बारा लाखाची कोथिंबीर
मध्यंतरी कुण्यातरी एका शेतकऱ्याला कोथिंबीरीतून १२लाखाचा नफा झालेली बातमी माध्यमांनी भयानक जोरदार वाजवली होती.
एका दूसऱ्याच कुण्यातरी शेतकऱ्याचा डोक्यावर पैशाची बंडलं धरलेला फोटोही आलता. बघून अत्यंत चांगलं वाटत होतं.
आजची बातमी एक वेगळीच आहे. नारायणगाव मार्केट यार्डात ७०,००० कोथिंबीर आणि मेथीच्या जूड्या टाकून शेतकरी घरी परतलेत.
आवक जादा झाली कि, दर पडतो हे शहाणपण शेंबडं पोरगंही सांगतं.
मात्र प्रत्यक्षात एवढी आवक का झाली ?
याला कारणं ही माध्यमं आहेत. एखादी ष्टोरी अशी वाजवायची कि अक्षरशः त्या कोट्यावधी शेतकऱ्यांच्यातले निम्मे तरी हपापून मागे लागतातच. आणि आज जी परिस्थिती आलीय ती तयार होते.
कुणाचे बारा लाख झालेत म्हणून कुणी तडफडायचं कारण नाही, मात्र या बातमीदार मुर्ख लोकांना बरोबर सांगता येत नाही का कि सदर वेळी आवक कमी होती त्या परिस्थितीत या शेतकऱ्याचे १२ लाख झाले.
दहा गुंठ्यात कोट्यावधी रूपये. कोथिंबीरीचे बारा लाख, इंजनेरांनी फॉरेनातून नोकरी सोडून केलेली शेती. ह्यंवत्यंव ष्टोऱ्या आठपंधरा दिवसाला दिसतातच.
काही अशीही लोक आहेत दोन नंबराचा पैसा या माध्यमातून एक नंबरात आणतात. या आतल्या गोष्टी झक मारायला कुणीही सांगत नाही. आणि वरून शेतकरी जमात ही कडकनाथ, कोथिंबीर, कशालाही भूलतात.
बिया टोकल्या पाणी पाजलं, आली मेथी असं होत नाही. मेथीचं उत्पादन घेणं सोप्पं नाही. भरदूपारी द्या पाणी जळून जाते मेथी. या हजारो पेंड्या कुणी मुद्दामून टाकलेल्या नाहीत.
टिप्पण्या