एकूणसत्तर वर्षाचा हाय मी.

एकूणसत्तर वर्षाचा हाय मी. देश स्वतंत्र करूनच जल्मलो. म्हणजे वय झालं म्हणाच की माझं. चारटर्म गावची सरपंचकी हाणली, गाव हागणदारीमूक्त केलो, मग मलाच वार्डातल्या शाण्याटक्कूर्याच्यानी मूक्त केलं. इस वर्षं म्हणजे काय च्येष्ठा नही. यकदा झेडपीच बी तिकीट गावलं राह्यलो खरं निवडूण आलो नही. गावातली जंता चांगली हाय. शेजारच्या गावातल्यासनी आक्कल नही म्हणा. मंजे आसं झालं ते म्हणत्यात कणी, पहिला पंत, दूसरा हानूमंत आणि तिसरा ह्याच्यातला जंत. तसं मद्दान पडलं बघा. आणि आविष्याला ऊट्ट लागला. नहीतर आमदार झालो आसतो. हालसिद्दाप्पाला बी कवाल लावलंत. ऊजव दिलतं.
आता पत्रक वाचतोय, चाळशी लागल्या, मालकीन कवातर तांदूळ नीट करताना चाळशी घेत्या. कुठं ठेवत्या कळत नही. एकेकदा गावत नही. राग येतूय. दोनदा अटक आलंय. काय ह्यच्याआयला, गावातलं गायरान इकलो तर कुणाची हिम्मत झालं नही अटक करायची. खरं अटक आलं. पोरगं मंबईला हाय. बहीरच्या जातीतली पोरगी करून घेटलंय. आमचा बा माळावर मारून घातला आसता आसं बट्टा लावलो आस्तो तर. नही म्हणटलं तरीबी मला खानविलकर सायबाची पोरगी आवडायची. दोनदा जीपातंन फिरवून आणलोय तिला. डीयसपी खानविलकर म्हणजे लै वांड. खरं दारूत गेलं गाफट. पुढं नाशकाला बदली झाली. मंदा बी गेली. हिकडं बा नं आठराव्या वर्षातंच लगीन लावलं. हिला काय आर्थ नही, ह्यंगाडंच हाय. बा चं उत्तपन गावलं म्हणून बरं झालं. नहीतर तवाच सोडचिट्टी दिलो आसतो.
आता ऊगच त्यचं इचार करून काय उपेग नही.
मोठ्ठं कुक्कु लावत्या आणि सा वारी नेसत्या. मेव्हणी आलती परवा. दादा म्हणत्या. पन्नासवं वाटदिवस हूतं लग्नाचं. तुमी तईला लै संभाळून घेटलासा म्हणटली. उगचच शंका कुशंका झालं. संभाळून घेटलं म्हणटल्यावर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं