पंढरपूर

सकाळी पहील्या यष्टीनं पंढरपूरला गेलतो, आत्ता आलो. असं कुठतर जायच झालं तर घरात मोबाईल घेवून जावू देत नाहीत, मी भलतीच काम करतो अशी शंका घरातल्याना असते. 
सोलापूर जिल्ह्यात आवंदा पाऊस चांगला झालाय आमच्यापेक्षा, ज्वारी कंबरबरोबर आल्या, डाळींब आणि द्राक्षे बागं कमी झाल्यात, द्राक्षे कमी झाल्यात याचा अर्थ लोक शहाणे व्हायलेत. 
एस.टी त मज्जा येतेच. सकाळी एकटा तिरसट काका आला मागच्या शिटावर बसला, माझाच पेपर वाचायला घेतला, प्रत्येक बातमीवर कमेंट द्यायला लागला गडी. धूडकूस घालालता नुसता. मग कुठनतर घसरत कारगील युद्ध ऊकरून काढला. आणि म्हणटला, कारगील जिंकलय तिथन सात देशावर आक्रमन करता येतंय. मी म्हणटलं काका कोणची सात देश ? काका म्हणटला तेवढं काय मला माहित असतंय काय ? यष्टीतली सगळी हसायला लागली मग काकानं माझ्या पेपराची फूकनी केली आणी एका हातानं दूसर्या हातावर बडवत बसला.
सांगलीत माझ्या शिटवर एक पोरगं यिवून बसलं, ते येडशीला सोलापूर जिल्ह्यात शिकायला हाय. सांगलीस्नं सोलापूरला. त्यांचा बाबा पुण्याला असतात. मग तो म्हणटला माझा अभ्यास होत नाही म्हणून मी तेवढ्या लांब हाॅस्टेलला गेलोय. मग माझं सगळ विचारून घेतला, मला म्हणटला मी अभ्यास कसं करू सांगा. 
बोंबलंल कुणाला काय विचारायच हे एकेकदा कळत नसतं पोरास्नी. 
मग मी बारावी कशा प्रकारे पास झालो ते त्याला सांगिटल. मग तो खूश झाला. मग तो देवावर आला. मी म्हणटल देव नसतोय. त्यो पण तसंच म्हणटला. मग मला विचारला पंढरपूरला कशाला चाललाय ? मग मी त्याला पिशवीतल्या भाजलेल्या शेंगा, गुळ, खजूर, राजगिरं लाडवाची पाकिट दाखवली आणि जरा खायला घातलो मग तो खात खात जोरात हसला. 
सांगोल्यात गाडी थांबते दहाएकमिनटं रिकामं व्हायला ....
यष्टीतला एकटा गेला त्यो काय पंधराच वीस मिनटं झालं तरीबी गडी आलाच नही, मग यष्टी त्याच्या पिशवीसकट यष्टी पंढरपूराला गेली. 
पंढरपूर हे काय आवडावं अस तिथ काहीच नाही. लोक सगळी कशी पांढरीफेक, तरूणांच प्रमाण हे पंधरावीस टक्केच असावं. प्रत्येक जण दिंड्या घेवून येतात, मग पालख्या वगैरे असतात. एका दिंडीचं भजनं माईकवरून दोन पोरी गात होत्या, रघूपती राघव राजाराम , पतित पावन सिताराम असं. त्याना आपन सिंगर असल्याचं फिल आलं असेल. वेगवेगळे सूर आळवत होत्या. चंद्रभागेत पाणी गढूळ असतं, तरीपण ऊड्या मारत लोक पळतात, पोहतात, एकमेकांना बूडवतात, बाहेर आलं की गंधाचा साचा घेऊन लोक तयार असतातंच. मग असंच त्या गर्दीबरोबर हिंडत गेलो, तांबडा मारूती वगैरे स्ट्रांग देव पण आहेत, सनातन प्रभात आहे, संभाजी ब्रिगेड आहे. नारायण राणे आणि खडसेंची जास्त पोश्टर लागलेली आहेत. हिंडून फिरून
परत यष्टीत येवून बसलो. तर यष्टीत एकटा फूल्ल टाईट होऊन आलता, मास्तर म्हणटला तुझ्याआयला सगळी येवून इथ दारू सोडत्यात आणि तु माळ घालून हिथनंच उद्घाटन केलंय काय रे ? मास्तर जाम भडकला. 
मग ह्यो गडी यष्टीतंच झोपला. बायका शिव्या घालालत्या. असं कायतर करत परत परत सांगोल्यात आलं. तेवढ्यात दारूड्याला हुक्की ऊठली विठ्ठल विठ्ठल गाण म्हणाय लागला. 
गाडी परत चालू झाली. सांगलीत आल्यावर निम्मी गर्दी कमी झाली, आणि उतरलीतीत त्याच्या डबल चढलीत. माझी सिट रिकामी होती, पुढं बघितलो तर पाव्हण्याची पोरगी वाटली म्हणून हाक मारली, तोपर्यंत ती वेगळीच निघाली. हारकून थँक्स म्हणटली आणि मोबाईल काढलं बॅटरी क्रिटीकली लो होवून मोबाईल झोपला. मग हसत मला म्हणटली तुला कुठतर बघितलंय. मी म्हणटलं कुठं ? तु जे. जे ला इंजिनीयरींगला आहेस ना ? मी म्हणटलं नाही. मग म्हणटली तु कॅफे क्रश ला सारखं येतोयस की नाही, होय म्हणटलो. तुला कसं माहीत? विचारलो भाव खात म्हणटली, तू एकदा स्प्राईट आणि कोल्ड काॅफी एकदम पित होतास आणि त्याचे फायदे जोरात सांगत होतास. मी तूझ्या पलिकडच्या बाजूला बसलीती ते मला ऐकू आलते, मी एकदा ट्राय केलंसूद्धा. 
मला लै हासायला आलं, कधीतर आलेली वेळं मारून नेण्यासाठी मी काहीही गंडवत असतो, हीनं ट्राय केलं grin emoticon 
मग पलिकडच्या शिटवरचा काका तिच्याकडं माझ्याकडं कानात काटकी घालून बघत होता. मग ती परत एकदा थँक्स म्हणटली, मी म्हणटलो रहू दे सोड ! 
घरात आलो. घरात भावानं पिशवी घेतली, एक डिस्क आण म्हणटलाता म्हणून आणलोतो ते बघत बसला. त्यात एक गाणं होतं नागाच्या पिल्लाला च्या चालीवर ...... 
कलियुगाच्या पुंडलीकानं आइबापाला बाहेरं काढलं, जाता जाता देव आठविलं ! 
आमचे बापा माझ्याकडे बघत होते. smile emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं