दुध उत्पादक शेतकरी अडचणीत येणार?

सध्या जनावर बाजार तेजीत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत तेजी आहे. म्हैस घ्यायची तर एक लाखाच्या पुढे किमंत मोजावी लागते तर गाय आणायची तर किमान पन्नास हजार रूपये आजरोजी लागतात. 




हि तेजी कशामुळे आली? गेल्यावर्षी आलेल्या लम्पी या रोगात अनेक जनावरं बळी पडली. त्यानंतर भारतातील दुग्ध व्यवसाय अडचणीत येऊन दुधाचं उत्पादन कमी झाले. त्यामुळे गायी म्हैशींच्या दुधाच्या किंमती वाढल्या. 

दुधाला किमंत आली कि बाजारात दुभत्या गायी म्हशींची मागणी वाढते. तशीच मागणी आता वाढली आहे. 

गावातील शेतकऱ्यांनीही दुग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणून गोठे रिकामे केले होते. वाढत्या पशुखाद्यांच्या किंमती, वैद्यकीय खर्चामुळे, चाराटंचाई मुळे शेतकरी दुग्धव्यवसायापासून लांब गेला होता. 

मात्र दुधाच्या किंमती वाढल्या आणि सारं गणितंच बदललं. शेतकऱ्यांनी परत गोठं झाडून लोटून नवी जनावरं आणली. वैरणी चालू झाल्या डेअरीला दुध जाऊ लागलं. घरचं दुध खायची हौस पुरी करता यायला लागली. शेतात शेणखत पडू लागलं होतं अशी चांगली सुबत्ता येत होती‌. 

पण दुर्दैव शेतकऱ्यांचं ! शेतकऱ्यांना दोन पैसे जादा मिळू लागले कि सरकारला ते बघवत नाही. तेच आजही झालं आहे. 

सरकारने परदेशातून लोणी आणि तूप आयात करण्याचा निर्णय घेत आहे. देशांतर्गत दुधाच्या किंमती वाढल्या आहेत त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या किमंतीही वाढल्या आहेत याचा विचार करून केंद्र सरकार तूप आणि लोणी आयात करणार आहे.

एकदा जर परकीय देशातील तुप लोणी स्वस्त मिळू लागलं तर देशातील चांगल्या फॅट च्य दुधाची मागणी घटेल‌. त्यामुळे आज जो चांगला दर दुधाला मिळत आहे तो ढासळून जायला वेळ लागणार नाही. 

दुधाच्या किंमती कमी झाल्या कि साहजिकच गायी म्हशी च्या किमंतीही कमी होणार, आज ७०हजार लाखभर रुपये मोजून ज्या शेतकऱ्यांनी जनावर खरेदी केली आहे त्यांना याचा फटका बसणार. 

शेतकरी लोकांत जो शेतमजूर किंवा अल्पभूधारक शेतकरी असतो तो रेडकं वासरं आणून त्यांचा वर्ष दोन वर्ष सांभाळ करून त्याला वेतालायक करून विकतो, त्यांचाही खर्च वायाच जाणार. 

कधी नव्हे ते एकच क्षेत्रात जरा बरे दिवस शेतकऱ्याला दिसत होते मात्र तिथेही आजरोजी सरकार त्याला उद्ध्वस्त करण्याची योजना आखत आहे. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय दुग्धव्यवसाय मंत्र्यांना पत्र लिहलं आहे. 



दुग्धजन्य पदार्थांची आयात करून देशांतर्गत दुधाच्या व्यवसायाला हानी पोचवू नये अशी मागणी पवारांनी केली आहे. सरकारने पवारांची मागणी ऐकली तर दुध धंद्यातील तेजी टिकेल अन्यथा परकीय दुग्धजन्य पदार्थ भारतीय बाजारात आले तर शेतकरी परत संकटात सापडेल. 




पेट्रोल असेल, गॅस सिलिंडर, डिझेल, घरगुती वीज सर्व काही महागलं आहे मात्र शेतकऱ्यांचं दुध महागले कि सरकारला महागाई वाढल्याचा भास होतो आणि शेतकऱ्याचं कंबरडं मोडायला सरकार सज्ज होतं‌. 

भाजीपाला उत्पादक, ऊस उत्पादक, तृणधान्य कडधान्य उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे, त्याच्या घराला कुठेतरी दुग्धव्यवसाय आधार देत होता आता तोही आधार राहिल कि जाईल हे सारं सरकाराच्या हातात आहे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं