झाडं लावणाऱ्यांसाठी!
दरवर्षी पावसाळ्यात झाडं लावायची अनेकांना हौस येते. रील्स आणि सोशल मिडिया मूळं हे लोकं दिसून येत आहेत. लै जोरात तयारी पुर्वतयारी करत असतात ही लोकं.
झाडं लावण्यात काही वाईट नाही. पण ती कुठं लावायची याची किमान समज पाहिजे.
बरेच हौशी लोक, दिसली पडीक जागा टोच झाडं असं करत सुटलेत. गावच्या पठारावर ही झाडं लावत आहेत. जे चुकीचं आहे.
जशी घनदाट जंगलं निसर्गात आहेत. तशीच गवताळ कुरणे आहेत. ओसाड माळरान आहेत. तिथे नांदणारी जीवसृष्टी वेगळी आहे.
रानफुले, रानवेली, डोळ्याला दिसणार ही नाही अशा खडकाळ जमीनीवर वाढणाऱ्या वेली असतात. विविध सरपटणारे प्राणी, लांडगे, सरडे,पाली, तित्तर,टिटवी अशा अनेक पक्षांची अंडी अशाच ओसाड माळरानावर घालतात .
चांदोबा म्हणून जो किडा जमिनीत गोल घर करून राहतो. त्याचंही माळरानावर तळघरात निवासस्थान असतं. लहानपणी गवताची कुसळ त्या गोल घरात रोवलं की तो किडा फिरेल तसं हे कुसळ फिरत हा प्रयोग आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी केलाच असेल.
माणसाचा स्वभाव अलिकडे लैच जोरात बदलला आहे. त्याला जरा काही सांगितलं की त्याचा अतिरेक करत सुटतो. तसाच अतिरेक वृक्षलागवड करतानाही अलिकडे दिसून येतोय.
अनेक लोक सीडबॉल करत आहेत, अनेकजण रोपटी तयार करत आहेत,बीजसंकलन करत आहेत. त्यांच्या हेतुवर शंका नाही.
पण ते लोक दुर्दैवाने, पठारावरील,माळरानावरील परिसंस्था संपवत आहेत हे त्यांच्या गावी नसतं.
हि फुलं, छोट्या वेली, गवतं, किडं, तुडतुडे, चांदोबा, तित्तर, टिटव्या कुठं जाणार? याचाही विचार व्हावा.
माणसाला दवाखान्यात लावला जातो त्या आॅक्सिजन बरोबर काही संबंध नसतो. अशा ओसाड माळरानावर जी हिरवाई पावसाळ्यात पसरते ती एकदा डोळं उघडून नक्की बघा. त्यात व्हरायटी सापडतील तुम्हाला, आपल्याला सगळ्या पानाफुलांची नावंही माहीती नसतात शंकरोबा वगैरे सोडली तर, त्या वेली गुगल स्कॅन वरती स्कॅनिंग करून बघा. तुम्हाला नावं सापडतील. बघा जमलं तर सगळं हिरवेगार करायच्या नादात आपण काय काय घालवणार आहोत तेही वेळ काढून बघा. मग लावा काय लावायचं ते.
आपल्याकडे जनमानस हे लाटेवरती स्वार होणारं असतं. एकाच्या मागे लागलं की त्याच्याच मागे हात धुवून लागतात. तशीच परिस्थिती वृक्षारोपणाची झाली आहे.
झाडं लावा. स्वतः चं अंगण असेल, वाहतुकीला अडचण होत नसेल, तर रस्त्याच्या कडेला, स्वतः चं घर नसेल तर कुंडीत लावा. शेत असेल तर फळझाडं लावा, घरातही लावायची झाडं आहेत. ती लावा पण वृक्षारोपणाचा अतिरेक करताना माळरानावर धुडगूस घालू नका. तिथे मेंढपाळ शेळ्या मेंढ्या चरवत असतात. अनेक जीव असतात. त्यांचा मुडदा पाडू नका.
https://youtu.be/y-sg1hJVHZk?si=Ruy6TLR6_gs88c4U
टिप्पण्या