रिक्षावाल्याने कमाल केली!



निवडणुकीच्या काळात जो ग्राउंडवर काम करतो त्यालाच त्याची परिस्थिती माहीत असते.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक ग्राऊंडवरच्या माणसानं वादळात दिवा लावला.
त्याचं नाव एकनाथ शिंदे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. 

एकनाथ शिंदे यांचे विचार पटत नाहीत. पण त्यांचे राजकारण खरंच जमिनीवरचे आहे. त्यांना मिळालेले यश हे हलकं नाही. मान्य आहे कि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा काँग्रेस पेक्षा स्ट्राईक रेट कमी आहे.‌ मात्र भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट हा उत्तम आहे. 



मुख्यमंत्री यांच्यासाठी हि निवडणूक अग्निपरीक्षा ठरणारी होती आणि ते त्यात यशस्वीही झाले. त्यांचे महायुती मधील दोस्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याहून सरस कामगिरी शिंदेनी केली. 
भाजपपेक्षा फक्त २ जागा कमी. मूळात भाजपपेक्षा कमी जागा लढवल्या होत्या. 

एकनाथ शिंदे हे अगदी तळातून आलेलं नेतृत्व आहे. एक भला मोठा पक्ष फोडण्याचे धाडस जो करू शकतो तो नक्कीच महत्वकांक्षा असणारा माणूस आहे. 

जे लोक ग्राऊंडवर काम करतात त्यांना तिथल्या अडचणी माहित असतात. ग्राऊंडवर राबणारे लोक हेच खऱ्या अर्थानं निवडणूक लढवत असतात. बाकी भाषण देणारे असेही देतच असतात. प्रचारसभा याचा अर्थ शक्ती प्रदर्शन करण्याची एक संधी, यापलिकडे विराट जनसभेचे विशेष महत्त्व नाही. 

मतांची गोळाबेरीज करताना महत्वाचा ठरतो तो कार्यकर्ता. कार्यकर्ता म्हणजे सतरंजी उचल्या छाप कार्यकर्ता नव्हे. तर तो कार्यकर्ता आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा निवडणूका लढविणारा हा भावी नेता असतो. त्या कार्यकर्त्याला गृहीत धरून चालत नसते. तर त्याला योग्य साधनसामुग्री द्यावी लागते. तरच त्याच्याकडून होणाऱ्या प्रचारास गती येते. 

ह्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान आणि जान असणारा महायुती मधला एकमेव नेता एकनाथ शिंदे. त्यामुळे त्यांना अतिशय विपरीत परिस्थितीत यश मिळविता आले. 

गुवाहाटी, पन्नास खोके एकदम ओक्के, गद्दारी, मिंदे अशी अनेक दूषणं सोबत लागलेली असतानाही निव्वळ स्वकष्टाने या ७जागा निवडून आणल्या. परिस्थिती वाईट असताना नेतृत्वाचा कस लागतो. परिस्थिती अनुकूल असताना मिळालेलं यश हे काही फार आनंद देणारं नसतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी या कठीण परिस्थितीत जे यश मिळवलं त्याचं कौतुक करायलाच हवे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने निवडून येणे सोप्पे नव्हते. मात्र त्यासाठी एकनाथ शिंदे ज्या वायु वेगाने पळाले, भेटीगाठी घेतल्या, नियोजन लावले. त्याचेच यश म्हणजे माने विजयी झाले. 

धैर्यशील माने यांच्यासाठी साखर कारखान्यांच्या चेअरमन लोकांची भेट घेतली. संचालकांची घेतली, नगरसेवक आजी माजी सर्वांना भेटले, जिल्हा परिषद पंचायत समिती एवढेच काय सरपंच लोकांनाही ते भेटले. शब्द दिले घेतले. 

राज्याचा मुख्यमंत्री सरपंचाला भेटतो हि गोष्ट सरपंचासाठी मोठ्ठी असते. त्यालाही पुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद लढवायची असते अशांना योग्य ती मदत शिंदे यांनी केली. 

तुमच्याकडे उपाशी सैन्य असले तर तुमचा पराभव होतो. याची जाणीव या सेनापतीला होती. श्रीकांत शिंदे यांनीही अपार कष्ट घेतले होते. 

अक्षरशः या बापलेकांनी लोकांचे उंबरे झिजविले आहेत. लोकसभा निवडणुक हि ग्रामपंचायत निवडणुकीएवढी सिरियस घेऊन त्यांनी नियोजन लावले. त्याला यश आले. 

आज त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अमित शहा यांनी का म्हणून शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड केली? 

पक्षफुटीनंतर शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे फडणवीस साहेबांच्या गोटात अस्वस्थता होती. मात्र अमित शहा सारख्या ग्राऊंडवर राबणाऱ्या माणसालाच एकनाथ शिंदे यांची किमंत कळू शकते. त्यांनी चाणाक्षपणे हि निवड केली होती. ती योग्य असल्याचे आज जाणवते. 

एकनाथ शिंदे यांनी प्रतिकुल परिस्थितीत यश मिळवले हे शक्य झालं ते खूप ग्रासरूटपासून वर गेल्याने. जो स्वतः कार्यकर्ता असतो तोच कार्यकर्त्याची भावना ओळखू शकतो. एकनाथ शिंदे यांनी ती ओळखली आणि अंमलबजावणी ही केली. याला प्रॅक्टीकली जगणे म्हणतात. ते त्यांनी करून दाखवून. महाराष्ट्रात स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. 

रिक्षावाला माणूस हा लांब असणारा माणूस आपली सीट आहे की नाही हे त्याच्या तोंडावरूनच ओळखतो. हा रिक्षावाल्याचा गुण तंतोतंत त्यांना उपयोगात आला.

रिक्षावाला, गद्दार,मिंधे, पन्नास खोके यांना त्यांनी आलेल्या निकालातून दिलेलं उत्तर प्रभावी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन हे केलेच पाहिजे!

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
मागच्या पोस्ट मध्ये धनशक्तीचा वारेमाप वापर झाल्याचे म्हणंतांना नाशिकला शिंदेंनी हेलिकॉप्टर मधून नेलेल्या 19 ब्यागा विसरलात काय ?
वादळात दिवा म्हणजे अती झालय. 😁

असो .

आपले 2015 पासूनचे लेखन वाचण्यात आले.
बहुतांश लेखक ही सामाजिक प्रश्न ,तारुण्याचे लेखन वागैरेपासुनच लिखाणाची सुरुवात करतात.
मात्र समीक्षा करायची असेल तर बाज वेगळा हवा आणि वैचारिक बैठक तरल हवी , भाषेला वजन हवे , मुद्दे दुरदर्शित्वाभिमुख असल्यास प्रत्येक लेख संग्राहणीय होऊ शकेल.

केवळ वैयक्तिक विचारच मांडायचे असल्यास गोष्ट वेगळी.

हरकत नाही .

नरहर कुरुंदकर , द भी कुलकर्णी , रंगनाथ पाठारे , जी ए कुलकर्णी आदींचे साहित्य व लेखन वाचा . त्यांनी कुठल्या मुद्द्यावर आणि कशाचा उहापोह केला आहे हे लक्षात घेऊन निष्कर्ष काढणे जमेल असे पाहा .

वैचारिक समरसता आणि प्रमेय मांडण्याची हातोटी जमली तर चांगली प्रगती होईल.

साहित्याने समृद्ध व्हा ,

शुभेच्छा.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?