माझं पोरगं साव्वीला हाय. एकटंच हाय. म्हणजे मला एकच पोरगं हाय. काल रातरी जेवताना शुभ्या त्वांड बारिक करून बसलंतं. मला वाटलं हिचं आणि त्यचं कायतर ख्यानपिन्नं झालंय. म्हणून लै काय वाटलं नही मला. मी बेतानं जेवलो आणि पाणी लावाय गेलो. पाणी लवून यायलतो तर येमेटी बंद पडलं, च्वाक लवून बघिटलो तरीबी चालू हूईना. आत्तरहिच्याबायली ! म्हणटलो आणि ढकलत आणलो. शुभ्याचं बेणं कुठतर फिरवून आणलं अशील आणि त्याल सपलेलं बघून लावलं अशील. आलिकडं जरा बिघडंलय, दात लावल्यागत करालंय. काय करायचं म्हणा. 
तर मला यायला साडेआकरा वाजलं. सोप्यातलं लैट चालूच हूतं. यिवून दार उघडलो तर शुभ्या अभ्यास करत बसलंतं. माझं मलाच वईट वाटलं. पोरगं चांगल हाय, अभ्यास बी करतंय. मीच म्हणटलो, झोप आत्ता सकाळी लवकर ऊठून कर आभ्यास. आत्ता करून काय ध्यानात र्हात नही. 
ते म्हणटलं, नही पप्पा गृहपाटची वही पुर्ण करायची हाय. 
सकाळी ऊठून कुठं नांगर वढायला जाणार हायीस काय ? 
ते परत म्हणटलं, तुमी झोपा जावा. 
मी लै विषय वाढवलो नही. थंड वाजालती. बायकू घोरत पडलीती. मग मी बी पडलो. 
खरं झोप काय लागीनाच. ऊगचच पोरगं आटवालं तोंडाफूडं. 
नंतर कवातर झोपलो. सकाळी उटलो तरमाझ्या आगूदर ऊटून पोरगं लिवत बसलंतं. 
आयला मामलंदारच पोरगं मामलेदार हूईल आसं वाटलं. गोट्याकडं गेलो, शानघाण आवरून वैरण टाकून आलो. च्या प्यायचं आणि धार काढायला जायचं आसंच ठरवून आलो. 
तर हे लिवता लिवता रडालंत, डोळं आकशरशा ठपकालती. गेलो जवळ. काय झालं रे विचारलो. तर आणि गप्प बसून रडालं. आयला डोस्कंच फिरलं माझं. हिला बोलवलो. तर ही बी पोराला काय झालं शुबु ? काय झालं सांग ? 
आत्तारहिच्याआयला !! काय भानगड ? हिचं बी काय वांदं नही. मग काय झालं अशील ? आता ह्यलाच इचारतो, काय झालं सांग की शुभ्या, दोघं काय आई घालालोय व्हय रे हिथं आं ? 
अरारारा पोरंग हामसून रडायला लागलं. 
म्हणटलं जाधव मॅडमनी दहावेळा गृहपाट लिवायला लावलंय. आज मला मारलीतपण. वर्गात तासभर ऊभा केलीत. 
पोरगं लैच रडालतं. नंतर मान दाकवला, पट्टीच वण हुतीत. बघवलं नही. 
जाधव म्याडम काय ? वशाची पूरगी बीयेड झाल्या आणि वशिल्यानं लागल्या थांब तिच्याआयला दाकवतोच यकदा. जरा मस्तीचीच हाय. माझ्या पोरग्याला रात्रभर यवढा तरास. मारल्या तर कसं ? बै हाय काय भिताड. 
हिथं मला एकच पोरगं. तीनशे फूटखालंच बोरंच पाणी पाजवतो, साट रूपयं किलोचं तांदूळ खायला घालतो आणि ही पटापटा मारत्या. काय जीव म्हणटला अशील माझ्या पोरग्याचा ? नही आत्ता धार काडून येतो आणि दाकवतोच हिला. 
धार काडून आलो. न्यारी केलो. शूभ्याला लिवू नको म्हणटलं. काय करत्या ते बघतोच एकदा. 
आकरा गेलो शाळंत. पारथना चालू हूती. ती आटपल्यावर मुक्याध्यापकच्या खोलीत ह्यला घिवून गेलो. त्यला सांगिटलो हे जे परकार केल्या ते तुमाला तरं शोभतंय काय ? 
ह्यानं तिला बोलवून घेटलं. 
तीबी नाटकसाळी आली. मी काय बोल्लो नही. मस्त बोलावं वाटतंय. गावातल्या गावात बरं दिसत नही. किती केलं तर बईमाणूस शेवटला ती. मास्तरंच तीला रौंडावर घेटला. तुम्हाला कळत नाही का ? 
ती म्हणटली, माझ्या हातून जो प्रकार घडला त्याबद्दल मी तुमची माफी मागते. 
मास्तर म्हणटला परत असं काही कानावर येता कामा नाही. 
ती गेली लगेच. लाज वाटली आसलं की नाटकसाळीला. सुद्दं बोलत्या झाला प्रकार म्हणं. मास्तरनं मला आणि शुभ्याला क्वाफी पाजली. कडवाट. 
खरं चांगलं हूतं. गोडमुद्द चा पिवून ईट आलतं. तोंडाची बाबळी गेली. शुभ्याला जा म्हणटलो शाळेत. आणि घरला आलो. चिरमूर आणलो पंचवीस रूपयच. शेंगा घरच्या हायीत. बायकूला भडांग आणि चिरमूर्याच लाडू करायला लावलो. 
ती चारदा इचारली, मापी मागिटली नव्हं ? मापी मागिटली नव्हं ? सांगून सांगून बास झालं. हिची एकदा मापी मागाय लावली पाहीजे आसं वाटलं. हिनं लाडू आणि भडांग केलं. शाळेतंन आल्यावर पोरगं खाल्लं. मी बिनसांगताच रातरीला दूधातल्या दशम्या आणि झुणका केली ही. बेश्ट लागलं जेवानं. तीघंबी ज्याम जेवलो. गृहपाटाची वई तपासली आणि व्हेरी गुड असं कायतर दिलंय म्हणून शुभ्या म्हणटला. आज साडेनवूलाच झोपला. झोपू दे. एकचं पोरगं हाय मला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं