पद्ममश्री देशभक्त डॉ. रत्नाप्पा कुंभार

निमशिरगाव हजार दीड हजार लोकसंख्येचं गाव. त्या गावात भरमाप्पा आणि गंगूबाई कुंभार या कुंभारकाम आणि शेती करणाऱ्यांच्या पोटी रत्नाप्पा कुंभाराचा जन्म झाला. मराठी शाळा निमशिरगावात, हायस्कूल हातकणंगलेत, कोल्हापूरला राजाराम कॉलेजातून बी.ए केलं. एलएलबी चं शिक्षण चालू होतं. 

  देश पारतंत्र्यात होता, इंग्रजांची जूल्मी राजवट होती. शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं शोषण होत होतं. त्याच काळात भाई माधवराव बागल यांनी इंग्रजांविरोधात गावोगावी सभा घेण्याचा सपाटा लावला होता. सभेतून ते जनतेचं प्रबोधन करत. इंग्रजांचे खबरे त्यावरही लक्ष ठेवून असत. माधवरावांना त्या काळात तुरूंगवासही भोगावा लागला होता. रत्नाप्पा कुंभार माधवरावांच्या विचारांकडे आकर्षित झाले आणि शिक्षण सोडून देऊन स्वातंत्रलढ्यात पडले. 
 
 इंग्रजांचे भारतीय खबरे जे होते, ते माधवरावांच्या सभेला उपस्थित राहून त्याचं रिपोर्टिंग करायचे , हे लक्षात येताच आण्णांनी पाचदहा खबऱ्यांना तुडवलं. 

तिथून ही जुल्मी राजवट उलथवायची असेल तर इंग्रजांची संपर्क यंत्रणा तोडली पाहीजे हे लक्षात घेऊन आण्णांनी मोजक्या विश्वासू साथीदारांसोबत घातपाती कारवायांना सुरवात केली. चावडीला आग लावणे, कचेऱ्या जाळणे, इंग्रज शिपायांना दम देणे, ऐकून न घेतल्यास पाय वगैरे मोडणे असं मजबूत काम आण्णांनी सुरू केलं. 

आण्णांच्या मागे पोलिस लागले. त्यावेळी मिरजेच्या दंडोबाच्या डोंगरावर ते गुप्त बैठका घेऊन पुढची दिशा ठरवत असत.

पुढे या चळवळीच्या कामासाठी पैशाची चणचण जाणवू लागली. मिरजेजवळील मालगावात काही मोजक्या क्रांतिकारकांची रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर १९४३ च्या सुमारास ३ दिवासांची गुप्त बैठक झाली व यात बार्शी  रेल्वेतून जाणारे इंग्रजांचे टपाल लुटण्याचा बेत त्यांनी आखला गेला.
  
 चनगोंडा पाटील, काका देसाई, कुंडल देसाई, आय.ए. पाटील, व्यंकटेश देशपांडे, हरिबा बेनाडे, दत्तोबा ताबंट, ईश्वरा गोधडे, शंकरराव माने या क्रांतिकारी युवकांनी रत्नाप्पांच्या नेतृत्वाखाली २९ डिसेंबर १९४३ रोजी बार्शी येथे टपालाच्या डब्यावर हल्ला केला. ड्रायव्हर, फायरमन व गार्ड यांना पकडून त्यांना दोन ते तीन मैल लांब सोडून देण्यात आले. टपालाच्या पिशव्या व थैल्या ताब्यात घेऊन सर्वजण पसार झाले. 

  या लुटीत अनेक मौल्यवान वस्तुंबरोबरच एका शाळेच्या हिंदी परीक्षेच्या सर्टिफिकेट्सचा पुडका होता. तो पुडका कार्यकर्त्यांनी पोष्टाने त्या शाळेला परत पाठवला.

पुढे काही मोजक्या साथीदारांना सोबत घेऊन रत्नाप्पांनी जेजुरी  येथील खंडोबाच्या मंदिरातील जामदारखाना लुटण्याचा बेत आखला. २७ जुलै १९४४ रोजीच्या रात्री शंकरराव माने, डॉ.माधवराव कुलकर्णी, दत्तोबा तांबट, शाम पटवर्धन, य. म. कुलकर्णी, शि. पी. पाटील, इब्राहीम नदाफ निवडक सहकारी क्रांतिकारी युवकांच्या साथीने रत्नाप्पांनी जेजुरी देवस्थानावर दरोडा घातला. तेथील सेवेकरी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ल्ला करून त्यांना मारहाण केली व पुजाऱ्याकडून मंदिरातील जामदारखान्यातील तिजोरीच्या किल्ल्या घेऊन खजिना उघडला. तिजोरीत इंदूरचे होळकर , ग्वाल्हेरचे शिंदे आणि पुण्याचे पेशवे व इतर धनिकांनी खंडोबाला दिलेल्या सोन्याच्या, रत्नांच्या कुड्या, माणिकाचे खडे, पानड्या, लाकड्या, कंठी, मोत्याचे तुरे, कंबरेचे छल्ले, शिरपेच, देवाचे मुखवटे, जडजवाहीर, सोन्याच्या मूर्ती असे कोट्यवधी रुपये किमतीचे दागिने होते ते घेऊन हे सर्वजण पळून गेले.

  पोलिसांनी या दरोड्याचा तपास लावला व रत्नाप्पा कुंभार सोडून बाकीच्या सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. १९४५ सालच्या जानेवारीत पुणे कोर्टात १३ आरोपींवर खटला भरण्यात आला. ब्रिटिश सरकारने रत्नाप्पांबद्दल माहिती देणाऱ्या अथवा त्यांना अटक करण्यात मदत करणाऱ्यांसाठी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले तरीसुद्धा ते काही सापडले नाहीत. पुढील ६ वर्षे ते अज्ञातवासातच होते. त्यांनी सहकारी क्रांतिकारकांच्या सोबतीने लुटलेल्या पैशाचा वापर भूमिगत चळवळीच्या कामासाठी अत्यंत योग्य रितीने केला.

१९४७ साली त्यांचे वडील भरमाप्पा यांचे निधन झाले, ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्या घरावर त्यांना पकडण्यासाठी पहारा ठेवला होता पर्ंतु रत्नाप्पांनी वेशांतर करून वडिलांचे अंत्यदर्शन घेतले व ते त्याही वेळेस ही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

 १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर एके दिवशी अचानक ते कोल्हापुरात अवतरले.

आण्णांनी सहकार रूजवला, वाढवला. विकासाचं राजकारण केलं. मोठमोठ्या शाळा असोत कि वाचनालंय त्यांना भरभरून देणग्या दिल्या. पाणी पोहचवलं. 

त्यांच्याच नेतृत्वात स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधीन २१ संस्थाने खालसा करून देशात समाविष्ट झाली. संस्थान प्रजा परिषदेचा ईतिहास फार मोठ्ठा आहे त्याच परिषदेने कुणाचीही हुकूमशाही खपवून घेतली जात नाही हा संस्कार कोल्हापूरवर झाला आहे.

राजकारणात आण्णांना जातीचा फटका बसला. अल्पसंख्यांक लिंगायत धर्मातील नेता असूनही ते त्यांच्या कर्तृत्वामूळे घटनासमितीचे सदस्य होते. माणसाच्या अंगी जर कर्तृत्व असेल तर आपण कुठे जन्मलो, आपली आर्थिक परिस्थिती काय ? किंवा कुठल्याही बालिश प्रश्नांचा विचार करावा वाटत नाही. 

मात्र १९८० सालात जे काही आण्णांच्या बाबतीत पक्षांतर्गत जातीचं घाणेरडं राजकारण झालं त्यामूळे आमच्या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळालंच नाही. याची सल कायम मनात आहे या जिल्ह्याच्या. 

आण्णांना जाऊन आज २२ वर्षं झाली. आजही हा तालुका समृद्ध आहे हे तालुक्यात त्यांनी ऊभारलेलं रचनात्मक कामांचंच फळ आहे. हा एवढा मोठ्ठा नेता या मातीत, अल्पसंख्याक जातीत, कुंभारांच्या घरात होऊन गेला हे केवळ आजच्या काळात अविश्वस्नीय वाटतं.

आण्णांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं