आमचे गावपुढारी
आता तूर्त तरी गावची ईलेक्षण नाही.
अजून दोनेक वर्षे बाकी राहीलेत. एक बाकी अशी भानगड असते कि, मतदारसंघात कुणी खासदार, आमदार वगैरे असतात. त्या प्रत्येकाला वाटतंय कि, या गावात माझीच सत्ता हाय.
ही भानगड अशी कशी ?
तर आमचे गावपुढारी ही अतिशय चलाख जमात. आला रे आला एखादा कि सगळे गडी मिळून त्याला असं काय घेरतात कि. आम्ही तुमचच. द्या गावाला कोटभर रूपये. झालं खुशीने फंड येतो. कामंही होतात. गावपुढारीही प्रगती करतात.
मग ह्या फंडाच्या कामात रस्ता उकरला जातो. मग लोकलचे चारदोन ब्लॅक व्हाईट पेप्रे. ग्रामस्थांची गैरसोय, ग्रामस्थांचा संताप अनावर, ग्रामस्थाचं उपोषण ह्यंवत्यंव बातमी छापली कि पुढाऱ्यांना वाटतंय आयला गैरसोय ग्रामस्थांची होतेय. चला देऊ निधी. डबरा बूजवायला निधी आला रे आला, गटारी बूजल्या जातात.
मग परत गटार तुंबल्याने, डेंगू वगैरे रोग येतात. मग परत पेप्रे एक्टिव्ह होतात. नागरिकांत काळजीचे वातावरण, चारजण अस्वस्थ वगैरे.
परत गटारीसाठी निधी आणला जातो. अशा रीतीने वर्षानूवर्षे मजा चालत राहते.
कोविडमध्ये तर सॅनिटायझर टनेल, ते व्हाईट आर्मीचे पोलिसांची नेमणूक वगैरे अशा भंगार प्रकरणांतून गावोगावच्या ग्रामपंचायतीने एवढा खर्चा दाखवलाय. त्याला काही हिशेब नाही.
ग्रामस्थ बांधव सगळीकडेच गरीब असतात. त्यात एखाद्याने केला शहाणपणा तर त्याला कशात तर अडकवायचच. मग ते परत बोंबलत पुढाऱ्यांच्याच घरला जातंय. आण्णा मला ह्यातनं बाहेर काढा. मग आण्णा परत तिथं मजा करतो.
आमदारकी खासदारकी वगैरे निवडणूका अशाच होत असतात. पण चावडी लै बेकार आणि पुढारी अतिशय हलकट. त्यामूळे किती कोण प्रशांत किशोर असले तरी ते हे एवढ्या कमी स्पेसमध्ये रूम बनवून खेळलेले गावठी पठ्ठे बघितले तर जाताना वढ्यावगळीवर आंघोळ करून गेल्याशिवाय राहणार नाहीत.
टिप्पण्या