राहूल गांधी आणि सततचा पराभव!

अनेकांना वाटत असते की, राहूल गांधींनी निवडणूका जिंकाव्या. काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटणे साहजिक आहे. पण असेही लोकं जे काँग्रेसशी संबंधित नाहीत पण राहूल गांधींचं भलं व्हावं वाटतं त्यांचीही इच्छा असते. 

दरवेळी निवडणूक येते. वातावरण तयार होतं आणि निकालादिवशी वेगळं चित्र निर्माण होतं. निकालादिवशी गोदी मिडीयातले पत्रकार लोकं विश्लेषण करताना अमुक तमुक जातीची मतं कशी भाजपनं बांधली, मोदींनी अमुकतमुक देवाचा, संप्रदायाचा कसा उल्लेख केला आणि त्याचा कसा निवडणुकीत फायदा झाला. तसेच अमित शहांची चाणक्य निती, अमित शहांनी कशी बंडखोरांची समज काढली. अमित शहांनी कसे एखाद्या अपराध्याला पाठीशी घातले, अमित शहांनी डेरा टाकून कशा बैठका घेऊन नियोजन केलं. हे सगळं ऐकून इतक्या सवयीचं झालं आहे की, निवडणूक फक्त मोदी शहांनी लढवावी आणि राहूलनी फक्त पराभव होत रहावं आणि दोन कवडीची किमंत नाही अशा गोदी मिडीयातील लोकांकडून आत्मचिंतन करण्याचे सल्ले ऐकून घ्यावेत हे सवयीचे झाले आहे. 


 आता तुम्हाला मला कुणालाही कळतं ते राहूल गांधी आणि त्यांच्या सल्लागारांना नसेल का कळत? अमुकतमुक भोंदू बाबाच्या संप्रदायाची इतकी मतं आहेत, त्याचे पाय धरा. अमुकतमुक जाती एकत्र करा. हे कळत नसेल का? 
किंवा जे पॉप्युलिस्ट किंवा लोकप्रिय वाटते ते ते राहूलने करून निवडणूक जिंकावीच असे वाटते. त्या वाटण्यात गैर काहीही नाही. 

पण हे असे मिळवलेले विजय हे क्षणिक समाधानाचे आहेत. यात काळाच्या पुढचे नेमके काय आहे? यातून देशाला नवं काय मिळतं आहे? लीडर, नेता तो असतो जो देशाला दूरदृष्टी देतो. काळाच्या पुढे नेऊन ठेवतो. 

ज्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा राहूल गांधीला आहे त्याच्याकडून क्षणिक समाधान किंवा क्षणिक विजयाची अपेक्षा करणे गैर आहे. त्याच्याकडून जे अपेक्षित आहे ते तो करतच आहे. तो विज्ञानावर, तंत्रज्ञानावर बोलतो आहे. देशातील तरूणांकडे कौशल्य आहे. त्याला सरकारी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे हे तो बोलतो आहे. सत्तेवर आल्यानंतर तो ते करूनही दाखवेल त्यात शंका असण्याचे कारण नाही. 

मात्र दूसऱ्या बाजूला देशाचा पंतप्रधान, तथाकथित विश्व गुरू काय करतो आहे ? 
देशाला किंवा तरूणांना कोणती नवी दूरदृष्टी देतो आहे? अंबानी आणि अदाणी वगळता गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये कोण नवीन उद्योजक झाला? 

अदाणी अंबानींच्या संस्था तरी नवे काय शोध लावत आहेत का? तर नाही. ते व्यापार करत आहेत. भारत देश जगाला नवीन काही देऊ शकला नाही. उलट गेल्या १५ वर्षांत आपले परकीय देशांवर अवलंबून असण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. सण आपल्या देशातले आणि लायटिंग माळा, फटाके चायनाचे. 

मग जे मोदी काही दिवसांपूर्वी स्वदेशीचा नारा देत होते. त्यांनी बिहारी तरूणांसाठी काय आश्वासन दिली. किंवा आजपर्यंत देशभरात जिथं जिथं भाजपचा विजय रथ चौफेर उधळला आहे तिथून स्वदेशी काय काय निर्माण झालं.? 

याउलट दिल्ली जी देशाची राजधानी आहे. तिथले प्रदुषण आटोक्यात आणता न येणारा पंतप्रधान, स्वतः च्या कार्यालयात परदेशात तयार झालेले एअर प्युरिफायर वापरतो. मग मोदींनी देशाला काय दिलं? असा प्रश्न उरतोच. 

निवडणूक जिंकणे हा एक भाग आहे, आज उद्या राहूल गांधीही भोंदूबाबाच्या चरणी लीन झाले, जातींची मोट बांधली, नियोजन केले, लोकप्रिय आश्वासनं दिली तर काय होईल? निवडणूक जिंकतील पण त्यानंतर जो त्रास असेल तो राज्यकारभारासाठी व्यथित करणाराच असेल त्यात नवनिर्माण काहीही नाही. त्यामुळे अशा आशा अपेक्षा राहूल गांधी कडून करणे आणि लोकांची मानसिकता बघता ते वातावरण नाही. 

यासाठी काळ हेच उत्तर असेल. वेळ प्रत्येक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देतच असतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं