शेरलाॅक होम्स

रानातनं हात्तीगवताचा बिंडा आणून टाकलो, पुढ बघितलो तर माझा जगप्रसिद्ध मित्र शेरलाॅक होम्स ऊभा होता. मी म्हणटलो शेरल्या लै दिवसानं आलायसं.?
काय करायचं तूझी आठवण आली म्हणून आलो बघ. 
मी विचारलो, नविन काय लफडी ते हायीत काय नही ? 
माझ्या प्रश्नाचे उत्तर न देताच मलाच प्रतिप्रश्न केला.
तूझ्याकडे दोन जनावरं आहेत, पैकी एक गाय आणि दूसरं तीनचार महिन्याचं वासरू असण्याची शक्यता आहे, काय मी बरोबर बोललो.?
(ह्ये बेणं पहिलापास्नंच असलं हाय, सगळ बरोबर हूडकून काढतंय, आणि मला डोस्क्याला ताप देतंय. ) 
मी म्हणटलो राईट ! कसं काय वळखलास ?
उकिरड्याकडे बोट दाखवत म्हणाला, तिथे पडलेल्या शेणावरून ओळखलो. 
बोंबला, कुणाला कशाचं आणि ह्यला उकिरड्याचं. 
मग आम्ही घराकडे आलो. मी फ्रेश होऊन आलो. 
घरात कोण नसल्यानं मला बरं वाटत होतं. ह्यानं आपली चिलीम काढली. मला म्हणटला, तंबाखू दे...
तसं मी बापांचा पानपुडा घेतला आणि त्याच्यापुढे ठेवला. जर्दा तंबाखू घेऊन त्यानं चिलिम भरली आणि पेटवून बसला वढत. 
मला म्हणटला दोन कश मार की ! 
मी म्हणटलो, असलं काय करायचं नाय स्मोकिंग ईज इंजूरियस टू हेल्थ !
ते म्हणटलं, खोट्टं आसतंय रे सगळं. 
मी म्हणटलो असू दे, आजून माझं व्हायचं जायचं हाय, तु काय सुक्काळीच्या हिकडंन तिकडं बोंबलत हिंडत असतोस. तुमच्या घरात कावत नाहीत. 
शेरलाॅक हसत होता. 
मग मी त्याला लाडू चिवडा चकल्या शंकरपाळ्या दिलो. 
ते खात बसला, तेवढ्यात मी कापडं घातली, केसं विंचरली तयार झालो. 
हिकडं हा फराळ संपवत होता. दोन कप चहा ठेवलो. 
त्याला विचारलो सुक्कं पेणार काय दुधाचं ? 
त्यो म्हणटला, 'ओह आय लव्ह गोमाता, दूधाचा पेणार !' 
मग मी त्याला पेल्यात आणि मला कपात चहा आणलो आणि त्याच्यापुढं ठेवलो. 
ह्यो गडी संक्रातीला पुजायच्या कुळ्ळीचा अॅश ट्रे म्हणून वापर करत होता. बुद्धिमानंच हाय बेणं तेवढं. 
वढं ! म्हणटलो 
काय ? 
चहा रे !
वढतो वढतो म्हणत पेल्याला हात लावला, चटका बसला. 
मला म्हणटला, 'अशा टायमाला मला सई ताम्हणकरची आठवण येते !'
आता सकाळपारी सईची आठवण येण्यासारखं काय हाय तिच्यात असा प्रश्न पडला, मग मला दूनियादारी आठवली. मी जोरात हसलो. 
ते म्हणटलं, काय झालंय तुला हासायला ? 
आरे ते शनिमातल्या पोरींच काय खरं नसतंय बघ. मी म्हणटलो.
तर हे म्हणटलं सई ला काय म्हणायचं नही,तिथं तुला नो एंट्री आहे.
मग मी चपलं अडकवली. गोठ्यात जावून वैरण टाकून आलो. शेरलाक म्हणटला चल आज आपल्याला एका महत्वाच्या कामावर जायचं आहे. 
चल मी तूझ्याअगोदर तयार हाय. झंगाट काय हाय सांग की जरा. 
गाडीत बसल्यावर सांगतो चल म्हणटला. 
मग आम्ही दोघं गाडीत बसलो. गाडी वळवून आम्ही चाललो. 
नागाच्या पिल्याला का गं खवळिलं गाण लाव म्हणटलो. 
त्यानं माझी इच्छा पुर्ण केली. गाण लावलं. मग मी त्याच्या गाडीत असलेला पेपर घेवून वाचालो. असंच धा वीस मिनटं गेली. 
मग एकदम शेरलाक बोलला. 'काल वडगावच्या जनावरच्या बाजारतंन एक पंढरपुरी रेडा गायब झालाय. काल सकाळी त्या रेडामालकाचा मला फोन आलता. तुझ्याकडं यायच्या आधी मी त्याला भेटून आलो. सगळी प्राथमिक माहिती घेतली. त्यानुसार रेडा हा मालकाचा ऐकणारा होता, हा सगळा घोळ झाला तेव्हां मालक हाॅटेलमध्ये वडासांबर आणि चहा पिण्यास गेला होता. परत येतोय तर चिंचेच्या झाडाखालून रेडा गायब होता. त्यांनी बराच शोध घेतला पण शेवटपर्यंत सापडला नाही. त्यामुळे तो मालक अस्वस्थ आहे. मी सकाळी गेलो होतो तेव्हां तो सारखा सारखा बेशुद्ध होत होता. त्याच्या गोठ्याकडे जावून मी रेड्याच्या पावलाचे ठसे घेतले. माझ्या तपासाची पद्धत तुला काय नविन नाही. तसा तो रेडा किमंती होता, सव्वा लाखाची मागणी आली होती पण दीड लाखासाठी मालक अडून बसला होता. त्यामुळे होवु शकत रेड्याचं अपहरण असं मला वाटतं. 
शेरलाक घडाघडा बोलला. 
माझ्या मनात अनेक विचार येत होते. हातकणंगलेत गेल्यावर गाडी थांबली. आम्ही एका हाॅटेलात गेलो, पुरीभाजी खाल्ली. बाहेर आलो पानपट्टी खोक्यातंन त्यानं कटसाईज सिगरेट घेतली आणि मला मसाला पान घेतला. परत गाडी सूरू झाली. थेट वडगावच्या जनावर बाजारात आली. 
मग आम्ही त्या चिंचेच्या झाडाखाली आलो. होम्सने खिशातला पेपर काढला आणि माझ्या हाती सोपवत म्हणटला, हे बघ ते आपल्या क्लायंटच्या रेड्याच्या पायाचे ठसे. 
जनावरांचाच बाजार असल्याने शेण चाच सडा होता. होम्स माझ्यापासून दूर जावून सिगरेट ओढत होता. एकदम मला बोलवला इकडं ये. तो तुझ्या हातातला पेपर दे. हे बघ हे दोन्ही ठसे मिळते जुळते आहेत. 
मला बरं वाटलं. सुरवातीला असे काही पूरावे मिळाले की शेरलाॅक खूश व्हायचा. माझाही आनंद त्यातंच होता. आम्ही ठशांचा माग काढत गेलो. तर ते एका डांबरी रस्त्यावर जावून लुप्त झाले होते. परत परत आम्ही त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक एक किमी शोध घेतला. पण हाती काहीच लागलं नाही. यातंच दूपारचे दोन वाजले. 
शेरलाॅकचा मोबाईल वाजला, मालकाच्या बायकोचा फोन होता. ती काय झालं असं विचारणा करत होती. शेरलाॅकने थाप मारली, आम्ही संध्याकाळी सहापर्यंत तुमच्या रेड्याला हजर करू. 
मी म्हणटलो असं कसं काय सांगितलास ? रेडा गावला नही तर काय करायचं ? 
होम्स म्हणटला, या क्षणाला आपल्याला रेड्यापेक्षा रेड्याच्या मालकाच्या तब्बेतीची काळजी घ्याची आहे. 
होम्स खूप दयावान माणूस होता. आम्ही एका कट्ट्यावर बसलो होतो. शेरलाॅकने सलग तीन सिगरेटी वढल्या, आणि नंतर विचारमग्न होत कधीतर झोपून गेला. मी जागाच होतो. दिवाळीच्या दिवसात मुली छान छान ड्रेस घालून हिंडत होत्या, मी त्यांना पहात बसलो होतो. काहि मुली हौसेने साडी नेसतात पण तेवढ्या चांगल्या दिसत नाहीत त्या. तेवढ्यात एक गैराम्हसरांचा कळप तिथून जात होता, एक काळीकुट्ट आज्जी बाई त्यांना चरवून घेऊन परत निघाली होती.
माझ्या डोक्यात अनेक विचार चालू झाले. त्यावर विचार न करता, मी शेरलाॅक ला गदागदा हलवून उठविलो. शेरलाॅक उठला त्याला त्या कळपाकडं बोट करून दाखविलो, त्यानं जोरात टाळी दिली. 
अर्धा एक तास आम्ही तिथेच बसलो. नंतर शेरलाॅक म्हणटला चलो. चलो म्हणटलं. 
तो जो कळप चालला होता त्यातल्या गायी म्हशी काहीशा नाराजीनेच एका ठिकाणच्या गोठ्यात जात होत्या. गाडी रस्त्यावर कडेला घेतली आणि आम्ही दोघे त्या गोठ्यात शिरलो. ती आज्जी तिथंच असलेल्या एका हौदावर हात पाय धूवत होती. 
आज्जीनं विचारना केली. कुठून आलात काय काम आहे ? 
आज्जीला म्हणटलो आज्जी गोठा जनावर बघायला आलोय. आज्जीला बोलण्यात गुंगवनं हे माझं काम होतं. होम्स गोठ्यात शिरून पेपर काढून ठसं तपासण्यात गर्क होता. 
आजीला मी म्हसरांची संख्या विचारली तर तीनं सांगितलं, पाच रेडकू पंधरा म्हशी आणि तीन रेडे आहेत. 
होम्सने शिट्टी मारली. अर्थात त्याला सुगावा लागला होता. मग आज्जीला मी सत्यरामायनाची कथा सांगितली. तेवढ्यात आज्जीचा मुलगा श्रीरपती बुलेटवरून आला, होम्सही तिथं आला, होम्सने त्याला पूरावा दाखवला. 
परत रेडे मोजण्याचा कार्यक्रम चालू झाला. चार रेडे निघाले, आज्जीनं तीन सांगितले होते. श्रीपती म्हणटला, एक रेडा जास्तीचा हाय.
त्योच तुमचा असेल. आम्हाला आमचा रेडा गावला. श्रीपतीनं एक टमटमची व्यवस्था करून दिली. आम्ही त्या रेड्याला मालकाच्या घरी नेलं. त्याच्या बायकोने रेड्याला ओवाळून घेतलं. मालक खूशीत होता, खाटाखालून पंधरा हजारच्या नोटा दिल्या. वरनं वाडीचं दोनं किलो पेढं दिलं. 
मालक म्हणटला होम्स तुम्ही नसता तर मी नसतो. 
शेरल्या माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणटला हा माझा मित्र नसता तर खूप ऊशिर लागला असता. मग मला भारी वाटलं. आम्ही तिथून निघलो. 
होम्स गाडीत गुणगुणायला लागला या रेड्याच्या पिल्लाला कसं गं हुडीकलं ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं