Happy wildlife day.
सकाळी उठून ब्रश दातात धरून बाहेर आलं कि दोनचार मोर अंगणात आलेले असतात. एवढी देखणी दिसत्यात ते झोपेतंनं उठल्याचं सार्थक झालं असं वाटू लागत. कधीकधी नारळाच्या झाडावर एखाद्या रट्टयावर ते बसलेले असतात आणि पिसारा असा खाली आलेला असतो. ते बघून मन प्रसन्न होतं. संध्याकाळीही ते इकडंतिकडं हिंडून जातात. आणि मनात लहानपणीचे दिवस आठवतात. अशी संध्याकाळ झाली कि कोल्हं वरडायला सुरू व्हायची आणि त्या कोल्ह्यांचा आवाज आला कि आज्जी पाठीवर थाप देऊन 'हूल, हूल' म्हणायची कोल्ह्याचा आवाज कानाला आला कि जवळ असणाऱ्या गोष्टीवर थाप मारली कि ते चतूर होतं अशी काही श्रद्धा अंधश्रद्धा असेल ती होती. आता कुठंतरी शहाणपणा केला कि आमची आई ऐकवते चारचौघात कोल्हा झालाय त्यो आज्जीच्या थापा खाऊन.
तर हे कोल्हे लोक चारपाच वर्षापासून गायब झाले.
पुर्वी रानात शाळू असायचा आणि त्यात रानडुक्कर लोक धुडगूस घालायचे म्हणून आज्जा कुठनंतर मेलेल्या म्हशीच शिंग आणायचं आणि संध्याकाळला पेटवून द्यायचं, शाळू कमी झाला. रानडुक्कर तर बघून तीनेक वर्ष झाली असतील. एकदातर कोल्ह्याची पिल्लं आमच्या ऊसात सापडलीती. तर हे सगळे लोक हळूहळू गायब झालेत. आडवाटंनं जाताना गाडीच्या आडवं ससा येतो आणि त्याला गाडीच्या लायटीच्या फोकसमध्ये कुठं जायचं हे न सुधरून ते हलतं तवा माझाच जीव उचमळतोय. आता जवळ कसला तर कारखाना आलाय सतत ढाणढाणढिण्ण आवाज येतोय. कोल्ह्याचा आवाज येईल म्हणून वाट बघावं तर कोणत्यातरी देवाचं काहीतरी भंगार म्युझिक ऐकू येत असतं. त्यावेळी वाटतं आयला हे सगळे कोल्हे, डुक्कर वगैरे लोक कुठे गेले असतील ? ते काही परत यायचं चिन्ह नाही. त्यामूळे सध्या असलेले मोर साळींदर खारूताई घुबाड असे जीव दिसले तर पाचदहा मिनीटं खर्च करून बघून घेतो. उद्या हेही नसणार. तेव्हा निदान हे बघिटलेलं तर डोळ्यापुढं उभं राहील. आमचं जंगल हेच होतं. ते आता हळूहळू संपत चाललंय. Happy wildlife day.
टिप्पण्या