भटके कुत्रे

माणसाचा सर्वात जुना दोस्त म्हणजे कुत्रा. कुत्र्यासोबत माणूस जात लाखो वर्षे राहत आली आहे. त्यामुळे एकमेकांच्यात प्रेम निर्माण झालं आहे. त्यामुळे माणूसही आपल्या माणसांपेक्षा कुत्र्याला जादा जीव लावतो. माणसं हलकट आहेत त्यात काही प्रश्नच नाही. त्यामुळेच माणूस कुत्र्यावर जादा प्रेम करतो. किमान त्याचं प्रेम निस्वार्थी असतं. बाकी माणसांनी कुत्र्यासारखे प्रेम करणे ही अशक्य गोष्ट आहे. लाखो वर्षे सोबत राहूनही माणूस कुत्र्यांपासून काही शिकला नाही. पण कुत्र्यासोबत जो राहतो तो काही प्रमाणात संवेदनशील होतो. पण याचीही टक्केवारी कमी आहे. 




पाळीव कुत्र्यांचे ठिक आहे. पण आज सर्वात मोठ्ठी समस्या काय असेल तर ती भटक्या कुत्र्यांची आहे. या लोकांना अन्न नसतं. कुठं तर चिकन ६५चा गाडा असेल, वडापाव चा गाडा असेल, किंवा इतर काही फूड स्टॉल असतील त्या ठिकाणी काही कुत्र्यांची सोय लागते पण बाकीच्या कुत्र्यांची अवस्था प्रचंड बेकार असते. ते अन्नाच्या शोधात हिंडत असतात. पण त्यांना अन्न मिळत नाही. 

चार पाच वय वर्षे असणारे कुत्रे थोडेफार अनुभवसंपन्न असतात, ते त्यांची सोय लावत असतात. 
अनुभव संपन्न यासाठीच की काही कुत्र्यांचे तुम्ही निरीक्षण करा. ते एखाद्या घरासमोर जाऊन आशाळभूत,दिनवाना चेहरा करून राहतात. घरातले लोक हाकलू पाहतात पण ह्या गड्याचा संयम सुटत नाही. हा भुंकत नाही किंवा चावत नाही. कुणी ओरडलं,हुसकलं तर चार पावले चालतो जागा बदलून बसतो. पण चेहरा गरीबच ठेवतो. माणसाला त्याची माया येते आणि कंटाळून का होईना पण एखादी भाकरी तो टाकतो. मग हे कुत्रे दारात बसून काही दिवस निरीक्षण करतात. कुणाबरोबर आपल्या आश्रयदात्याचे नाते संबंध कसे आहेत? याचा तो अभ्यास करतो. 
साहजिकच त्याला कळते की अमुकतमुक काकू काही आपल्या मालकीनीला जास्त पसंत नाही. मग तो त्या काकू वर गुरगुरण्याचा प्रयोग करतो. काकू घाबरून मालकीनला सांगते की तुझं हे कुत्रं हाकलून लाव उंडगीचं मला भुंकतंय! 

पण असं त्या काकूची रिएक्शन बघून कुत्रोबांच्या मालकीनीला उलट बरं वाटतं. कारण तिला जे हवं तेच याने केलेलं असतं. मग त्या दिवशी तव्यावरून उतरलेल्या दोन गरम भाकऱ्या एक्श्ट्रा या पठ्ठ्याला मिळतात. तिथून कुत्र्याला लक्षात येतं की हि आपल्याला पटलेली आहे. मग परत अभ्यास करतात, परत डोकं लावतात. त्यातून अभ्यासातून ज्ञान येतं आणि हे हळूहळू घरचे सदस्य होऊन जातात. भाकरी घालणारी किंवा करणारी बाई हि बहुतांश त्या घरची बाई असते. त्यामुळे या कुत्र्यांचा जीव तिच्यावरच जडतो. म्हणजे हे पण मतलबी असतात. 

जर त्यात नवरा बायकोची भांडणं असतील तर हे नवऱ्याच्या अंगावर जाण्याचीही रिस्क घेत असतात. डोकं सॉलिड असतं कुत्र्यांचं. ही एवढी कुत्रेगिरी केली की, मग कधीतरी जून महिन्यात पाऊस येतो, त्यावेळी हे परत घराबाहेरच भिजत परत तोंड दीनवानं करतात मग ह्यांनी आधीच एवढे उपकार केलेले असतात की त्या घरमालकीनीला त्याला घरात घेतल्यावाचून गप्प बसवत नाही. 
तर हे असे कुत्रे असतात. 

(एखादी मुलगी एखाद्या पोराबाबत म्हणत असेल कुत्र्यासारखं मागं लागलाय. तर त्याचा अर्थ वरील प्रमाणे असतो 😁 )

पण खरी समस्या एक ते तीन वर्ष वय असणाऱ्या कुत्र्यांची असते. त्यांच्याकडे अनुभव कमी असतो आणि ते उथळपणे काहीही करतात. मग नैराश्यातून गाड्यांचा पाठलाग करणे, अवास्तव भुंकणे, काच्चदिशी चावणे. यात विशेषतः त्यांचे टार्गेट हे लहान मुलं असतात. 

लहान मुलांना एकांतात कुत्रा चावला असेल तर ते घरी सांगायचीही शक्यता कमी असते. कारण घरातले लोक परत त्या पोरालाच ओरडतात पण यातून जर त्या पोराला रेबीज झाला तर काय अवस्था होते हे तुम्हाला युट्यूबवर असणारे काही व्हिडिओ बघून कल्पना येईल. 
हे कुत्रे गाडीच्या आडवे येतात, लहान मुलांचा चावा घेतात, जर त्यांची गँग असेल तर ते मॉब लिंचींगही करतात. कुत्र्यांनी प्रत्यक्षात खून ही केलेले आहेत. 

हे कुत्रे मारले पाहिजेत. म्हणजे जीवानिशी नाही. पण यांचं निर्बीजीकरण करून यांना हळूहळू कमी केलं पाहिजे. प्रत्येक मनपा, नगरपालिका, नगरपरिषद यांच्याकडे बजेट मध्ये तरतूद असते पण हे ऑपरेशन करत नाहीत. त्यामुळे हे कुत्रे डेंजर ठरत आहेत. हळूहळू यांचा कार्यक्रम लावण्याची गरज आहे. नाहीतर हे लै बट्ट्याबोळ करून ठेवणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं