अजितदादांची टोचणी

'मी तीन साखर कारखाने चालवण्याचा प्रयत्न केला मात्र ते किती अवघड आहे ते आत्ता कळालं. मला कुणी साखर कारखाना काढू का विचारलं तर मी सांगेन कि, बाकी काहीही करा पण साखर कारखान्याच्या नादी लागू नका !' 
असं वर्षभरापूर्वी नितीन गडकरींनी पुणे ईथल्या साखर परिषदेतलं स्टेटमेंट आहे. 

साखर कारखान्यांचे खाजगीकरण, किंवा आर्थिक स्थिती डबघाईस आल्यास भाडेतत्वावर कारखाना चालवायला देऊन बँकेच्या थकबाक्या परत करणे, शेतकरी, कामगार यांची बिलं अदा करणे हे उद्योग महाराष्ट्रात गेल्या वीसेक वर्षापासून चालू आहेत. ही काय नवी गोष्ट नाही. 




आमच्या भागातील ईचलकरंजीचा पंचगंगा कारखाना ज्याची स्थापना देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी केली तो कारखाना आज वीसेक वर्षं झाली भाडेतत्वावर दिला गेला आहे. रत्नाप्पा कुंभार गेल्यानंतर त्यांच्या कन्या आणि पाच वर्षामागे भाजपात गेलेल्या नेत्या रजनी मगदूम यांच्याकडे हा कारखाना आला. त्यावेळी ७० लाख रूपयेचा त्यांचा ब्राझील दौरा गाजला आणि त्यानंतर वर्षभरात कारखाना मोडकळीस आला पुढे तो रेणुका शुगर्सला भाडेतत्वावर देण्यात आला. तो आजतागायत भाडेतत्वावरच आहे. 

७० लाखाचा दौरा सौ. मगदूम यांनी केला असेल -नसेल हा भाग निराळा मात्र आकडेवारीनुसार आण्णा चेअरमन असतानाही कारखाना डबघाईस आला होता. आता रत्नाप्पा कुंभार हे काही स्वतः स्थापन केलेला कारखाना मोडून खाण्याएवढे वाईट राजकारणी नव्हते. 

किंवा ताजं उदाहरण गडकरींचं घ्या. गडकरी तर हवेत असे बोलणार नाहीत. ज्यावेळी त्यांनी स्वतः तीन कारखाने काढले आणि त्यातील परिस्थिती पाहीली त्यावेळी ते विचारपूर्वक बोलले. 

 सांगलीचा वसंतदादा कारखाना गेली काही वर्षे दत्त ईंडिया या कंपनी कडे चालवायला आहे. 

जरंडेश्वर साखर कारखाना हा काही अजित पवारांशी संबंधित मंडळींकडे चालवायला नव्हता. तो कारखाना डबघाईला आल्यानंतर  न्यायालयाने तो कारखाना लिलावात काढला त्यानंतर हनुमंतराव गायकवाडांनी तो चालवायला घेतला. तेही तोट्यात गेले. नंतरून तो कारखाना अजित पवारांशी संबंधित गटांनी चालवायला घेतला. 

अजितदादांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेतली ती प्रेस साधारण ५० मिनटांची होती त्यात त्यांनी या कारखान्यासंबंधी अर्धा तास स्पष्टीकरण दिलं. 

एकंदरीत साखर उद्योग हा कुणाला पटो वा न पटो केंद्र सरकार आणि राज्य सरकाराच्या कृपेने आजवर चालत आलाय. साखर विक्री परवडेनाशी झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल उत्पादनाकडे साखर कारखान्यांनी वळावं अशा स्पष्ट सुचना साखर कारखानदारांना केल्या. 

सहकार हा वरवरचा गोडवा जरी दिसत असला तरी, सहकारात सतरा कारभारी असतात. जे सहकारी साखर कारखाने आदर्श आहेत. चांगले चालतात तिथे जाऊन एकदा बघा चेअरमन हाच कारभारी असतो बाकीचे संचालक मंडळ चहापाणी भडंग खाऊन पिऊन सही करण्यापूरते मर्यादित असते. त्यांचा निर्णयप्रक्रीयेत सहभाग नसतोच. ते कारखानेही खाजगी पद्धतीनेच चालत असतात. नाममात्र निवडणूका होतात. बाकी चेअरमनाची किंवा ते पॅनल ज्याचं असतं तोच कारभारी असतो. तोच ठराव करतो , तोच मंजूरी घेतो. या पलिकडे तिथं बाकी काय नसतं. 

सहकारी कारखाने मोडून उलट खाजगीकरण होईल तितकी स्पर्धा वाढेल आणि चार पैशे पदरात जादा पडतील. बाकी सहकाराचे गोडवे गाणे म्हणजे दारूड्या, मारझोड करणाऱ्या नवऱ्याच्या नावाने कुंकू लावण्यापलिकडे काही नाही. 

जे सहकारी कारखाने आज चालत आहेत ते कुणाचे विचारा, हा अमक्या दादाचा, हा तमक्या साहेबांचा असंच बोललं जातं आणि ती सत्य परिस्थिती आहे. सहकारी साखर कारखाने आणि खाजगी साखर कारखाने यात कसलाही फरक नाही. 

फक्त अजितदादा स्पष्ट बोलतात ती टोचणी असते. बाकी काही नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?