मला कधीकधी बरं वाटतं.

एका पोरगीबरोबर बोलत होतो, दोनचार महिने भारीपैकी. ती माझ्या लांबच्या मामाच्या मुलीची मैत्रीण होती. म्हणजे त्या मुलीचं ह्या आमच्या मामाच्या घरी येणं जाणं होतं. मामा मम्मीपेक्षा मोठ्ठा तरीपण आक्का म्हणतो. एकदा तो मला भेटला आणि म्हणटला काय आमची पोरगी कशी आहे ? 
मी हादरलो, भेदरलो, डोस्कं गच्च झालं. तरीपण नाटकीपणाच आव आणत कोण पोरगी ? म्हणटलं. तो म्हणटला आमची आक्का रे ! 
मग बरं वाटलं. नाहितर त्या मामाचं टक्कल संध्याकाळच्या सात वाजता पण आग वकणारं सुर्य वाटत होतं.
.............................................
एक मैत्रिण माझ्यापेक्षा वयानं एकवर्ष मोठ्ठी आहे. तिचा वाटसप नंबर गावला. म्हणजे तिच मला मेसेज केली. मग मी पण सुट्टी द्यायची नहो म्हणटलो आणि रात्री बारा काय पहाटं एक काय मोबाईलात चार्जिंग संपतंय म्हणून झोपायच्या ठिकाणी स्विच बोर्डच तयार करून चॅटींग करू लागलो. महिनादोनमहिना गेल्यावर चारपाचदा भेटल्याबोलल्यावर एकदिवस चांगल चार स्क्रिनशाॅट भरतील एवढा मेसेज उर्फ प्रेमपत्र टायीप केलो. अर्धा तास वाचली आणि रिप्लाय दिली नरद्या बेक्कारा !म्हणटली. मग मी तिच्याबरोबर बोलायचंच बंद केलो. त्याच दिवशी संध्याकाळी तिचा मोठ्ठा भाऊ आणि बाबा एकदम दिसले. मी बिनबोलता सटकायच्या बेतात होतो तेवढ्यात त्या भावानं जोरात बोलवलं श्रेण्या !
बोंबलंल म्हणटल हि दोघं मिळून निरमा लावत्यात असं वाटलं. तर तिचा भाऊ म्हणटला आमची एक म्हस द्यायची हाय कुणाला लागली तर सांग. मी थरथरत म्हणटल सांगतो नही गिराईकच घिवून येतो. मग धडधड बंद झाली आणि आतल्याआत दिल डान्स मारे झालं.
................................................
एकदा कोल्हापूरला एका जवळच्या मैत्रीणीबरोबर विद्यापिठात गेलतो. असंच हिंडायला. जाताना रेल्वेन गेलो. येताना यष्टीनं. ईचलकरंजीतन थेट जायच्या वाटणीच व्हाया यष्टीनं जयसिंगपूरला जायची दूर्बुद्धी सूचली. माझ्या गावावरून यष्टी जाणार होती. साहजिकच गावातली कोणतर असणार बघणार आणि गावभर हुणार मग गावातन घरापर्यंत कळणार ही भिती मनात होती. म्हणून मी म्हणटलं तु आधी जाऊन बस मग नंतरनं मी येतो. ती म्हणटली तु गंडवतोस मला या बसमध्ये बसवून तु दूसर्या गाडीतन जाशील. मग तीनं माझ मोबाईल ओलीस ठेवून घेतला. आणि वर गेली यष्टीत. तेवढ्यात गावातलं एकटं बी आलंच म्हणटलं गावाकडं जात्या काय ? मी म्हणटलो नही जात अजून अर्ध्या तासानं. मग ते गेलं. कोण नही ते बघून पद्धतशीर डायवर यायच्या टायमाला गेलो तर ही शेवटच्या काॅर्नर शिटाला. गाडी पाचशे मीटर गेली नशील तेवढ्यात स्टाप आला. जूनी वर्गमैत्रीण तिच्या पोराला अधिक जाउबाईला घेवून आली ते थेट शेवटच्या शिटवर. मग मी तिच्या पोरग्याला घेवून उगचच नको नको त्या गोष्टी तळमळीन विचारलो. तेवढ्यात मास्तर अवतरला. हिकडं डावानं तिकीट काढलं आणि वरनं उपकारार्थ मी काढलंय म्हणून सांगितलं. एवढ्या उशीर गंडवलेल्यावर पाणी गेलं. खरं काय ते तिनं ओळखलं. त्यानंतर एकदा सगळे एकत्र भेटणार होते त्यावेळी ती वर्गमैत्रीण आलीती ती कुठतर बोंबलून व्यक्त व्हायची चारचौघात या विचारानं मी घाबरलो होतो. नंतर तासाभरानं तीच म्हणटली मी काय कुणाला सांगितलं नाही. मी म्हणटलं सांगू पण नकोस.
...........................................
सतराशे साठ गोष्टी केल्या की बोंबाबोंब होते. पुढचा माणूस कसा येतो काहीच कळत नाही. आज परत एकट्यानं विचारलं काय म्हणत्या ?
कोण ?
तब्येत ओ.
मी म्हणटलं मला कधीकधी बरं वाटतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं