रविवार, १० सप्टेंबर, २०१७

अभ्यास

मी लहानपणी फडणवीस एवढा अभ्यास केलो असतो तर शिवाजी युनवर्सिटीतंनंच एकदम शेदोनशे उपग्रह वर सोडलो असतो. 
आणि जोतीबा जत्रंला गुलालमय, आप्पाचीवाडीला भंडारा उधळलेले फोटो उपग्रहाथ्रु काढलो असतो. 
गोमातेला जन्मताच चिप बसावी अशी लस भरवतानाच सोय केलो असतो. 
बुलेट ट्रेन ईचलकरंजीत फिरवलो असतो. 
एवढी प्रगती केलो असतो कि आमच्या जिल्ह्यातली लोकं स्वतंत्र देशच मागिटली असती. कर्नाटक वाली आमचं बेळगाव सकट सगळं घ्या खरं तुमच्या राष्ट्रात घ्या म्हणटली असती. 
मग आम्ही स्वतःच देश तयार करून राष्ट्रवादी चा पंतप्रधान केला असता. 
पण अभ्यास अभ्यास कमी पडला अध्यक्षमहोदय. 😢

पुरोगामी

मी पुरोगामी हाय. पुरोगामी असण्यात मज्या असते. मज्या म्हणजे ते लै क्रिटिकल असतंय. क्रिटिकल म्हणजेच बुद्धिमान. बुद्धी मान म्हणजे शक्तीमानचा साडु. म्हणून लै मज्या येते.
नमुन्यादाखल माझ्या दोस्ताबरोबरच्या गप्पा.
तु पुरोगामी हायीस का ?
हौ.
तु कांग्रेस चा समर्थक हायीस का ?
नही.
मग राष्ट्रवादी चा ?
हौ.
म्हणून तु पुरोगामी हायीस का ?
नही.
मग पुरोगामी म्हणजे काय ?
पुरोगामी लै आवघड असतंय. गप्प तुला कळणार नही.
हाँ.
अशा रितीने गप्पा झाल्या.
पुरोगामी असल्यानंतर प्रचंड गप्पा मारता येतेत. म्हणजे त्या मित्राबरोबर मी गप्पा मारत नही. कारण तो पुरोगामी नही.
आम्ही आपल्याआपल्यात लै गप्पा मारतो. म्हणजे कायबी आम्हाला रोज विषय असतात. आणि आम्ही आपल्याआपल्यात लै गप्पा मारतो.
रोजचा विषय आम्हाला अनेक पदर उलगडून चर्चा करायची असते.
म्हणजे श्रद्धा, अंधश्रद्धा, भुमिका, निधर्मी, कशा पद्धतीने एखादी गोष्ट पुरोगामी हाय कि नही ते ठरवितो.
पुरोगामी क्रिटिकल असते. त्याला अनेक म्हणजे अनेक पदर असतात. पुतळा, ह्यंवत्यंव. निधर्मी. सर्वधर्मसमभॉव वगैरे.
शाकाहारी मांसाहारी. मूनी बाबा रामदेव बाबा राम रहीम रामनाथ कोविंद कायपण आम्ही चर्च्या करतो. आमच्याआमच्यात.
मग मज्जा येतेय. चर्चा करून निष्कर्ष काढू वाटतंय. आणि हे ते होतंय. त्याच हे झाल्यामुळं. ह्याच ते होतं. मग ह्याचा स्टँड त्यो यष्टीचा आमचा काय रिक्षाचा काय ? असं कुठं असतं काय अर्धपुरोगामी कुठला. यडपट ते काय अर्ध्यापुस्तकाने पुरोगामी झालेला असे प्रकार पडतात.
मग मटण सणाच्या दिवशी, ह्यंव त्यंव राईट टु प्रायव्हसी. ह्या महापरुषाला वगळून पुरोगामी झाल्यानंतर त्याचे फॉलोअर. मड उचलून ईलेक्ट्राॉनिक मशिनीत घातलं आणि कुणीतरी देहदान केलं आणि तेराव्याला मटण खाल्लं आणि भाद्रपदात शाकाहार केला.

महापूर

सण २००५ ला पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला. लाखो लोकांचं स्थलांतर करावं लागलं. २००५ ला महापूर यावा असा काय महान पावसाळा नव्हता. पण भौगोलिक स्थिती मुळे तो पूर आलता. 
पुढे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र कर्नाटक सरकारने हवे ते बदल केले. नंतर बरेच पावसाळे आले गेले. २००५ पेक्षा जास्त पाऊस देखील पडला. पण पूराचा धोका टळला. 
तेच जर मुंबई बद्दल बघितलं तर दरवर्षी तुंबापुरी होतेय. आपत्तीवेळी कोण मदत करत नही ? सगळेच करतात. आमच्या शाळेला १ महिना सुट्टी पडली. त्या काळात सगळी पोरं रोज पुरग्रस्तांना खायप्यायला घरून डबे घेऊन जायची. 
पण लोकांच नुकसान झालं होतं. कुणी गप्प बसलं नाही. आणि खुळचट भावनिकतेत न अडखता नेत्यांच्या मागं लागून कामं करून घेतली. तेव्हापासून२००५सारखी परिस्थिती परत उद्भवली नाही. 
काल मुंबईत लोकांनी मदती केल्या एकमेकांना. ठीकच. पण उगचच दरवर्षी असं करत बसणार असला तर दरवर्षी च पूर येणार. तुम्ही नियोजन करण्यासाठी कधीच मागं लागणार नाहीत. कारण मुंबईतील लोकांना वेळ पण नसतोच. पण उगचच भावनेत गंडून दरवर्षी गुडगाभर कमरेभर पाण्यात अडकून पडायच कशाला ? 
त्या वाटणीच एवढ्या वर्षे सत्ताधारी असणाऱ्या लोकांना जाब विचारायला काय हरखत ? टॅक्स भरता, सगळ्यापेक्षा जास्त. तेव्हा हक्काचं चांगलं नियोजन करायला त्या सत्ताधारी लोकांना काय अडचण ?
ते भावनिक गंडवतेत तुम्ही गंडताय ह्याच वाईट वाटतंय. तसंही अस्वच्छ शहरात वरचा क्रमांक मुंबईचाच लागतोय. 
सोनूचं काय चुकलं नाय.

जोकपाल

आण्णा हजारे आणि माझं काय बांधाला बांध नही. ना आण्णानं आमचं पपईचं झाड तोडलंय, ना मी आण्णाचं एरंडमुंगळीच झाड तोडलंय. 
आण्णा हजारे हे परवा परत लोकपाल वगैरे लावायला परत आंदोलन करणार अशी खबर आमच्या कानावर आली. काय करणार लोकपाल आणि लोकायुक्त घेऊन ? 
ती काय धुतलेली असतात काय ?
अंदाकारण फ्लॉप शो हाय हे. 
एका उदाहरणार्थ सांगतो हे मी. (म्हणजे बोकील काका कसं झटपट सांगतेत तसंच अगदी) 
हे बघा मला जनतेने सांगितलं कि , हे घे धा रुपये आणि एक पेन आण. 
तर मी आठ रुपयाचा पेन आणणार आणि दोन रुपये खाणार. 
आता लोकपाल आणि लोकायुक्त हे दोघं आले तर लोकपाल ला २ रू, आणि लोकायुक्त ला १रू खायाला घालणार आणि ५रूपयाचा पेन आणणार. मग जनतेला ८च दिलेलं चांगलं कि ५ चं .
कुठलं शुद्ध विचार वगैरे काय नसतंय. सगळे पैसे खाऊ असतात. लोकपाल आणि लोकायुक्त भ्रष्ट निघले तर काय मी उपोषनला बसू काय ?
त्यांच्यावर लक्ष ठेवायला आणि लोकं. कोण सांगिटलंय असला फालतू कारभार ?
नोटबंदीत बोंबलत भाजून गेल्या जनता. लोकपाल आणून तिरडीवरची सुतळी घच्च आवळली जाईल. त्यामुळे ते काय नको. 
त्यामुळं आण्णांनी घ्यावी विश्रांती हाच नातू म्हणून प्रेमाचा सल्ला. 🙏🙏🙏🙏

संभाजीराजे , कोल्हापूर

छत्रपती संभाजीराजे.
२००८ ची निवडणूक होती. ईचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन हातकणंगले लोकसभा मतदार संघ तयार झाला. त्यावेळी खासदार श्रीमती निवेदिता माने होत्या.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात त्यावेळी खासदार कै. सदाशिवराव मंडलीक होते. दोन्ही जागा राष्ट्रवादी च्या.
२००८ ची निवडणूक जाहीर झाली. कै. सदाशिवराव मंडलीकाची राष्ट्रवादी कडून दुसरी टर्म पुर्ण झाली होती. श्रीमती निवेदिता माने वहिनींचीही तिच गत होती.
पवार सायबांनी कै. मंडलिकांना तिकीट नाकारल. आणि कोल्हापूर चे यूवराज छत्रपती संभाजीराजे यांना तिकीट दिलं.
तोपर्यंत संभाजीराजे कोण ?
ह्याची खबर कोणालाच नव्हती.
कदाचित पवार सायबांना सातारा पॅटर्न लागू करावा वाटलं असावं.
त्यापुर्वी राजु शेट्टी शिरोळ विधानसभा मतदारसंघात रजनीताई मगदूमांचा पराभव करुन आमदार झाले होते. (ही कै. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटलांची ऐतिहासिक चुक होती.) आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष यात्रा काढून (यात त्यांच्या पायाला फोड वगैरे आले होते.) दुध दरवाढ आणि ऊसाचा ३८० रुपयाचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून वातावरण बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी करण्यात यश मिळवलं होतं.
त्यावेळचे सदाभाऊ ऐन फॉर्मात होते. या उलट निवेदिता माने यांच्याकडे एक शिक्षणसंस्था सोडली तर दुसरं काही नव्हतं.
सदाभाऊची भाषनं, राजु शेट्टींची संघर्ष यात्रा आणि त्यातच सदाशिवराव मंडलिकाना तिकीट नाकारलं जाणं. ह्या सगळ्यात राष्ट्रवादी विरोधी वातावरणात भरच भर पडली.
MMS मंडलीक महाडिक शेट्टी.
याच २००८ च्या निवडणुकीत कै. मंडलिकांनी बंडखोरी केली आणि राष्ट्रवादी विरोधात हे दोघे एकत्रित आले. त्याचमुळे त्यांची ताकद वाढली. महादेवराव (आप्पा) महाडिक यांनी शेट्टी मंडलीक यांना मदत केली. या तिघांची आघाडी होऊन एमएमएस गट्टी तयार झाली.
राजे कधी पॅलेस सोडायचे नाहीत. तर त्यांचे बंधू मालोजीराजे आमदार (काँग्रेस कडून) होते. त्यांचही काम तसंच रटाळ होतं.
त्यात सदाशिवराव मंडलीक हे ज्येष्ठ आणि खऱ्या अर्थाने लोकनेते होते.
त्यांनी बंडखोरी केली. ईकडे शेट्टींनी रान पेटवलं. त्यात दोन्ही मतदारसंघात महाडिक युवाशक्तीन हात पसरल होतं. कारखानदारांविरोधातला रोष पुढं आलाच होता. शिवाय राष्ट्रवादी ने निष्ठावंत मंडलिकांना नाकारलं याचाही राग होता.
एरवी कोल्हापूरकर पवारसायबांचा आदेश डावलत नव्हते. तरुणात लोकप्रिय असणाऱ्या धनंजय महाडिकांना उद्देशून कौन है ये मुन्ना ?
म्हणून पवारांनी विचारलं होतं. त्यावेळी मुन्ना महाडिक पडले.
पण २००८ च्या निवडणुकीत संभाजीराजे आणि मानेवहिनींचा बक्कळ मोठ्ठा पराभव झाला होता.
सातारा आणि कोल्हापूरात हाच फरक.
साताऱ्यात एकटाक उदयनराजे राज्यच करतात. पण कोल्हापूरातला हरेक गडी स्वतःला सरकारच समजतोय. त्या न्यायानं कोल्हापूर कधीच कुणाला झुकलं नाही.
ह्याचवेळी अखंड देशात मोदीलाट आली पण कोल्हापूरात राष्ट्रवादी आली आणि मुन्ना खासदार झाले.
तर सांगायची गोष्ट अशी कि, २००८ नंतर संभाजीराजे राष्ट्रवादी सोडल्यात जमा होऊन मराठा तरुणांबरोबर बऱ्यापैकी जोडले गेले. यात त्यांच्या कार्याची माहिती नाही. मराठा चेहरा म्हणून त्यांना थेट राज्यसभेवर भाजपनं घेतलं याच राहून राहून आश्चर्य वाटलं. ह्या मागे चंद्रकांत दादा असावेत. तर असो.
ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या मागंच कारण हेच कि, भाजपने मंत्री पद राजेंना देणार अशा चर्चा कानावर आल्या. पण त्यांचा जनमानसातला चेहरा उदयनराजेंच्या कैक पटीने डावा वाटतोय. तिथं भाजपने मंत्री पद देऊन पण त्यांना काहीच फायदा होणार नाही.
जग भलत्या वेगानं पुढपुढं सरकायला लागलंय. लहाणपणापासूनचा आता पर्यंत चा प्रवास रिवाईज केला कि झालेली बदलं आठवायला लागतेत. आम्ही शाळेत जायचो. आताची पोरं पण जात्यातच. दीड किलोमीटर पायपीट करत शाळेला जावं लागायचं. पण त्याचं काय वाटायचं नही. आज दीडेक किलोमीटर चालायच म्हणजे हातात गाडी असताना का चाला ? म्हणून प्रश्न पडून मन किळसवाणं होऊन जातंय. आणि आपण गाडीवरौनंच जातोय. आम्ही पाचवीत असताना मोबाईल आला. कोणतर मोबाईल वर बोलायला लागला कि त्याचं मोठं कौतुक वाटायच. त्याकाळी बऱ्यापैकी नेत्यांची पोस्टरं कानाला मोबाईल लावल्याची फोटो असायची. नोकीयाचे ब्लॅक अँड व्हाईट टु कलर मोबाईल यायला चालू झालं. ईनकमिंगला पण चार्ज पडायचा. नोकिय स्यामसंग कंपनीच्या मोबाईल नी त्यावेळंला वारंच केलतं. मल्टिमिडीया मोबाईल आलं. एसेमेस एमेमेस. झालं. रेडिओ लागायचा. माझ्याकडं आठवीत नोकियाचा 6030मोबाईल आला. मोबाईल चालवायची अक्कल लै आली. त्याकाळात मजा वाटायची एकमेकाला मिसकॉल मारायला वगैरे. हळूहळू एमपीथ्री मोबाईल आलीत. गाणी मेमरी कार्ड आलं. मग आपल्या आवडीची गाणी ऐकायला आली.
फोटो व्हिडिओ एनेबल मोबाईल आलीत. त्यात सर्रास बीप्या बघण्यासाठी मोबाईल जरूरी असायच्या. चौकात कट्ट्यावर बसून ब्लुटुथवरनं बीप्या सोडायची. नटनटी (जास्त करुन तमिळ नट्यांचे फोटो असायचे. ज्यांची नावं आजतागायत माहिती नाहीत.)
मग आम्ही कॉलेजला जाऊ लागलो. तसं मोठ्या आवाजाची Sigmatel alfatel rocker अश्या नावाची चायना फोन आली त्याकाळी एस.टीत कोण जोरात आवाजात गाणी लावतोय ह्याची स्पर्धा असायची. मग ते मोबाईल बोंबलत गेले. आणि सॅमसंग ने एँड्राइड फोन आणले. तवा आम्ही व्हाटसप फेसबुक वगैरे वापरायला लागलं. एसेमेस वगैरे जुनं झालं.
आत्ता जगातली जास्त भांडणं ह्या मोबाईल मुळं व्हायला लागली. अगदी मोबाईल वरनं स्टेटस अपलोड करून कितीतर लोकांनी आत्महत्या अलिकडच्या काळात केली. ब्लु व्हेल सारखे भयानक गेम वगैरे आले. त्याचे बरेचसे लाभार्थी मेले.
साध्या मोबाईल वर शुट झालेलं भाषनपण एखाद्या नेत्याला राजकारणातून कायमचा उठवायला भाग पाडली. काहींवर ट्रोलींग झालं, मिडीया ट्रायल झाली, फेसबुक स्क्रिनशॉट झाले.
अशा रितीनं आपलं जगणं कुठतरी किडूकमिडूक होऊन ह्या साधनांच्या आधीन झालो.
अॉफिस मध्ये, मॉलमध्ये क्यामेरे आले. कामचुकारपणा करु नये ह्या पेक्षा त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवावं हाच उद्देश ह्यामागं असावा अशी शंका यायला वाव असावी.
तुमची इच्छा नसताना तुम्ही काम कसं करू शकता ? ह्यावरही विचार व्हायला हवा.
गर्दी आणि गोंगाटाच्या ह्या वादळावर एकच विषय कधी टिकून राह्यला नाही. सोशल मिडियावर दोनेक दिवस वाद चघळला जातो. क्विक कार्टुन तयार होतं. दुसऱ्या दिवशी त्यावर एकदोन अभ्यासु अग्रलेख रविवारच्या पुरवणीत भुतकाळापासूनच विवेचन, प्राईम टाईम डिबेट हे एकदा संपलं कि चर्चेत दुसरा विषय येतोय. परत रिपिटेशन्स ह्याच. आपल्या एकूणच सोशल मिडियावरच्या वावरात अनेक हत्या आपत्ती धार्मिक जातीय दंगली निवडणूक व्यक्तींच निधन भ्रष्टाचार झपाट्याने आलं आणि गेलं पण. ह्यात एक जरी वादाचा शेवटर्यंत पाठपुरावा झाला असता तर मानलं असतं.
आम्ही सारे दाभोळकर. वगैरे घोषणा मीही कधीतरी दिल्या. मग लिस्टच वाढत गेली. दाभोलकर पानसरे कलबुर्गी लंकेश. आता आम्ही कोण ? आम्ही सारे दाभोलकर कलबुर्गी पानसरे लंकेश म्हणून घोषना द्यायची ? कि अजुनची लिस्ट वाढल्यावर स्तोत्र रचून म्हणत बसायचं ?
नोटबंदी सर्जिकल स्ट्राइक जीएसटी कुठकुठले किती मत लक्षात घ्यायची ? कि कंटाळून लोकशाही जाऊदे एकाच्याच हाती कारभार राव्हा ह्या निर्मळ हेतूनं हुकमशाही आणण्याची वाटचाल कुठतरी चालू असल्याचच हे वातावरण.
आतंकवाद बाहेरच्या पेक्षा आतले देशी दहशतवादी तर काय कमी आहेत कि काय ?
६३ लोकं निष्काळजीपणं मरतात त्याचं काहीच कुणाला शेवटपर्यंत वाटलं नाही. नाशकात पोरं मेली त्याचं कुणाला काही वाटलं नाही.
शेतकरी संघटना तर फेमस झाल्या. जयाजी आणि कोणकोण कायकाय ? अॉनलाईन फॉर्म भरा. काय शेतकरी तेवढा सुशिक्षित झाला तर मग लै झालं कि. प्रधानमंत्री जनधन योजनेत झिरो ब्यालन्स वर खाती उघडली तिथं काय शाळवाचं धसकाट टाकायचं काय ?
तर हा काय त्या भाजप पक्षाचा पण दोष नही. दोष आपल्या पण सगळ्यांचा हायच कि.
कधी काळी समाजसेवक आजोबा कायकाय बोलायचे ? काय झालंय आज ? आज पेट्रोल असूदे गॅस असुदे सगळ्याच गोष्टी कुणाला परवडालेत ? एक शेतकरी अल्पभुधारक शेतमजूर ह्यांच जगणं आजघडीला भयंकर मुश्किल होऊन बसलंय. प्राथमिक आरोग्य केंद्र असतील प्राथमिक शाळा असतील रेशनिंगच धान्य असलं तर सगळ्याच गोष्टी कमीप्रतिच्या. मग त्यावरचा विनाकारणचा खर्च तरी का म्हणून करावा ? डेव्हलपमेंट गुजरात मॉडेल विकास वगैरे शब्द बोंबलत कधी गेलं ते कळलंच नही. छाती बडवून छाती मोजून भाषनं खोटारडी झाडतो पंतप्रधान आणि सगळं जनता खपवून घेत बसलीय.
कशात काहीच आलबेल चालंलंय असं कुठंच नाही.
नोटा (NOTA) हाच मुर्खपणाचा कळस. तुमचं मत तुम्ही अज्ञाताला कसं देऊ शकताय.
जगण्याचा वेग वाढला पण कुणाची कुणाला काहीच पडलेली नाही. इथं आई मेलेली पार तिची हाडं होऊपर्यंत लक्ष नाही. तिथं दाभोलकर पानसरे कलबुर्गी लंकेश तरी कुणाच्या कोण लागाव्या ?
२०१४ च्या निवडणुकीनंतर कुठलं एकतरी आंदोलन पुर्ण झालंय ? मागण्या मान्य झाल्यात ? विरोधी आवाज उठलाय ?
मंत्रीमंडळात ज्या काही पद्धतीनं अधिकाऱ्यांना स्थान मिळतंय हे बघून तर थक्कच व्हायला होतंय. काय भरोसा त्यांनी त्या काळात आजच्या सत्ताधारी लोकांना काही पदरात टाकलंय त्याचीच ते फळं भोगत नसतील ?
समाज बटबटीत असंवेदनशील होत चाललाय. व्यवस्थेला विचारणारं कोण नाही. कुठल्या दिशेनं प्रवास चालू हाय देशाचा कळत नाही.
मेल्याच्यानंतर दुसऱ्या मिनटाला एखाद्या व्यक्तिविषयी द्वेषपुर्ण वातावरण तयार होतंय.
चारही खून एकाच पद्धतीने होतात. मारेकऱ्यांचा थांगपत्ता नाही लागत त्यावेळी पोलीस यंत्रणेविषयी शंका निर्माण का होऊ नये ?
चार खुनांचा शोध लागत नाही हा कळसच म्हणायला पाहिजे. एवढे ते गुन्हेगार चलाख होते कि काय ? कि त्यांना पुढं आणायचच नाही ? हेतू तर कळायला पाहिजेत.
कुणी सोवळं पाळतंय, कुणी गोमाता पाळतोय कोण देशाच्या अभिमानाबद्दल आपले प्रॉडक्ट विकत घ्या म्हणून लागलाय. तर खुद्द पंतप्रधान एका कंपनीचा जाहिरातीत मिरवतो. कायपण डिंगडँग करतो. आणि देश सगळं जी जी वगैरे करत मानत बसतो. आता देश खड्ड्यात चाललाय पण जर पुर्णच गेला तर त्याला आपणही जबाबदार असू.

शनिवार, २५ मार्च, २०१७

आज्जा आणि आण्णा

वर्षाला रानात शाळू असायचा, आतापण हाय. आज्जा हुतं तवा सांजच्या टायमाला आम्ही फिरायला जायचो. माळा असायचा आम्ही आंटा म्हणायचं त्याला. कन्नड भाषेत एक घाण म्हण हाय. 'आंटा इल्लरे शंटा इल्ल'  म्हणजे  ते रान पिकलं नसायचं. ह्या दिवसात संध्याकाळी एक असलं मस्त वातावरण असायच काय विचारायला नको असं. तवा अजिबात मोबाईल कंप्युटर असलं काय काय नसायचं. आज्जांची दोस्तं लै. 
आज्जा फिरत असायचे. पंढरपूर ची वारी करणारा आज्जा गावात एकटं. लोकांच्या उपयोगाला पडायच, हे मला दुसरीत सांगायचीत. काय घंटा कळतंय ? मी उगचच रुबाबात हांहां म्हणायचो. 
पुढं पैलीदुसरीत गेल्यावर सकाळी संध्याकाळी आज्जा न्यायला आणायला यायचीत. 
केस कटींगला गेलं कि आज्जा टक्कल करायचीत आणि शेंडी ठेवायचीत. संध्याकाळी भजनाला आजरेकरवाड्यात. तिथंच आज्जांचा दोस्त पैलवान तातबा लठ्ठे. त्यांची खासियत हुती लै खुराक लागायचा, मग आम्ही जेवायला बसल्यावर जरा जास्त जेवलो कि आज्जा म्हणायचीत भजी पाव- तात्या लठ्ठ्या. दुसरं दोस्त निशानदार आज्जा त्यांचं टोपन नाव बताशा. बताशा आज्जा  प्रसिद्ध माणूस. कुस्त्यांचं मैदान घ्यायचं पैलवान आणायची तयार करायची कामं करणारा माणूस. त्यांच्या मळ्यात आज्जा गेलते, तीन दिवस रानात बोलत बसलेते. मी कुठतर गावात जरा वेळ थांबलो कि हे हमखास ऐकायला गावायचं. आज्जांनी पैलवानकी केली आणि नंतरनं सोडली. नांदणी हे आमचं मुळ गाव. आता तिथं पडका वाडा राह्यला. दारं तुळ्या पांढरी माती. 
राऊ भोसले, बाळु कदम, आप्पा कोळी, बापु माळी, बाळू परीट, किशना कोळी, केशव शिंपी, महादा कांबळे, देवगोंड आदगोंड मलगोंड पाटील, कधी पत्तं पिसत बसायची चावडीवर तर कवा पत्रक घिवून मापं काढत बसायचीत. 
इलेक्षन लागलं कि रत्नाप्पा कुंभार हे आमचं लेबल फिक्स लागलंतं. आण्णा आज्जांची दांडगी मैत्री. कारखाना, सुतगिरणी, चावडी  आज्जा कुंभारचा माणूस. 
आण्णापण आमदार मंत्री झालीत खरं कधी माणसं विसरली नहीत.
आज्जांच्याकडंनं महाभारत, रामायण ह्या गोष्टी लै मजेनं ऐकायला मिळायच्या. श्रावणबाळाची गोष्ट आली, किंवा ज्ञानोबा महाराजांची समाधी आली कि रडायला यायचं. तेच मुक्ताबाईनं चांग्या मेल्या चौदा वर्षे तपश्या करून अजून कोरडाच काय रे ?
किंवा जनाबाई म्हणायची विठ्या मेल्या तुझी रांड रंडकि झाली, नामदेव दगडाला खोलीत कोंडून ठेवताना, पुण्याचा टग्या मंबईचा भामटा ऐकताना लै लै पडून हसायला व्हायचं. रिपीट सांगा सांगा म्हणून लागायचो मागं. आणि कधीतर मग झोपून जायचो. 
आज्जांबरोबर लै हिंडायला लागायचं. चॉकलेट मिळायचं नही खायला. फुटाणं वटाणं चिरमुरं शेंगदानं खारेडाळ खारेबिस्कुट लै मिळायचं. राजुतात्याच्या दुकानात बसून आज्जा पेपर  वाचायचं मी खात बसायचो. मज्जा तर यायची. खायला संपलं कि कसतर वाटायच. 
आज्जांनी गावातल्या बाळू परिट नावाच्या माणसाला दुकान काढून दिलतं. आज्जा जित्तं असताना च त्यानं दुकानात फोटो लावलाता. आज्जा बक्कळ जगले. १०३ वर्षं. 
जनावरातलं लै कळायचं. जनावर बाजार हमखास ठरलेलं, तसंच माळव्याचा बाजार. मिरजेत एक दलाल हुते. हाजी गुलाब हानिफ डोंगरे. फ्लावर संपल्यावर त्यांनी दोन हजार रूपये चुकभुल म्हणून घरात आणून दिलं. 
बॉस म्हणून धोंडीराम वायचळ नावाचे एक टेंपो डायवर हुते त्यांचा टेंपो माळव्याला असायचा, लै फेमस माणूस. त्यानंतर सदा गोंदकर सदामामा आला. हे सगळे कडेपर्यंत राह्यले. 
सांगलीला शब्बीर आणि कोल्हापूर ला बशीरभाई बागवान अशी दोन दलालं त्यांच्या दुकान ला माल जायचा. कधी एका पैशाचा हिशेब आज्जा विचारले नहीत. 
हे सगळं बक्कळ असायचं. 
माझं दुसरं आज्जा म्हणजे आईचे वडील. त्यांना सगळी आण्णाच म्हणत्यात. आगदी आज्जीपण. माझी मम्मी सगळ्यात थोरली. त्यामुळं तिला सगळी आक्का म्हणायची. मी सगळ्यात थोरला दिवटा नातू. मी जन्मलो तवा नवीन घर तयार झालं तिकडंच. आणि जल्मल्यावर फरशीवर आण्णांनी जन्म तारीख कोरली. आण्णा परवापरवा गेले. अट्याक यायच्या आधी आण्णा त्या जागेवर जाऊन ती फरशी स्वच्छ करालते असं आज्जी सांगिटली. 
आज्जा आणि आण्णा दोघं दोन टोकाचे. आज्जांच्याकडं वारकरी संप्रदाय तर तिकडं जैन पुराण. जिनसेन महाराजांच्या जवळचे. गावातल्या पालखीचा भैरोबाचा आणि बस्तीचा पुढचा मान आण्णांच्या घरी. जत्रेला आण्णा म्हणजे आमची बँक. सकाळ दुपार आणि संध्याकाळ असं तीन टर्म पैशे मागून घ्यायचो. 
सुट्टीला सगळी मामाच्या गावाला जायची. आमच्या मामाचं गाव पलिकडंच. आम्हाला काय लै कौतुक नसायचं. पण फटाकड्या हिकडच्या तिकडच्या आणि कपडे ह्यासाठी आण्णा आणि मामाच्या मागं लागायचो आणि ते मिळायचीत. म्हणून तिकडं पळत जायचं. संध्याकाळ झाली कि मी माझा भाऊ सिद्धार्थ आणि चुलत मामा वैभव आम्ही आणि आण्णा फिरायला जायचो. आण्णा महावीर भगवान नेमिनाथ पार्श्वनाथ गुळव्वा च्या गोष्टी सांगायचीत. फ्लावर त्यांचा मुंबई ला जायचा. भुजबळ दलाल कडे असायचा, त्यावेळी करंड्या भरायची पद्धत हुती. त्यावर लेबल लावायची, लेबलं लिवायचं काम माझ्याकडं असायचं. सगळी काम शिकलो तिथं. पण हे घर ते घर भयंकर वेगळं. 
आण्णा शिखरजीला जायचे तवा पत्र लिवायचे तिकडंन ते शाळेत यायचं. घाटगेबाई सगळ्यांपुढं वाचून दाखवायच्या. मग मी पण आण्णा आलीत कि आमच्या गावातंनं पत्र टाकायचो. आणि परत तिकडं गेलंय काय बघायला जायचो.  ती पण मजा यायची. आण्णानी पालखी धरायला गेलं कि खोबरं उधळायच्या टायमाला स्वतः चा टावेल काढून द्यायचे. आणि स्वतः तसंच जायचे. अलिकडं कधीतर पेपरात लिवलेलं दाखवलं कि हारकायचीत. आण्णांनी बक्कळ जीव लावला. शेवटपर्यंत काय ना काय जाताना सांगायचे. मी बसून ऐकायचो. आण्णा गेले आज्जापण गेले. बर्याच आठवणी राह्यल्या. 
विचार करतो मी किती नशिबवान हुतो ? ही अशी माणसं मिळाली. 
तुकोबा ज्ञानोबा महाभारत रामायण पुराण व्यवहारातल्या बक्कळ गोष्टी कळाल्या. शेती कळली, गाणी कळली, किर्तन कळलं, पैसा कळला आणि त्यावेळचा वेळ काय वाया नही गेला. उलट त्यांना वेळ हुता ही गोष्ट माझ्या किती भल्याची हुती. दोनतीन तास ह्याच आठवणीवर घरात बडबडत बसलोतो. मला रडायला लै येत नही पण आत रडत बसतो. सगळ्या नातवांना अशी म्हातारी माणसं मिळूदेत आणि ऐकायला वेळ मिळूदे. काय बोलावं डोंबाल ?
काळ बाकी बदलला. ☺💐

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

क्रांतीसिंह नाना पाटील

चौथीची उन्हाळी सुट्टी होती. घराशेजारच्या सुरगोंड मास्तरना सुट्टी असायची. मग ते कोल्हापूर हून गावाकडं यायचे. त्यांच्या घरात ढीगभर पुस्तकं, त्यात गोष्टीची, इसापनिती, चंपक, पेपरमधले अंकूर बालमित्र हे सगळं वाचायला लै आवडायच, म्हणून मी तिथं सदानकदा पडाक सकाळचा नाष्टा पण तिथंच व्हायचा आणि कधीकधी रात्रीच जेवणपण. 
त्या सुट्टीत मास्तर परत कोल्हापूरला जाताना एक पुस्तक देवून गेले. जे मी त्यांना अजूनही परत देत नही. पुस्तकाचं नाव क्रांतिसिंह नाना पाटील. नाव वाचून तर भारीच वाटलं म्हणटलं क्रांतिशिंव आणि पाटलाचा नाना हे जवळच वाटलं. पुस्तक ईतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवारांनी संपादित केलेलं आणि अरुंधती प्रकाशनानं प्रकाशित केलेलं. नाना पाटीलला कुठल्या महान ठिकाणी जन्म मिळाला नव्हता. आमच्या सारख्या लहानशा शेतकरी कुटुंबात जन्मलेलं नाना, घरी वारकरी संप्रदायातले आईवडील. साधंसुध कुटुंब काहीही पार्श्वभूमी नसताना नाना तलाठी पदापर्यंत पोचले. ब्रिटीश सरकार जनतेचं शोषन करत होतं. जिकडंतिकडं पोलीस हुते. हे सगळं बघून नानांच मन अस्वस्थ झालं तलाठ्याच्या नोकरीला राजीनामा दिला आणि घेतली ऊडी गांधीबाबाच्या चळवळीत !
अंतरगात संवेदनशीलता मापक रांगडेपणा, भाषेचा गावरान गोडवा ह्या बळावर नाना लोकांत लोकप्रिय व्हायला लागले, नाना भुमिगत असायचे पोलिसांना गुंगारा देण्यात नाना चतूर होते, बळाच काम नसून ते डोक्याच होतं कुणीतरी एक पवाडा रचला होता, बहुतेक लाड नाव असावं.
एकदा काय प्रकार घडला
नाना पाटील बसला दाढी करायला
तेचा लागला सुगावा पोलिसाला 
पोलिस गेलं पाटलाला पकडायला
नाना पाटील लई चतुराइवाला
त्यानं आपल्या दाढीचा साबण पुसला
आणि लावला न्हाव्याच्या दाढीला
नाना पाटील लागला दाढी करायला
तोवर पोलिसाचा वेढा पडला
पोलिसांनी न्हाव्यालाच ऊचलून नेला
आणि धोपटीसह नाना पाटील पळून गेला 
जी जी जी
...........................................
नानांनी आपल्या बळावर माणसं ऊभं केली. भुमिगत असताना हिंडत असताना जवळ पैशे नसायचं, त्यावेळी नाना मसोबाची चांदीची डोळं काढून घ्यायचे. स्वतः च्या लग्नात स्वतःच मंगलष्टक म्हणून त्यांनी आदर्श घालून दिलं. आज पाठीमागं वळून बघताना त्या काळात हे सहजसोप नव्हतं हे ध्यानात येतंयच. आजही बर्याचजणांना नाना माहीत नाहीत. मी हायस्कुलात होतो तेव्हा गांधी नेहरू टिळक ह्यापलिकडचे नेते कुणाला माहिती नव्हते. सुदैवानं मास्तरच्या कृपेने ते पुस्तक माझ्या हातालालागलं आणि नानांची गळाभेटच झाली. जयसिंगराव पवार मागं एकदाजयसिंगपूरात व्याख्यानाला आलते तेव्हा त्यांची सही घेतली. ते सुद्धा भारावले. एकंदरीत ज्या माणसाला वाचून एवढं भारावायला होतं त्या माणसाच्या काळात माहोल काय असेल ? याची कल्पना केली तरी आंगावर काटं ऊभी राहत्यात. 
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

देशभक्तांची तटस्थता

गेल्या काही वर्षात राजकारण झपाट्याने बदलत चाललंय. यात सोशल मिडीया, ईलेक्ट्रानिक मिडीया किंवा प्रिंट मिडीया ह्याचा वेग वाढतोय आणि नमुनेदाररित्या आपल्या पुढे बातम्या झळकतात. आता काही लिंकपाहिलं तर लक्षात येतं. अबब राखीने हे काय केलं ? त्यामुळे उत्सुकता चाळवून लक्ष खेचण्यात माध्यमं यशस्वी ठरतात. मुळात राखीनं काय केलं हे स्पष्ट न सांगता ते दडवून ठेवायच. आत वेबसाइटवर बातमी तर सामान्य असते. पण राखी नं काय केलं हे बघण्याची उत्सुकता राहवत नसणारे तिथं धडकतात. हाती काय तर राखीनं  अमुकतमुक पक्षात प्रवेश केला. ह्यात अबब करण्याईतकं काय असावं ?
अतिरंजीतता हा एक समाजमनाचा भाग होवून बसलाय हे पद्धतशीरपणे काही चाणक्यानीं आधीच ओळखलतं.
त्यातूनच एका मुंडक्याच्या बदल्यात शंभर मुंडकी किंवा चुनावी जुमले किंवा पाकिस्तान मध्ये फटाके ई भाषनं राजकारणाची बदलती दिशा ओळखून आलीत. त्यात ते पुरते फसले गेले. 
आज परत विविध टप्प्यात गेले अडीच वर्षे गोंधळच गोंधळ चालू आहे. अखलाक, रोहित वेमुला, कन्हैयाला देशद्रोही घोषित करनं, व्हाटसप संवादावर नजर ठेवणे, पॉर्न वेबसाइटवर बंदी आणने, गोहत्याबंदी इत्यादी घडामोडींनी सरकार ची नाकेबंदी व्हायची त्याचेच फलित म्हणजे स्मृती ईराणींना पदावरुन पायउतार केलं. पण हे गोंधळ फारफार तर पाचेक दिवसच टिकायचे तोपर्यंत एखाद्या च्यानेलला कुठल्यातरी साधु साध्वींनी बाईट दिलेली असायची. त्यावर परत गोंधळ व्हायचा. सातत्यान ेअसं कोणत्याही मुद्द्याचा शेवट झाला नाही. 
आज मात्र गेल्या आठ नोव्हेंबर ला केलेल्या नोटबंदीने सरकार जेरीस आलं. त्यात कमालीची सातत्यता देण्यात किंवा center of attraction टिकवून ठेवण्यात मोदींचा वाटा आहे. कारण दुसरा धमाका वगैरे करणार असल्याचं ते बोलले. त्याचा अर्थ लावण्यात काही जण व्यस्त झाले. पण यात तमाम जनतेच लक्ष खेचून घेण्यात मोदी यशस्वी झाले. निर्णय कुठतरी अंगलट यायची चिन्ह दिसताच मोदींच्या मातोश्री बँकेत आल्या येण्याबद्दल काही नाही पण हे सगळं रचलेलं होतं हे दिसतंच. बरं जर खरंच मानलं तर त्या वयाच्या वृद्धा रांगेत दिसल्या नाहीत. असो.
काही दिवसांनी पंतप्रधान स्वतः जाहिररित्या स्टेजवरुन रडले. एका देशाचा पंतप्रधान खंबीर निर्णय घेतल्यानंतर खंबीर न राहता अश्रू गाळतो ते सुद्धा जाहिररीत्या हे हतबलतेचं नसून कशाचं प्रतिक आहे ? 
नंतर फारच गोंधळ होतोय असं दिसताच थोडी चाल बदलली गेली हा निर्णय रिझर्व्ह बँकेचा असल्याचं सांगितलं. त्यानंतर काळा पैसा असणार्या नागरिकांना विनंती केली कि पन्नास टक्के कपात करून पैसा पांढरा करून देवू. हा कुठला न्याय असु शकतो ? सरळसरळ पैसे भरून गुन्हेगार सुटतो असाच याचा अर्थ होतो. नोटरद्दीकरणाच्या निर्णयानंतर बोकील नामक अर्थतज्ञ पहिले दोन दिवस मोदींची भलामन करण्यात मश्गुल होते. अर्थशास्त्र पाचवीच्या मुलाला समजावं इतकी सोपी मांडणी बोकील साहेबांनी केली. देशातील परिस्थितीचिघळत असल्याचं पाहता त्यांनी हात झटकले. एकदमच बोकील गायब झाले. तिथून ध्यानीमनी नसता अचानकच क्याशलेस ईकोनामी आली. बँकेच्या रांगेत ऊभं राहून देशभक्ती सिद्ध करायला लावणारे माननीय महोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचीच ही दोनही विधानं. एका कृषी प्रधान राज्याचे मुख्यमंत्री ईतकं होपलेस बोलू शकतात ह्यावर विश्वास बसत नाही. सरळच आहे की मोबाईल किती लोकांना वापरता येतो. किंवा किती लोक मोबाईल वापरतात ह्याचा सर्वे तरी एकदा घ्यायचा. मुळातमोबाईल तर लांबचा चेकने किती शेतकरी लोक व्यवहार करतात हे जरी बघितलं तरीसुद्धा चित्र स्पष्ट होईल. पण हवेत गोळ्या मारायची लाटच देशातून राज्यात आली त्याला ते तरी काय करणार ?
........................    ..................
महिन्या दोनमहिन्यापुर्वी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा निघाला होता त्यात एका मोर्चेकर्यानं सरळ सरळ भाष्य केलं कि भुजबळ साहेबांनी फक्त साडेआठशे कोटींचा भ्रष्टाचार केलाय, मल्याने तर हजारो कोटी बुडवलेत. वरवर बघता हे विधान सामान्य व्यवहारीच आहे. जायचा तो संदेश गेलाच. मग प्रश्न असा पडतो कि भ्रष्टाचार करण्याला ठराविक रक्कमेची मर्यादा असावी कि काय ? 
हे निर्ढावलेपण कशातून आलं ? मल्ल्या हे जितंजागतं उदाहरण असताना हे साहजिकच आहे. त्यातून मानवी मनोवस्थाच अशी कि तुलनात्मक रितीने सगळ्या घटनांकडे पाहणे. फार कशाला ? आपले सरकारच साठ वर्षांत हे झालं का ? असच विचारतंय ना.
तिथे त्या सामान्य माणसाला चुकीचं म्हणायला ही वाव नाही. ललित मोदी किंवा विजय मल्ल्यांचे परदेशात ले फोटो एकामागून एक प्रदर्शित होतच असतात. एक माणूस हजारोकोटी बुडवून निवांतहिंडतो वरून बँकेलाच ठेंगा दाखवतो. तिथे एखादा नेत्यांच्या समर्थकाला दुःख होणे साहजिकच होतं. आज जगभर हिंडत असलेले आपले पंतप्रधान किर्तीवंत तर आहेतच पण तितकाच द्रष्टेपणा दाखवून मल्ल्याला मुसक्या बांधून लोळवत इथ आणलं असतं तर तो समर्थक तसा बोलता झाला असता का ?
मग त्यातूनच जातीधर्मानी बरबटलेल्या देशात ठराविक जातींवर ठरवून अत्याचार होतो असा कांगावा केला तर त्याला चुकीचं का ठरवावं ?
सामान्य माणसाला एक वागणूक आणि श्रीमंत लोकांना एक वागणूक हेच प्रतित होतं. 
वरतून एका शेतकऱ्यांनं एसबीआय बँकेला माझं कर्ज माफ करावं अशा आशयाचं पत्र लिहलं. त्याची छायाचित्रे सोशल मिडीयांवर झळकली. तशी त्या शेतकरी बांधवाची मागणी सुद्धा रास्तच म्हणावी लागेल.
..............................................................................................
ज्या गुजरात मॉडेल चा डंका पिटून मोदी सत्तेवर आले तिथल्याच बावीस वर्षाच्या एका तरुणानं गुजरात सरकारला पळताभुई थोडी केली. ते आंदोलन विझवण्यात सरकारने यश मिळवलं पण लागलीच तिथं गुजरात मध्ये दलित तरूणांना अमानुष रित्या मारहाण झाली, त्यावर उतारा म्हणून आनंदी बेन यांची उचल बांगडी केली गेली. ह्यात काय गुजरात विकास मॉडेल होतं ? लाखोंचे मोर्चे एका बावीस वर्षीय तरूणाच्या हाकेवरुन निघतात तिथे गुजरात काय अमेरिका असल्याचं भासवलं गेलतं त्याच्या ठिकर्या उडाल्या. हा भास जाणून बुजून तयार केला होता. हे तरी ह्या निमित्तानं स्पष्टपणे दिसून आलं.
......................................................................................... 
गेल्या दोनेक वर्षात कट्टर मोदी समर्थक लोकांना 'भक्त' असं गणलं जावू लागलं. मुळात भक्त हा देवाचा निस्सीम सेवक असतो. तीच तत्परता ह्या कार्यकर्ते लोकांनी दाखवल्याने भक्त ही पदवी तशी काही गैर नाही.
पण व्हायला असं लागलं कि भक्त लोक काहीही मोदी बोलोत. ते व्यापारी सैनिक लोकांपेक्षा महान आहेत बोलोत कि कालपरवा गाळलेले अश्रू असोत. मोदी हे बरोबरच अशी प्रत्येक ठिकाणी ते धारणा कराले. ते लिखाण असो कि बोलनं किंवा जाहीर वकतव्य असो. फक्त मोदींची तळी उचलने हा एककलमी कार्यक्रम च होवून बसला. त्यामुळेच त्यांच्या सातत्यपुर्वक समर्थनाने ते दुर्लक्षित होवू लागले. मग आता दुर्लक्षित होवू लागल्यावर बैचेन होवून पुढचा मार्ग त्यांनी अवलंबला. त्याला आजकाल तटस्थता असं सामान्य पणे म्हणटलं जातं. 
..........................................................................................
काय आहे तटस्थता ? 
महिन्यभरापुर्वी आमच्या भागात एक निवडणूक होती. सहकारी संस्थेची निवडणूक असल्याने शिक्का मारण्याच मतदान होतं. मतमोजणीवेळी बरोबर दोन उमेदवारांच्या नावामधील रेषेवरच काही मतं होती. ती बाद न ठरवता निवडणूक निर्णय अधिकार्यानं मोजायला घेतली. ती मोजताना अशी शक्कल लढवली कि शिक्का कोणत्या बाजूला जास्त उमटलाय हे मि.मी मध्ये मोजायचं. मोजलं गेलं आणि फक्त एका मतानं ते प्यानेल जिंकलं. हे उदाहरण एवढ्यासाठीच कि शिक्का तर मध्ये पडला होता. पण तो नक्कीच कोणीकडे तरी झुकला होता. यालाच सुक्ष्मसमर्थन म्हणतात याच्याच आधारे दोन्ही कडंचे खेळवत ठेवून दान टाकायचे तेच टाकायचे पण ते लक्षवेधी असं. ही नवीन पद्धत म्हणजेच तटस्थता. भक्तीसंप्रदायाचा समाजाला उबग आल्यानंतर संयमी भुमिकेची भुल देऊन पारडं जड करण्याची ही नवी खेळी आज दुर्दैवाने रुजायला लागालेली आहे. यावरून मी थोडंफार तटस्थ लोकांबद्दल बोलल्यानंतर एकाने टीका केली. त्या टीकेवरच एका प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकारानी, 'दोन्ही किनार्‍यावर बसून गोधळ घालणार्‍यांना मधून अख्खी नदी वहातेय याचे भान कधीच येत नाही. त्यांना बांधिलकीचे शिलेदार म्हणतात.' तर हे पत्रकार सगळ्यांना माहिती आहेत. ते असं बोलले. 2014 च्या लोकसभा निवडणुका चालू होत्या तेव्हा फक्त मोदीनामाचा गजर हे करत होते, विधानसभा निवडणूक लागली तेव्हा मोदीलाट अजून ओसरली नाही हे पटवून देण्याकरिता भले थोरले ब्लॉग लिहले. त्यांची भाषा कधीपासुन असा विचार करायला लागली ? ह्यांना आत्ताच हे सुचावं ह्यातच हे सगळी तटस्थतेमागे छुपे समर्थन करायलाच सुरवात केलीय. भलेथोर पत्रकार एककल्ली कट्टर समर्थन करणारे जर आज तटस्थतेचा मायाळू पुळका आणून वावरत असतील तर तोच मार्ग संप्रदाय चोखाळत आहे. ह्या तटस्थतेतून नियोजन पुर्वक खेळी करून समाजाला भुल देण्याचं हे काम युद्धपातळीवर सुरू झालंय. ह्याच संप्रदायाने कधीच कधीच जनलोकपाल असो कि एफडीआय असो तेव्हा कधी भिनली नसलेली तटस्थता अचानक पैदा का झाली ? 
सत्तेचे बुरुज ढासळू लागले जनक्षोभ उसळु लागला कि माजखोरीची भाषा जावून मवाळपणा येतो. हा मवाळपणा नाटकी आहे. हे संपूर्ण भारत देश जाणतोय.
आज शेती शेतकरी, छोटा उद्योजक जवळजवळ संपायच्या वाटेवर आहे.
रांगच्या रांग लागून एक नोट मिळते. तिच्या सुट्ट्याची तर बोंबच आहे. एक काळापैसावाला रांगेत नाही कि एक उद्योजक नाही. रोज येणारे नवनवे फतवे झेलावे लागतात. रांगेत थांबून लोक मृत्युमुखी पडतात. एवढं सारं दिसूनही न दिसल्यासारखं करून त्याला देशभक्तीची झालर लावणारे , सुधारणा विकासाची तुरे चढवणारे आणखी किती दिवस समर्थन करणार ? 
चुकीला चुक म्हणण्याची नैतिकता नसली कि देशप्रेमाचे नकली उमाळे दाटू लागतात. 
कोण करणार असेल तर करो समर्थन भाजपा सबकुछ मोदी असणार्या या मोदी सरकाराचा निषेध !!!!!

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

असंच पायजे ह्यास्नी..!!

मी आठवीला हाय. बाबा मास्तर हाय. मी आदी पप्पा म्हणायचो. पण आता योग्या म्हणटला आमचं पप्पा न म्हणता आमचा बाबा  म्हणायचं. आणि सर नही मास्तर म्हणायच. बाबा अलिकडं लै वांड झालाय. उठलंसुठलं कि वरडतच असतो. मग मम्मी बी वरडत्या. लै मस्ती हाय दोगांना. मी एकटाच हाय. तरी बी आईबा दोघं कायम बोंबलत्यात. काय दारू पिवून आल्यागत बघत्यात. योग्या म्हणटला घरातल्यास्नी मस्ती हायच रे. त्यला एक भवू हाय बारका पाचवीत. त्यो आभ्यास करतोय आणि हे शिवा खातं. 
आमचा बाबा दिवसा शाळेत शिकवतोय आणि नंतरनं हिथं माझ्यावर राग काढतोय. नुस्तं वरडतोय. आई बी. नंतर आई मंगळत येत्या. 
मग मी बी परवा मस्ती जिरवलीच. 
परवा योग्याच वाटदिवस हुतं. मी गेलतो संध्याकाळी. रात्री यायला धा वाजले. बाबा अंगावर आला वरडत. हरामखोर तुला भिताडातंच गाडीन. मला लै वईट वाटून रडायला आलं. मी म्हणटलो मारा. गाडा.
बाबानं यिवून ढकलंलं. जा लै शाना हायीस. तणतणत बसला उशेरभर. मी हिकडं यिवुन झोपलो. रडायला आलं. मुसमुसत रडलो मग सलदी झाली शेंबुड आलतं. मग मुसमुस. रडु. एवढंच. मग आई दुध घिवून आली. बाळ पे एवढं. राजा असं करायच नही. पाचदा म्हणटली रट्टा धरून उठवालती. नही उटलो. तुंबून बसायला मजा येतंय. 
जरा रडायच आवरेज कमी झालं. मग मी परत बाबाला डोळ्याफुढ आणलं. बाबाला भिताड तुटेल काय ? 
नही. 
बाबा मग प्रयत्न करेल. भिताड पाडायचं. पडणार नही भिताड. मग बाबा आईला म्हणील अगं ये दिवार क्यु नही तुटती. मग आई म्हणील. तुटेगी कशी ? आंबुजा शिमीटसे जो बनी है ! 
ईह्हु बाबाला असंच पायजे. मस्ती करतंय का ? पाड भिताड आता ! कळतंय आंबुजा शिमीट.
लै हसु आलं. तोंड दाबून हास्लो. हसताना पण शेंबुड येतंय. 
मग झोप लागली. घुर्रघुर्र.
सकाळी ऊठलो. च्या पेलो नहीच. आई लै मिनत्या केली. नही. आमराण उपोषन. कट्टर. 
पाणी चालतंय. मग आंघुळ आवरलो. आभ्यास करत. गृपाठ लिवलो. आई आली. बाळ असं करु नको. कायतर खा पोटाला. त्यंचा जीव हाय म्हणून बोलत्यात नव्हं ? 
ए जा बई हिथनं. च्चलं. तणतणलो. 
मग नऊलाच दफ्तर घिवून घराबहीर पडलो. मामा कडं गेलो. मामा गावातच हाय. बाबाच त्यच्याबरोबर वाकडं हाय. आईचंबी. मी बोलतोय मामाबरोबर. मामा माया करतंय. मागल्या ऊन्हाळ्यासुट्टीत मामानं ब्याट घिवून दिलती. आमच्या बाबानं जाळली. मामा चांगला हाय. मामा माया करतंय. 
मामीला म्हणटलो जेवायला वाडा. मामी म्हणटली भांडलायस काय ? मी व्हय म्हणटलो. मामांच्यात इंद्रायनी तांदूळ असतंय. भात भारी लागतंय. मामीला महीत हाय मी लै जेवतो. मामीनं वाढली. लै जेवलो. मामा म्हणटला मास्तर हाकल्ला काय घरातंन ? 
व्हय म्हणटलो. सगळं सांगिटलो. मामा म्हणटला आसुदे. बारकं हायीस अजून तु. मामा चांघला हाय. बाबाच्या अंगात मस्ती हाय. जेवलो. लै जेवलो. मामीनं मेणकागदात भडंग आणि राजगिर्याचं लाडु दिली. घंटा झाली कि खा म्हणटली. मी गुमानं शाळेत जवून बसलो. योग्याला सांगिटलो. योग्याचा बाबा म्हणतो मास्तरलोकं वडापाव खावून दिवसं काढत्यात. आमचा बाबा लै जेवतो. मग आंगात मस्ती येत्या. गृपाठ चेक करून घेटलो. उजीला वही दिलं. उज्जवल्ला. तीचं त्वांड वल्लं असतंय. आसुदे. 
मग हिकडं तिकडं बोंबलत हिंडून सा वाजता घरला गेलो. बाबा आलता. आई बी. दप्तार टाकलो. गल्लीत गेलो. जरा हुदडुन यावं म्हणून. बाबा खिडकीतंनं बघालता. वाकून बघालता. बघ म्हणटलो आणि नाचत गेलो. मग लै हुदडलो सन्या आणि मी. आणि परत घरला गेलो. खोलीत जावून बसलो. मास्तर बातम्या बघालता. बघु दे. आणि मान पलट करून माझ्याकडं बघिटला. मला आरशात दिसलं. बारिक हसु यायलतं. नंतर जवून खोलीत बसलो. रडु काढालतो. यिना. मग प्रेत्न केलो. डोळं च्चोळलं. पापणीच क्यास आत जवुन गुदगुल्या झाल्या. आई यायची चिन्ह दिसालतं. हातावर थुकलो आणि डोळ्याला फुसलो. हात वढत बसलो.आई आली. भजं केलती. आणि कोशींबीर ते. मसालाभात. भज्याच वास यायलतं. तोंडात यायलतं ते पाणी अश्रु म्हणून डोळ्यात पायजेलतं. 
मग आई म्हणटली बाळ खा. तुझ्यासाठी केलोय. सकाळीपण जेवला नहीस. 
नही जा म्हणालतो. पण ओरिजनल आश्रु वल्लं राहत्यात तेवढं थुकि राहात नही. मग गाल फुगवून खाली मान घालून एक भजं खालं. आणि उठून गेलो. आई म्हणटली कुठं ? 
सकाळी जेवलं नसल्यानं प्वाट बिघडलंय. जुलाब लागलंय म्हणटलो. मग आई रडकुंडीला आल्यागत दिसली. यिवु दे. मग जावून हासत बसलो. तिथं. मग आणि त्वांड धुवून आलो. बाबा आई आलीत. ताट घिवून खोलीत बाबा पण नरमलाता. खा म्हणटलीत. मग लै जेवायच मन हुतं खरं नही. मस्ती उतरली पायजे.
मग गप्प खाली मान घालून मुदामनं आवाळचवाळ खाल्लो. उटलो. जवून झोपलो. ह्यनी दोघं जेवालती. मला मळमळाय लागलं. ए्याक केलो आणि पळत बहीर गेलो. हुंबर्यावरच वकलो. मग ही दोघं ताट सोडून आली. आई रडकुंडीला आलती. मी बी लै वकलो. बाबाचं बी त्वांड पडलंतच. आता जरा बर वाटलं. 
आणि नंतर यिना झालती उल्टी खरं उगच तांब्याभर पाणी घिवून रडत वकायच नाटक केलो. आई वकलेलं फुसालती. बाबा माझ्याकडं यिवून म्हणटला चल डॉक्टर कडं जवून यिवु. मी बोल्लो नही. गेलो. हिसका मारून. झोपून परत थुक्की लवून रडालतो. आई यिवून बसली. टेंशन नही घ्यायच पिल्लु बाबा हायीत म्हणून बोलत्यात नव्हं. ? 
असला म्हणून काय झालं. मास्तर हाय पोराबरोबर वागायची अक्कल नही. हे मनातल्या मनात म्हणटलो. बाबा गाडीवरंन जवून डॉक्टर कडंन गोळ्या आणला. खा म्हणटला. बाळ रागात हुतो म्हणून बोल्लो रे. म्हणटला. 
असं परत नही बोलत म्हणटला. 
इथनं फुडं कवाच नही असं बोलणार  बोल रे आता म्हणटला.
मग मी हां म्हणटलो शेंबुड वढत. मग गबबसला. मी पांघरुण वढून झोपलो. हासु यायलंत. ऊशीला चावलो. हां. मस्ती जिरलीच कनी. असंच पायजे ह्यास्नी.
-श्रेणिक नरदे.