रमेशबाबू प्रज्ञानंद आणि राष्ट्रवादी भारतीय

 


  कालच्या एका खेळानंतर रमेशबाबू प्रज्ञानंद चर्चेत आला. क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ असलेल्या देशात एखादा बुद्धिबळपटू चर्चेत येणे म्हणजे सुर्य पश्चिमेला उगवणे, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होणे, हवेत उडणाऱ्या बसमधून सर्वांचा प्रवास सुरू होणे असंच वाटण्याजोगं आहे. 

बुद्धिबळ हा अतिशय किचकट, एक मोहरा जर हिकडचा तिकडं झाला तर डाव उलटणारा खेळ. या खेळात विश्वनाथन आनंद या भारतीय बुद्धिबळपटूने पाचवेळा विश्वविजेतेपद पटकावलं. बुद्धिबळ हा खेळ अत्यंत धीराचा, संयमाचा, त्याचवेळी आक्रमकतेचा, धाडसाचा कधीकधी नैराश्यात ढकलणाराही हा खेळ आहे आणि म्हणून बुद्धिबळ हा कुणाचाही खेळ नाही म्हणजे ईतर खेळ आणि खेळाडू नालायक आहेत असं नाही. मात्र इतर खेळांच्या तुलनेत भारतीयांनी बुद्धिबळाला मान दिला नाही. एखाद्याला अक्षरशः देव बनवून टाकणाऱ्या भारतीयांनी विश्वनाथन आनंदला काय दिलं हा प्रश्न पडतो ? 

एकदा विश्वविजेता ते पण सांघिक खेळातून खेळणाऱ्या खेळाडूला भारतरत्न आणि दूसऱ्या बाजूला स्वतःच्या बळावर पाचवेळा विश्वविजेता ठरणाऱ्या खेळाडूला भारतरत्न नाही हा असा आपला देश आहे. त्याबद्दल कुणी काही बोलताना दिसत नाही.



काल मात्र १६ वर्षीय रमेशबाबू प्रज्ञानंदने विश्वविजेत्या मॅग्नस कार्ल्सनला मात दिल्यावर भारतभरातून त्याच्या विजयाबद्दल अभिनंदन कमी मात्र त्याचा उन्माद भळभळून वाहताना दिसत होता. आनंदच्या काळात सोशल मिडीया बाळसंही धरला नव्हता, मात्र त्या काळच्या दिग्गज खेळाडूंचा जसा जगभर सन्मान होतोय तसा भारताने आनंदचा सन्मान कधीही केला नाही. 

भारतातील ज्याला बुद्धिबळाचा बु ही माहित नाहीत ना

ही तो प्रज्ञानंदच्या नावाने जल्लोष करत होता, काही आंतरराष्ट्रीय समूहांवर आमच्या राष्ट्रवादी भारतीयांनी श्री. मॅग्नस कार्ल्सन यांना निवृत्ती घेण्याचाही सल्ला दिला. तसे आम्ही भारतीय लोक अशा सल्ल्यांबद्दल फेमस आहोत. 

मागे शेतकरी आंदोलनावेळी आमच्या क्रिकेटच्या देवाने रिहानाला आमच्या अंतर्गत बाबीत नाक न खुपसण्याचा सल्ला दिला होता. आमचे देवच असे असतील तर आम्हा भक्तांकडून दूसऱ्या अपेक्षा काय ठेवायच्या ?


 गेल्यावर्षी याच मॅग्नस कार्ल्सनने चीनच्या डींग लिरेन या खेळाडूकडून एकदा माऊस स्लिप झाल्याने तो हरला होता म्हणून दूसऱ्या सामन्यात त्याने स्वतःहून तो सामना सोडण्याचा दिलदारपणा दाखवला होता. 

आता अशा मॅग्नसला आमचे भारतीय लोक आली रे आली आता तुझी बारी आली म्हणून घराकडे जायचा सल्ला चवताळून देत आहेत. 

यातून एकच दिसतंय, खेळ, खेळाडू त्याची माहीती याच्याशी काहीही कुणाही भारतीयाला ममत्व नाही तर हुल्लडबाजी करण्यासाठी खेळाडूंचा वापर करून घ्यायची  नवी सवय आम्हा लोकांना लागलीय. 

रमेशबाबू प्रज्ञानंद याचे कष्ट, खेळ, अभ्यास याच्याबद्दल कौतुक आणि कालच्या विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! 

भारताकडे पुन्हा एकदा प्रज्ञानंदच्या खेळाने विश्वविजेतेपद येवो त्यापूर्वी देव आम्हा भारतीयांना विजय पचवण्याची ताकद देवो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं