शेतीतला जुगार !


गेल्या काही वर्षात,

कोथिंबीर, मेथी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्या असोत किंवा,

फ्लॉवर, कोबी, वांगी, टमाटे, बटाटे या फळभाज्या असोत कि,

ज्वारी, बाजरी, गहू, मका, असोत या आणि इतर साऱ्या शेतमालाच्या किमंती वर्षात फारफार १५-२० दिवस वाढतात. ते दिवस वजा केले तर बाकीचे ३५० दिवस बाजार हा नेहमी कोसळलेलाच राहतो. 

मग त्या १५-२० दिवसांत कुणीतर एखादा लखपती होतो आणि टीव्ही, सोशल मिडिया, वर्तमानपत्रं आदी ठिकाणी एकरी १०-२० लाखाच्या ष्टोऱ्या छापल्या जातात. 

तुम्ही आजही भाजी आणायला बाजारात गेला तर पाच तिथं दहा रूपये पेंडी च भाजी मिळते. ती दहावर्षापुर्वीही तेवढ्यालाच मिळत होती. 

शेतकऱ्याला मात्र दहा वर्षात वाढलेला खर्च असा. 

मशागतीचा खर्च वाढला.

शेतमजूरांचा खर्च वाढला.

रासायनिक खतांच्या किमंती वाढल्या. 

औषधांच्या किमंती वाढल्या. 

शेतमाल वाहतुकीचा खर्च वाढला. 

शेतातील पाईपलाईनचा खर्च वाढला.

वीजबीलं वाढली. 

मल्चिंग पेपर, चार्जिंग पंप, तार, काठ्या या साऱ्यांचा खर्च वाढला. 

हे वरचे सर्व खर्च एकदोन टक्केंनी वाढले नाहीत तर पाच ते दहा पटीने वाढलेत. मात्र शेतमालांचे दर तेवढेच राहीलेत जे दहावीस वर्षापूर्वी होते. 

कुणाचा पगार लाख दीड लाख झाला म्हणून ईकडे तो पन्नास रूपयाने कोथिंबीर घेतोय असं कधीही होताना दिसत नाही. आणि त्याने तर का घ्यावं ? शेवटी मार्केट आहे. इथं आवक वाढली कि दर पडतात हा नियमच आहे. त्याला कोण काय करणार ? 

शेतकऱ्याने आता प्रक्रीया उद्योगाकडे वळायला हवं. असा एक सूर येतो. हा सूर दहावीस वर्षापूर्वी वेगळा होता. पण उद्योग तोच काय तर शेतीला शेतीपूरक जोडधंदा हवा. 

मग कोणी गाईम्हशी आणल्या कोणी कोंबड्या आणल्या आणखी कुणी काही डुकरं पाळले . आज गावोगावी काय परिस्थिती आहे ? पूर्वीच्या तुलनेत तुम्हाला गोठं, गाईम्हशी दिसणारच नाहीत. कारण पशुखाद्य, वैरण, निगा राखणे , वैद्यकीय खर्चा परवडत नाही. त्यापेक्षा 100 चं दुध विकत खाल्लेलं परवडलं ही सर्वसामान्य शेतकऱ्याची धारणा झाली. मग काहीजण कडकनाथ कोंबड्यात लाखो रूपयांना गंडले शेवटी स्वतःच त्या आयुर्वेदिक कोंबड्या रोज एक कापून खाल्ल्या. 

तो माणूस भारतात चुत्या ठरतो जो शेतकऱ्याला गंडवत नाही. कधीतर एखादी कर्जमाफी मिळते ते करदाते जे शहरात राहतात त्यांनी भरलेल्या करातून आम्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते. शेतकरी कुठंच tax भरत नाही असं त्यापैकी काहींचं म्हणनं असतं. 

एका रात्रीत सूधारणा होत नाही. लगेचच अच्छे दिन येतील कुणीतरी पेटून उठून काही क्रांति करेल ही अपेक्षा शेतकऱ्याला राहीली नाही. 

आता पेट्रोल डिझेल महागल्यानंतर शेतमाल वाहतुकीचा खर्च किमान दीडपट झाला काही ठिकाणी दुप्पटही. पण ते अडते असोत कि व्यापारी किंवा थेट ग्राहक यांच्याकडून ते काऊंट होतंच नाही. 

एकुणात शेती हा जुगारापेक्षाही वाईट धंदा झालाय. मटक्यात किंवा सट्ट्यात कधीतरी तुक्का लागण्याची आशा असते. तशी आशा ही गोष्ट शेतकऱ्यांत राहीली नाही. त्याच्यात फक्त निराशा दाटून राहिलीय ती दोरी घेऊन झाडाकडे तर नेते, किंवा औषधाच्या बाटलीचं बूच उघडायला लावते. आज ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केलीय त्याने शेवटचं वाक्य डेंजर बोल्लंय परत शेतकऱ्याचा जन्म नको game over !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं