हा विकास आहे का ?
जयसिंगपूरात दसरा चौकात मोठ्ठं स्टेडियम आहे. रोज काही क्रिकेटचे सामने चालू असतात. सहज जाऊन बसलं कि बघू वाटतं. काल अशीच एक मॅच चालू असलेली बघिटली.
नंतर एकंदरीत हावभावावरून वाटलं कि ही खेळणारी पोरं मुकबधीर असावी.
शेजारी बसलेल्या एका माणसाला विचारलं तर खात्री झाली कि ही मुकबधीर पोरांच्या मॅचेस होत्या.
आणि ज्यानी ही माहीती सांगिटली, ते गृहस्थ कोल्हापूरचे होते. त्यांचा मूलगा खेळायला आलता.
त्यांचा मूलगा बोलू शकतो पण ऐकायला येत नाही. आणि ही सारी पोरं टू-व्हीलरवरून कोल्हापूरवरून आलती. हा बापमाणूस पोराच्या काळजीपोटी मागून आलेला. त्यांनी सांगिटलं कि, घरी पोरगं येईपर्यंत हूरहूर असते, ती काळजीच नको म्हणून एखादादिवस काम टाकायचं आणि यायचं.
अर्थात अनेकांचे पालक तिथं पोरांबरोबर आलते.
आमच्यापेक्षाही ती मुलं भारी खेळत होती. त्या पोरांचे पालकही गडी संवेदनशील. त्याहून त्यांच्या संस्थांनीही या पालकांचं प्रबोधन केलेलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुर्वी मुकबधीरांनाही लोकच काय घरचेही वेगळी वागणूक द्यायचे, पण आता काळ बदलला. या व्यक्तींनाही सन्मानाची वागणूक, समान संधी मिळतात. आणि तेही चांगलं काम करतात. बदल हे काही एका रात्रीत घडत नाहीत. यामागे असंख्य लोकांनी खस्ता खाल्लेत. ते व्हिडीओ कॉल द्वारे हातवारे करूनही ती मुलं बोलत असल्याचं बघिटलं. व्हिडीओ कॉलही या लोकांच्या संवादासाठी उपयुक्त माध्यम झालंय.
समाज दिवसेंदिवस संवेदनशील होतोय, चांगल्या वळणावर जातोय, हे विकासात बसत कि माहीती नाही पण जे होतंय ते चांगलं आहे.
टिप्पण्या