उत्पादन खर्च कमी करणे हे शेतीसमोरचे आव्हान
यावर्षी टोमॅटो, ढबूमिरची, हिरवी मिरची, कांदा अश्या बऱ्याच माळव्यांचे (भाजीपाल्याचे) दर पडलेत. ही जी पिके आहेत त्यांना खर्च जबरदस्त येतो. शेत घरचं असेल तर ठीक अन्यथा फाळ्याचा खर्च, शेणखतं, मशागत (नांगर-पलटी, रोटर, बेड पाडणे) तेलाचे दर वाढल्याने साहजिक मशागतीचे खर्च वाढलेत. त्यानंतर मल्चिंग पेपर, ड्रीप(ठिबक) मल्चिंग ला होल मारणे, तरू (नर्सरी) , औषधं, लागवडी (रासायनिक खते) , बांधणी (तार काठ्या सुतळी) , या साऱ्या गोष्टींसाठी मोठ्ठा आणि कौशल्यपुर्ण मजूर लागतो. त्यांची मजूरीही मोठ्ठी आहे (याबद्दल आक्षेप असण्याच काही कारण नाही.). महत्वाचं राहीलं वीजबील. हा एवढा पैसा ओतावा लागतो. हा झाला खर्च.
रोग एवढे भयानक येतात कि, दोनदिवस दुर्लक्ष झालं कि अख्खा प्लॉट भिकेला लागतो. आधुनिक शेती, आधुनिक शेती म्हणतो हे खरं आहे. पण त्यामागे असणारा खर्चाही तसाच दांडगा आहे. भल्याभल्या शेतकऱ्यांनी एकरात पाचसात दहाही लाख मिळवले पण त्यात सातत्य नाही. खच्चून एकदा मटका लागला कि त्याची यशोगाथा (success story ) छापून जरी आली तरी दोन वर्षांनीही त्याचा सातबारा कोरा नसतो. ही सत्यपरिस्थिती आहे.
मालाची आवक वाढली तर दर पडणार हा कोणत्याही बाजारपेठेचा नियम आहे. भरमसाठ केलेला खर्च आणि पिक हाताशी आल्यावर पडणारा दर यामुळे भलभले शेतकरी कच खाल्लेत. अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. उत्पादन खर्च कमी करणे हे शेतीपुढचे मोठ्ठे आव्हान आहे. त्यात मग खतं, औषधं, मजूरी हा सर्व खर्चा कमीत कमी कसा होईल हे बघावं लागेल. सध्यातरी दांडग्या खर्चाचे प्रयोग करणे टाळावे. यशोगाथांना भुलू नये.
मोटिव्हेशनल स्पिकर लोकांचं ऐकून कुणाचंही भलं झालेलं नाही. शेतीत वेळ साधून येणाऱ्या मोटिव्हेशनल स्पिकरांमूळे शेतकऱी देशोधडीला लागतोय. किमान औषधधारक कंपन्यांनी, खत कंपन्यांनी , जे काही मार्केटिंग करायचंय ते करा मात्र शेतकऱ्याच्या गळ्याचा फास आवळू नका. त्याला आमिष दाखवू नका. नवीन युवा वर्ग मोठ्या हिमतीने शेतीत उतरतोय. त्याचा काँन्फिडंस कायमचा जाईल हे करू नका.
आज दहाबारा हजाराची नोकरी करणारा निवांत आहे. भविष्यात त्याचा पगार वाढेल. पण तुम्हाला शेती विकण्यावाचून पर्याय राहणार नाही.
दर पडलेत, पडू दे, खर्च झालाय होऊ दे, मनाला लावून घेऊन त्यातलं परत काही येत नाही. सध्या निराशेच्या गर्तेत अनेकजण आहेत. काहीही टोकाचं पाऊल उचलू नका. मन शांत ठेवा. कमी खर्चात येणारी पिके कशी घेता येतील, रोगराईला कमी बळी पडणारी पिकं घ्यायचा प्रयत्न करा. दोनेक पिकांत रिकव्हर होतो झालेला लॉस.
शेती सोडणे, शेती विकणे, स्वतःला त्रास करून घेणे ह्यावेळी योग्य नाही. आपल्याकडे हक्काची जमीन आहे. गेल्या दोनेक वर्षांत अनेकांच्या नोकऱ्या, चांगले चालत असलेले व्यवसाय तळाला गेलेत. दुःख सर्वांना आहे. वेळ निभावून नेणे ही मोठ्ठी गोष्ट आहे. तेवढी नेऊया.
सरकराची नुकसानभरपाई, मदत हे कुठंही पूरत नाही. ते मग केंद्र करो कि राज्य करो. ह्या मदतीवर असाही शेतकरी अवलंबून नसतो. जीवात जीव आहे तोपर्यंत लढणे हा शेतकऱ्याचा धर्म आहे. लढत राहू.
टिप्पण्या