसं हुईल.
तिकडं ती त्यांच्या पप्पाना रिकवेश्ट करणार हुती. घरात गेल्यावर आवरली. पप्पा लवकर आले होते. ते बघून तिला बरं वाटलं. चहा घेवून गेली. हाय माय डिअर डॅडी ! लुकींग बिझी.
नाही गं सोनु, थोडं काम होतं. मग हीनं पण चहा देत हसत खिदळत मला एकटा मुलगा आवडतो म्हणून अर्ज केला.
वकीलसायेब वर जाणार्या कपाला स्थगिती देत हसले. कोण आहे तो ? मग हिनं त्याच नाव गाव सांगितलं. व्हाटसपवरचा डीपी दाखवला. वकीलसायबांनी स्टेटस बी बघितला 'love makes life live' वकील खूश झाले. म्हणटले उद्या बोलंव त्याला घरी.
ही खूश झाली. मम्मी दारामागं उभी हुती ती पण खूश झाली. हीनं गॅलरीत जावून फोन करून त्याला सांगितलं. हे म्हणटलं मला भ्या वाटतंय. ती म्हणली अरे ते काय तुला लगेच डांबणार नाहीत. ह्यानं ठीक हाय म्हणून फोन ठेवला. माळावरच्या फावड्या रम्याकडं फार्मल शर्ट असतात हे त्येला आठवलं. मग त्यानं गाडीला किक मारली.
(पुढंच पुढं)

शोध

एका देवळाच्या एका पायरीवर एक भिकारी बसला होता. त्याच्या जर्मनच्या ताटलीत दोन आठ आठ आण्यांचे क्वाईन होते. तिथून दोघे जन जात होते त्यातला एकटा म्हणाला तो आंधळा भिकारी आहे. 
दूसरा लगेच म्हणटला तु तो आंधळा असल्याचा शोध कशावरून लावलास ? 
अरे त्याच्या डोळ्यांचा आकार बघ. त्याचे ते जागोजाग फाटलेले कपडे बघ, त्याचा कळकट चेहरा बघ. कुणाही माणसाला इतकं अस्वच्छ राहायला आवडेल तरी काय ?
आवडायला काय झालं ? जर त्यानं स्वच्छ राहीलं, छानछान पोशाख घातला तर त्याला भिक कोण देणार ? 
बरं तु म्हणतोयस तो आंधळा नाही. तु कशावरून हा शोध लावलास ?
त्याच्या ताटलीतले ते दोन क्वाइन बघ. ते आज व्यवहारात काहीच उपयोगाचे नाहीत. हे त्याला पक्कं माहिताय. त्यामूळेच तो निर्धास्त आहे. फक्त तुझ्यासारखे काही लोक त्याला आंधळा म्हणतात.
तुझही मी खरं माननार नाही कि माझंही तु ! त्यापेक्षा आपन असं करू आपन इथून कुठेतरी लांब बसून त्याच्यावर लक्ष ठेवू.
.
दोघांचा होकार मिळाला. ते दोघे लांब एका कट्ट्यावर बसून निरीक्षण करू लागले. देवाला आलेल्या लोकांपैकी काहींनी भिकार्याला खायला दिलं. काहींनी चिल्लर पैसे टाकले. तो केळं, लाडू, शिरा इ चाचपून खात होता. त्यावरून त्याच आंधळेपण दिसून येत असलं तरी त्याला पाण्याचा पेला बरोबर कसा सापडायचा ? असे वाद ते एकमेकांसोबत घालू लागले. पण त्यातून काहीच निष्पण होईना. ह्याची रात्र कशी असेल त्यावरून ठरवता येईल असं या दोघांना वाटलं. ते थांबले. त्याच्यावर नजर ठेवूनंच होते दोघे. दोघेही आपापली बाजूच सांगायचे. असा बराच वेळ निघून गेला. रात्रीचे दहा वाजले होते. दोघांनाही कडकडून भूक लागली होती. ते दोघे ऊठून घराकडे गेले.
नारळीच्या झाडांच्या रट्यांचा आवाज सळसळत होता. रात्रीच्या नवाच्या सुमारला वश्या काकूबरोबर शेतात बसला होता. काकू शिवच्या दगडाला टेकणी लावून बसली होती, घराकडंन काकूसाठी आणलेला चहा आणि पव्हं काकूला देऊन बॅटरी हाणत लांब रानात अंगावर वारं झेलत गेला.मधनंच कुठतरी एखाददुसरी टिटवी टिवटिवत होती त्या वार्यात पण तिचा आवाज घुमत होता. वार्यात असंच धा वीस मिनटं असंच हिंडला. एक निळंबीची चवाटी घेवून सप सप आवाज करत फिरवत आला, काकू पव्हं खाल्लीती, चहा वाटीत वतून घेतली, थोडं राहिलंत, 'वश्या एवढं घे रे मुला' म्हणटली. वश्यानं हातातली चिवाटी फिरवत फिरवत फेकली अंधारात गुणाकार करत ती चिपाटी कुठतंर लुप्त झाली. वश्या खाली बसला, तंगड्या गळ्यात घेतल्यागत केला आणि किटलीला दातं लावून चहा प्यायला लागला. चहा चार घोटात संपला. आता सोयाबीनाची मळणी झाकायची आणि घरला जायचं होतं. आजीनं कळशीतंल्या पाण्यानं वाटी आणि किटली मुगळली किटलीत पाणी घालून दोनचारवेळा फिरवली आणि पाणी त्याच रेषेत वतली. काकू नं तंबाखुची पुडी काढली आणि चूना लावून मळली आणि तोंडात पकाणा टाकला. वश्या मातीत बोटं घालून गवताच्या गड्याला हात घालत एकेक उपसायला सुरवात केली गवत ओढलं की मातीही उडून यायची ती त्याच्या चड्डीवर पडायची. थोड्या वेळानं त्याला या गोष्टीचा कंटाळा आला. ऊठून चड्डी झाडली आणि मघाशी म्हातारी ज्या दगडाला टेकून बसलीती तिथं बसला. म्हातारीनं पेंडंच एक रिकामं पोतं हातातंन टाकलं आणि बसली.लुगडं येवस्थित करत एकदमंच बोलाली.
वश्या तुला सांगतो एक गोष्ट.
वश्या म्हणटला सांग बाये...
लै वरसामागं एकदा खपलीची मळणी हुती, त्या येळला खळ हुतीत बैलं असायची. रोळ फिरवून मळणी असायची. ह्यायेळंचच मी बसलो हुतो राखत. तुझा तात्या मी रात्रीला इथंच मळ्यात झोपायला हुतो. त्यनी भाकरी घिवून यायला घराकडं गेलतीत. मी वाट बघत बसली हुती त्यंची. लांबनं खंदील दिसल त्यनी येतेलं. त्यनी आलीत आणि म्हणालीत बायी चल घराकडं आईच काय खर्याचं दिसना, राह्यली तर भगवंताची पुण्याई. आप्या डाक्टरला बोलवाय गेलाय तु चल. कडब्याची दोन पेंड्या त्यनी डोक्यावर घेटलीत आणि मी खंदील घेटलो आणि लगालग घराकडं गेलो. तोपतर सासुबयी गेलीती, तुझा बाबा ह्यंच्या आंगावरंच आला कडबा कोणच्या मोर्तावर आणलास रे रांडच्या म्हणून वरडाला. ह्यनी बी रडालीत सासुचा ह्यंच्यावर जीव लै. शेवटाला जीव जाताना ताटातुट झाली रे. मग धा बारा दिवस मळणीकडं यायच झालं नही. पंधरा दिवसानं रानाकडं आलं ढीग हूतं तेवढंच हुतं. तेवढ्या खपल्या भरून नेलं. रोज येणजाणं चालु झालं, ह्या शिवच्या दगडाजवळंच पच्चेरभर खपली पडलीती. कुठलं पडलंय कुणास ठावक म्हणून तिकडं नदर लावली नाय. आठपंधरा दिवस गेल्यावर तिथं एका दुरडीत खीर हळद कुकु आणि नारळाच्या परटीत दुध कोणतर ठेवलंत. मला ते बघून भ्या वाटाली.तुझ्या आजीला सांगिटलो तर ती म्हणाली तिडं ध्यान दिवू नको.षमग यिक्रम सावकर एकदिवस आला आणि बघून पायानं दूरडी लवांडली. आणि गेला. मग ऊशेरनं कळालं ती सुमी आणि तिचा भवू ह्यो कळश्या दोघं मिळून चोरली हुतीत दोन पोती. ह्याहिथंच सोनाआज्जीची हाडं पुरल्यात तिनंच वडलं तिला. तवाच्यान तीच कंबराड मोडलं. लै डाक्टर केलीत ना ना ईलाज केलीत खरं सुमीची कंबार दुखायची काय थांबीना. तवा चक्रममहाराजाला देव ईचारायला गेली. त्यनं सांगिटलं सोनाम्हातारीला निवद दाखवाय पायजे नहीतर कंबार असंच मोडणार. लै येळंन त्या राणीनं ही कथा सांगिटली सुमीची !
आपली मानसं गेलीतरीबी रक्ष्येण करत्यात बघ.
वश्याचा बाबा ताटूक घिवून आला. सोयाबीन झाकलं आणि तीघं घराकडं चालली. वश्यानं म्हातारीचा हात घट्ट धरलाता.

रिप्लाय

खुप दिवसातून तिचा मेसेज आला.
Hi...
एका ग्रुपवर हा चॅटींग करत होता. भरभर येणार्या मेसेजमुळे व्हायब्रेट मोडमुळे मोबाईल खरखर वाजत होता. 
तिचा आलेला मेसेज पाहून क्षणाची ही ऊसंत न घेता मोबाईल म्युट केला, आणि तिला hello आणि चार स्मायल्या असा रिप्लाय टाकला. 
आणि बसला वाट बघत, कधी तिचा रिप्लाय येतो असं वाटायला लागलं. 
दोन मिनटानंतर ब्लु टीक आली, मेसेज सीन झाला पण रिप्लाय नाही आला.
दोनाची पाच मिनीट झाली, परत मेसेज केला तर तिला वाटेल की हा भलताच माझ्या मागे लागलाय. असा विचार करून शांत बसला.
बैचेन झाला होता. तिचं स्टेटस काय आहे ते तरी बघु म्हणून तिच्या प्रोफाईल वर डोकावला, दोन खाली तोंड घातलेल्या रडक्या स्मायल्या होत्या, निमित्त सापडलं. परत मेसेज टाकला,
स्टेटस असं का ?
दोन मिनीट परत गेली, त्यात तो विचार करायला लागला, ही का दुःखी असेल ? कदाचित तिच्या बी.एफ चं आणि तिच काहीतरी खटकलं असेल. हिला जरा बघितलं पाहीजे.
रिप्लाय आला.
डीपी लावायला फोटो नाही म्हणून कसतर वाटतंय.... विथ चार डोळ्यातून पाणी येणार्या हसणार्या स्मायल्या.
ह्यान परत रिप्लाय दिला.
Ohhh.....
आणि झटकनं यु.सी ब्राऊझरवरून गुगल वर गेला. तिथं cute, gorgeues girl असं काहितर टाईप केलं. गुगलंन स्पेलिंग सुधारून did you mean
असं सांगून काही फोटो रिझल्ट दिले. तिथून चारपाच फोटो डाऊनलोड करून ब्राऊझर एकझिट केलं. गॅलरीत येऊन डाऊनलोडेड फोटो चाळू लागला, त्यातला एक काळ्या टाॅपमधला सुंदर गालावर खळी असणार्या मुलीचा फोटो त्याला आवडला. तो फोटो झुम करून पाहीला गालात बारिक हसला, डोक्यात बरोबर टाळूवर तर्जनीन खाजवला. आणि शेअर ऑन व्हाटसप केलं.
तिला फोटो गेला. त्याखाली कॅपशन दिलं like u....
परत वाट बघत बसला.
अर्ध्यातासाने रिप्लाय आला.
Gn zopte me..
ह्यानं परत मेसेज केला. Gn. Sd. Tc....
परत परत बघत राहिला ती मेसेज सीन करते की नाही. शेवटपर्यंत सीन झालं नाही. कुठूनतरी जुन्या आठवणी येत होत्या, ज्या आवडायच्या अशा आठवणीत रात्रीचे दोन वाजले, कधी झोप लागली ते त्यालाच कळालं नाही.
सकाळी जाग आली तेव्हां सहा वाजले होते. मोबाईल हातात घेतला आणि व्हाटसप उघडलं. मेसेज सीन झाला होता आणि तिनं तशाच कलरच्या टाॅपमधला फोटो डीपी लावला होता........

लहान असताना

मी लहान असताना पाटीवर अभ्यासा व्यतिरिक्त काहीच लेखन करत नव्हतो, एकदा तसा प्रयत्न केला. पाटीवर 'व्हयमालीच्या' अशी जोडाक्षरयुक्त शिवी लिहली होती, ती शिवी मी सागर्याच्या पाटीवर लिवून त्याला उरपाट्या साईडने पाटी दिली, त्यानं ज्यावेळी पाटी बघितली, त्यो भडकला, त्यावेळी शांत त्वांड करून थांब तुझ बयीला नाव सांगतो म्हणटला आणि डिंब सागर्याने पाटी घाटगे बयीला दावली, त्यावेळी घाटगे बाई भडकून मला त्याच पाटीची कडं तुटस्तुकर मारलं. मला सागर्याची पाटी फूटली याचा आनंद झाल्ता. माझी पाटी शाबूत होती. त्यादिवसापास्न घरात येवून रात्री अकरापर्यंत अभ्यास करायचो. आज्जास्नी नाव सांगितलं तर माझं आवघड हूतं, म्हणून मी अभ्यास करताना जोरात वाचायचो. अभ्यासाव्यतिरिक्त लेखनावरनं माझं मन उठलं हुतं, तरी मला निबंध लिहायला आवडायचं.
.............................................
लहान असताना रात्री मी अंगणात शेंगा, वल्ली सांडगं, डाळ आणि गुळ खात बसायचो. वरती ढगात बघायचो आणि आपल्या हद्दीत किती चांदण्या हायीत ते बघायचो. पुर्ण तळापास्नं ढगापर्यंत आपलंच सगळ हाय असं समजायचो, आमच्याच हाद्दीतनं हि विमानं जात्यात असं वाटायचं. मला कधीकधी त्यांच्यावर कर लावावा असं वाटायचं. मग मी एकदा आमच्या शहरातल्या पावण्यांच्याकडे गेलतो ते पहिल्या मजल्यावर राहायचे, त्यांच्या घरावर पण घरं होती, ते श्रीमंत असले तरी त्यांनला ढगापर्यंत हद्द नव्हती त्यामुळे मला त्यांचं पाप वाटायचं.
नमीच्या प्रेमात पडल्यावर मी रात्री उठून एकटाच अंगणात बसायचो आणि एकेकदा चांदणी पडली की मी लै खुश व्हायचो पण ते प्रेम एकतर्फीच राहीलं, मी तिला असं काही बोलून तिला दुखवावं असं वाटायचं नाही.
....................................................
मला लहाणपणी सगळे सैनिक म्हणायचे, त्यामुळं मला झंडा दिवसादिवशी भारी वाटायचं. मी दहा रूपयेची सगळ्यात जास्त स्टीकर घ्यायचो. मी एकदा ते स्टीकर छातीवर लावलं होतं.
...........................
लहान असताना देशाचा विचार करायचो त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही कडेला सोयाबीन, शाळू अशी पिकं घेवून ज्यांना खायला नही त्यानला त्याचे पैसे द्यावे असं वाटायचं.
...............................................
लहान असताना बायीनी विचारलं हुतं तुमाला कुठला ऋतु आवडतो त्यावेळी मी पावसोळा आवडतो म्हणून सांगायचो. बायी मला शाबासकी द्यायच्या, आणि सगळ्यांना सांगायच्या श्रेणिक सगळ्यांचा विचार करतो, मग पावसाळ्यावर अर्धा तास बोलायच्या, मला पावसाळ्यात वढा यिवून शाळा चुकवायला मिळायची आणि बंधार्यातली मासं पकडायला आवडायची म्हणून मी असं म्हणटलं होतं बायीनी वेगळा अर्थ काढला.
.............
मी आता हे आठवून हसत असतो smile emoticon

शेरलाॅक होम्स

रानातनं हात्तीगवताचा बिंडा आणून टाकलो, पुढ बघितलो तर माझा जगप्रसिद्ध मित्र शेरलाॅक होम्स ऊभा होता. मी म्हणटलो शेरल्या लै दिवसानं आलायसं.?
काय करायचं तूझी आठवण आली म्हणून आलो बघ. 
मी विचारलो, नविन काय लफडी ते हायीत काय नही ? 
माझ्या प्रश्नाचे उत्तर न देताच मलाच प्रतिप्रश्न केला.
तूझ्याकडे दोन जनावरं आहेत, पैकी एक गाय आणि दूसरं तीनचार महिन्याचं वासरू असण्याची शक्यता आहे, काय मी बरोबर बोललो.?
(ह्ये बेणं पहिलापास्नंच असलं हाय, सगळ बरोबर हूडकून काढतंय, आणि मला डोस्क्याला ताप देतंय. ) 
मी म्हणटलो राईट ! कसं काय वळखलास ?
उकिरड्याकडे बोट दाखवत म्हणाला, तिथे पडलेल्या शेणावरून ओळखलो. 
बोंबला, कुणाला कशाचं आणि ह्यला उकिरड्याचं. 
मग आम्ही घराकडे आलो. मी फ्रेश होऊन आलो. 
घरात कोण नसल्यानं मला बरं वाटत होतं. ह्यानं आपली चिलीम काढली. मला म्हणटला, तंबाखू दे...
तसं मी बापांचा पानपुडा घेतला आणि त्याच्यापुढे ठेवला. जर्दा तंबाखू घेऊन त्यानं चिलिम भरली आणि पेटवून बसला वढत. 
मला म्हणटला दोन कश मार की ! 
मी म्हणटलो, असलं काय करायचं नाय स्मोकिंग ईज इंजूरियस टू हेल्थ !
ते म्हणटलं, खोट्टं आसतंय रे सगळं. 
मी म्हणटलो असू दे, आजून माझं व्हायचं जायचं हाय, तु काय सुक्काळीच्या हिकडंन तिकडं बोंबलत हिंडत असतोस. तुमच्या घरात कावत नाहीत. 
शेरलाॅक हसत होता. 
मग मी त्याला लाडू चिवडा चकल्या शंकरपाळ्या दिलो. 
ते खात बसला, तेवढ्यात मी कापडं घातली, केसं विंचरली तयार झालो. 
हिकडं हा फराळ संपवत होता. दोन कप चहा ठेवलो. 
त्याला विचारलो सुक्कं पेणार काय दुधाचं ? 
त्यो म्हणटला, 'ओह आय लव्ह गोमाता, दूधाचा पेणार !' 
मग मी त्याला पेल्यात आणि मला कपात चहा आणलो आणि त्याच्यापुढं ठेवलो. 
ह्यो गडी संक्रातीला पुजायच्या कुळ्ळीचा अॅश ट्रे म्हणून वापर करत होता. बुद्धिमानंच हाय बेणं तेवढं. 
वढं ! म्हणटलो 
काय ? 
चहा रे !
वढतो वढतो म्हणत पेल्याला हात लावला, चटका बसला. 
मला म्हणटला, 'अशा टायमाला मला सई ताम्हणकरची आठवण येते !'
आता सकाळपारी सईची आठवण येण्यासारखं काय हाय तिच्यात असा प्रश्न पडला, मग मला दूनियादारी आठवली. मी जोरात हसलो. 
ते म्हणटलं, काय झालंय तुला हासायला ? 
आरे ते शनिमातल्या पोरींच काय खरं नसतंय बघ. मी म्हणटलो.
तर हे म्हणटलं सई ला काय म्हणायचं नही,तिथं तुला नो एंट्री आहे.
मग मी चपलं अडकवली. गोठ्यात जावून वैरण टाकून आलो. शेरलाक म्हणटला चल आज आपल्याला एका महत्वाच्या कामावर जायचं आहे. 
चल मी तूझ्याअगोदर तयार हाय. झंगाट काय हाय सांग की जरा. 
गाडीत बसल्यावर सांगतो चल म्हणटला. 
मग आम्ही दोघं गाडीत बसलो. गाडी वळवून आम्ही चाललो. 
नागाच्या पिल्याला का गं खवळिलं गाण लाव म्हणटलो. 
त्यानं माझी इच्छा पुर्ण केली. गाण लावलं. मग मी त्याच्या गाडीत असलेला पेपर घेवून वाचालो. असंच धा वीस मिनटं गेली. 
मग एकदम शेरलाक बोलला. 'काल वडगावच्या जनावरच्या बाजारतंन एक पंढरपुरी रेडा गायब झालाय. काल सकाळी त्या रेडामालकाचा मला फोन आलता. तुझ्याकडं यायच्या आधी मी त्याला भेटून आलो. सगळी प्राथमिक माहिती घेतली. त्यानुसार रेडा हा मालकाचा ऐकणारा होता, हा सगळा घोळ झाला तेव्हां मालक हाॅटेलमध्ये वडासांबर आणि चहा पिण्यास गेला होता. परत येतोय तर चिंचेच्या झाडाखालून रेडा गायब होता. त्यांनी बराच शोध घेतला पण शेवटपर्यंत सापडला नाही. त्यामुळे तो मालक अस्वस्थ आहे. मी सकाळी गेलो होतो तेव्हां तो सारखा सारखा बेशुद्ध होत होता. त्याच्या गोठ्याकडे जावून मी रेड्याच्या पावलाचे ठसे घेतले. माझ्या तपासाची पद्धत तुला काय नविन नाही. तसा तो रेडा किमंती होता, सव्वा लाखाची मागणी आली होती पण दीड लाखासाठी मालक अडून बसला होता. त्यामुळे होवु शकत रेड्याचं अपहरण असं मला वाटतं. 
शेरलाक घडाघडा बोलला. 
माझ्या मनात अनेक विचार येत होते. हातकणंगलेत गेल्यावर गाडी थांबली. आम्ही एका हाॅटेलात गेलो, पुरीभाजी खाल्ली. बाहेर आलो पानपट्टी खोक्यातंन त्यानं कटसाईज सिगरेट घेतली आणि मला मसाला पान घेतला. परत गाडी सूरू झाली. थेट वडगावच्या जनावर बाजारात आली. 
मग आम्ही त्या चिंचेच्या झाडाखाली आलो. होम्सने खिशातला पेपर काढला आणि माझ्या हाती सोपवत म्हणटला, हे बघ ते आपल्या क्लायंटच्या रेड्याच्या पायाचे ठसे. 
जनावरांचाच बाजार असल्याने शेण चाच सडा होता. होम्स माझ्यापासून दूर जावून सिगरेट ओढत होता. एकदम मला बोलवला इकडं ये. तो तुझ्या हातातला पेपर दे. हे बघ हे दोन्ही ठसे मिळते जुळते आहेत. 
मला बरं वाटलं. सुरवातीला असे काही पूरावे मिळाले की शेरलाॅक खूश व्हायचा. माझाही आनंद त्यातंच होता. आम्ही ठशांचा माग काढत गेलो. तर ते एका डांबरी रस्त्यावर जावून लुप्त झाले होते. परत परत आम्ही त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक एक किमी शोध घेतला. पण हाती काहीच लागलं नाही. यातंच दूपारचे दोन वाजले. 
शेरलाॅकचा मोबाईल वाजला, मालकाच्या बायकोचा फोन होता. ती काय झालं असं विचारणा करत होती. शेरलाॅकने थाप मारली, आम्ही संध्याकाळी सहापर्यंत तुमच्या रेड्याला हजर करू. 
मी म्हणटलो असं कसं काय सांगितलास ? रेडा गावला नही तर काय करायचं ? 
होम्स म्हणटला, या क्षणाला आपल्याला रेड्यापेक्षा रेड्याच्या मालकाच्या तब्बेतीची काळजी घ्याची आहे. 
होम्स खूप दयावान माणूस होता. आम्ही एका कट्ट्यावर बसलो होतो. शेरलाॅकने सलग तीन सिगरेटी वढल्या, आणि नंतर विचारमग्न होत कधीतर झोपून गेला. मी जागाच होतो. दिवाळीच्या दिवसात मुली छान छान ड्रेस घालून हिंडत होत्या, मी त्यांना पहात बसलो होतो. काहि मुली हौसेने साडी नेसतात पण तेवढ्या चांगल्या दिसत नाहीत त्या. तेवढ्यात एक गैराम्हसरांचा कळप तिथून जात होता, एक काळीकुट्ट आज्जी बाई त्यांना चरवून घेऊन परत निघाली होती.
माझ्या डोक्यात अनेक विचार चालू झाले. त्यावर विचार न करता, मी शेरलाॅक ला गदागदा हलवून उठविलो. शेरलाॅक उठला त्याला त्या कळपाकडं बोट करून दाखविलो, त्यानं जोरात टाळी दिली. 
अर्धा एक तास आम्ही तिथेच बसलो. नंतर शेरलाॅक म्हणटला चलो. चलो म्हणटलं. 
तो जो कळप चालला होता त्यातल्या गायी म्हशी काहीशा नाराजीनेच एका ठिकाणच्या गोठ्यात जात होत्या. गाडी रस्त्यावर कडेला घेतली आणि आम्ही दोघे त्या गोठ्यात शिरलो. ती आज्जी तिथंच असलेल्या एका हौदावर हात पाय धूवत होती. 
आज्जीनं विचारना केली. कुठून आलात काय काम आहे ? 
आज्जीला म्हणटलो आज्जी गोठा जनावर बघायला आलोय. आज्जीला बोलण्यात गुंगवनं हे माझं काम होतं. होम्स गोठ्यात शिरून पेपर काढून ठसं तपासण्यात गर्क होता. 
आजीला मी म्हसरांची संख्या विचारली तर तीनं सांगितलं, पाच रेडकू पंधरा म्हशी आणि तीन रेडे आहेत. 
होम्सने शिट्टी मारली. अर्थात त्याला सुगावा लागला होता. मग आज्जीला मी सत्यरामायनाची कथा सांगितली. तेवढ्यात आज्जीचा मुलगा श्रीरपती बुलेटवरून आला, होम्सही तिथं आला, होम्सने त्याला पूरावा दाखवला. 
परत रेडे मोजण्याचा कार्यक्रम चालू झाला. चार रेडे निघाले, आज्जीनं तीन सांगितले होते. श्रीपती म्हणटला, एक रेडा जास्तीचा हाय.
त्योच तुमचा असेल. आम्हाला आमचा रेडा गावला. श्रीपतीनं एक टमटमची व्यवस्था करून दिली. आम्ही त्या रेड्याला मालकाच्या घरी नेलं. त्याच्या बायकोने रेड्याला ओवाळून घेतलं. मालक खूशीत होता, खाटाखालून पंधरा हजारच्या नोटा दिल्या. वरनं वाडीचं दोनं किलो पेढं दिलं. 
मालक म्हणटला होम्स तुम्ही नसता तर मी नसतो. 
शेरल्या माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणटला हा माझा मित्र नसता तर खूप ऊशिर लागला असता. मग मला भारी वाटलं. आम्ही तिथून निघलो. 
होम्स गाडीत गुणगुणायला लागला या रेड्याच्या पिल्लाला कसं गं हुडीकलं ?

दिवाळीचं बाजार

बंड्या दिवाळीचं बाजार आणायला दूकानला गेलता. सामानाची चिठ्ठी दुकानदारकडे दिली, ठराविक सामान कुठलं द्यायचं ते दुकानदारानं विचारून घेतलं, म्हणजे उदबत्ती झेड ब्लॅक, वाशेल तेल आल्मंड ड्राप्स, साबन मोती. असं. चिठ्ठीच्या वर दोन दोन उभ्या रेषा मारून त्यात मध्येच श्री असं लिवलं.
मग ती चिट्टी आमल्याकडं दिली, आमल्यानं फूटाणंडाळ तोंडात टाकत टाकत एक नजर चिठ्ठीवरंन फिरवली, चिठ्ठीवर निप्पो सेल ठेवलं आणि पेनानं टिकमार्क करत एकेक वस्तू द्यायला. 
बंड्या उगंचच हिकड तिकडं बघत ऊभा राहिला. तेवढ्यातंच एकटी पोरगी लेडिज सायकलवरून आली, आली ते आली पळत आली, कावंटरवर येवून पिशवी आदळली, आणि म्हणटली, काका काका, 
दूकानदार पण काय बाळा असं चष्म्याच्या आतंनच डोळं मीचकत मायेने म्हणटला, नाहीतर बंड्या चिठ्ठी देताना दूकानदारानं चिठ्ठी हिसकावून घेतली होती. पुढं ती मुलगी म्हणटली काका तुम्ही मघाशी मला पिसा साखर दिली, मामीना लेसा साखर हवी होती. 
दूकानदार म्हणटला, अच्छा अच्छा, आमोल हिला लेसा दे. 
दूकानदारात मोठ्ठा बदल झालता, आमल्या म्हणायचं, ते आमोल म्हणटला. म्हणून काय आमल्या हारकला नही, शांत थोबाड करून बेसनपीठाच्या मेणकागदाला गाठ मारत तिच्याकडं थोबाड पाडून बघत तसंच गेला आणि लेसा देवून आला. परत त्या पोरगीनं दहा रूपये देत म्हणटल काका, फाईव्ह स्टार द्या. परत काका हारकला, खुर्चीतंन उठत जवळच असलेल्या कॅडबेरीच्या चौकोनी पेटीतून दोन फाईव्ह स्टार काढून दिलं, बंड्या मनातल्या मनात विचार करत होता. गोड गोड वस्तू दूकानदार स्वतःजवळ ठेवून घेतो, आणि नोकराला तेवढं फूफाट्यात घालतो. विचार आला आणि गेला, मग त्या पोरगीनं पिशवी हातात सरकवली आणि ऊसाची चिपाडं काढावी तसं दातानंच चाॅकलेटचं कागद फाडलं, बंड्या तिकडंच बघत होता, तीनं पण बंड्याकडं बघितलं, बंड्या हसला. जाता जाता तिनं कानावर आलेली केसं बोटानं माग सारली, आणि चाॅकलेट खात गेली, त्यात फाईव्ह स्टार हे चाॅकलेट बिळबिळीत त्यामुळं ती तोंड गोलाकार फिरवत गेली. बंड्या येडं झालतं. आमल्याला म्हणटला सामान भरून ठेव पैशे घिवून येतो. आमल्या म्हणटला लवकर ये .
बंड्या तिच्या माग माग चालंल, वाटंत गण्या भेटला, गण्या लै बोलतंय तेवढ्यात डाव जायाचा असं त्याला वाटलं. गण्याला म्हणटला गण्या जरा आरजंट काम हाय, संध्याकाळला चौकात बसूया.
गण्याला गंडवून हे तिच्या मागं गेलं. शेवटला ती बाळूकाकाच्या घरात घूसली. ही त्या बाळ्याची भाची हे बंड्यानं वळखल. 
आलंय ते आलंय राज्याला भेटून जावूया म्हणटला राज्याच्या घरात गेला तोपर्यंत घराला कुलूप. याला बरं वाटलं राज्या काय कोणपण कवानहीकवा कामाला येतोयच. परत मागं फिरून येताना ती बाहेर येवून बाळ्याच्या पोराला चाॅकलेट चारतेल बघितलं. तिरकस बघत चालला, ती पण एकटाक बघत होती, एकदा शेवटच बघून घ्याव म्हणून सरळ बघितलं तर काटापैकी स्माईल दिली. बंड्या हवत गेलं. ही काय सूधरू देणार नही असं वाटलं. मग त्यानं दोनी हात खिशात घातलं पँटच्या आणि जोरात चालत सूटलं. मध्येच त्याला वाटलं आपन उगचच जोरात चालतोय. 
दूकानला आला, पैशे भागवलं, सामान घेटलं, घरात आणून टेकवलं आणि बाहेर कट्यावर येवून बसला. विनाकारणंच डोकं खाजवत बसला, कायपण होवू दे हिला नाय सोडायचं हे सारख सारखं म्हणत बसला. घड्याळात सारख बघायला लागला कधी एकदा संध्याकाळ होत्या अस त्याला वाटलं. कायतर करत करत वेळ काढला. 
संध्याकाळला घरात थाप ठोकली राज्याकडं चाललोय म्हणून आणि सटकला. 
तिच्या घरापुढं आला, तर ती सूतळी बाँब लावत होती, आयला असहिष्णू ! बाँब लावायची आणि लांब जावून कानात बोटं घालून उभा राहायची, हिच्यासारख्या पोरीनं फुरफुरबाजा उडवला तर किती छान दिसली असती असं त्याला वाटलं, मग ती घरात घूसली ह्याला वाईट वाटलं. मग हा राज्याच्या कट्ट्यावर जावून बसला. राज्याचा बाबा तंबाखू मळत बाहेर आला, काय बंड्या लै दिवसातंन ? बंड्या म्हणटला राजूकडं आलतो.
तंबाखू चिमटीतंन धरून वटात ठेवत राज्याचा बाबा म्हणटला गेलाय कुठतर गावात यील पाच मिनटात बस तवर. असं सांगून ते आत गेले. बंड्या ते आत जायचीच वाट बघत होता. तेवढ्यात ती पोरगी गॅलरीत आली. बंड्याकडं बघत होती. तिच्या हातात मोबाईल होता, ती कायतर खुणवत होती. बंड्याच्या ध्यानात ते येईना. मग ती मोबाईल वर बोट नाचवत असलेल यानं बघितलं, मग उगच मान डूलवली तर तीनं मोबाईल खाली ठिवून हाताची नऊ बोटं दोन वेळा दाखवली. ह्याची ट्युब पेटली, हा परत मानहलव्या झाला, मग तीनं अशा भाषेतंच अख्खा मोबाईल नंबर सांगितला. काॅनटेक्ट बाळू नावानं सेव्ह केलं आणि व्हाटसपला जावून तीला शोधला, hi....... असा मेसेज पाठवला, मग तीनं एक स्माईली पाठवली, आणि खरोखर पण स्माईल देत आत गेली. 
राज्याला लागू दे घोडा म्हणटला आणि हा घरला गेला. तीन परिणीती चोप्राचा डीपी ठेवला होता, आणि स्टेटस enjoying holidays m.u my friends heart emoticon असा ठेवला होता. बाकबाक मेसेजवर मेसेज करत राहिला, name ?
Clg ? 
वगैरे. एकपण रिप्लाय परतला नाही. कंट्ळून झोपला.
दूसर्या दिवशी सकाळी उठून पाहतोय तर पंधरा मेसेज तिचे आलते, वरनं तिनसुद्धा ह्याचा बायोडेटा दोनचार रकानं वाढवूनंच म्हणजे hobby, fav hero? Sport, bike वगैरे विचारलं. बंड्यानं सगळी उत्तर दिली. ती ऑनलाईनच होती, एकेक करत रिप्लाय देताना, wow, nice, awesome असे तिचे रिप्लाय येत असल्याने ह्याला बरं वाटलं. मग तिला प्रपोज कराय पाहीजे अस वाटत असताना तिचा मेसेज आला gf ? 
मग यानं नाही असं सांगितलं, सोबत दोन रडक्या स्मायल्य पाठवल्या, मग तिला कोण bf आहे का असं त्यानं विचारलं. स्टिल आय म सिंगल अस तीनं सांगितलं. ह्याला बेक्कार घाई झालती i love you फाॅरवर्ड केलं. ब्लु टीक दिसली बराच वेळ ती ऑनलाईन होती. हे वाट बघत बसलं, गोलात दिसणारी परिणीता एकदमचं गायब झाली, तीनं ब्लाक केलतं. ........
पुढंच पुढं.