मराठी भाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !!!!!!

मराठी भाषा दिन.
लहानपणापासून मराठी भाषा मला लै आवडते. आमच्या घरात कन्नड बोलंल जातंय. ते त्यांच्या त्यांच्यात. मी जन्मलो तस किंवा ज्यावेळी ऐकायला बोलायला यायला लागलं तवापासून माझ्याशी घरातले सगळे मराठी बोलायला लागले. आमचं आज्जा लै भारी माणूस गावात प्रामाणिकपणा काय ते त्यांच्याकडंन शिकायच अस होतं. कार्तिकवारी करायचे पंढरपूरचं. ज्ञानोबा, तुकोबा , जनाबई , पुंडलिक, रामायण, महाभारत, गोरखनाथ मच्छिंद्रनाथ, त्यांचं बालपण ह्या सगळ्या गोष्टी सांगायचे. 
मुक्ताबाई नं मला रडवलं, ज्ञानोबाच्या समाधीनं तर आज्जांच हात घट्ट पकडायला लावलं, तुकाराम हसवायचा मोक्ष सुखा हाणू लाथा म्हणायचा. आज्जी पूराणातलं मुक्त होवून मोक्ष मिळवायच हे सांगिटली की मला वाटायच काय अर्थ ? मला घाबरायला होत होतं तवा तुकाराम मला लै भारी वाटायचा. जनाबई म्हणटली ' विठ्या मेल्या तूझी रांड रंडकी झाली' देवाला कसं म्हणटली ही ? हे बघून मला जना लैच आवडली.
नामदेवानं तर मज्जाच केलती, कापडाला गिर्हाईक नही म्हणून दगडास्नी कापडं घालून आला. नंतर दगडास्नी आणून घरात बांधून घातला. मला बाजारला जाताना हेच आठवत राहिलं अजूनपण. कुस्तीत बाहेरच्या देशातल्या लोकांनी आमच्या कोल्हापूरात येवून आमच्या पैलवानाच्या लंगोट्या जाळल्या तवा खिटकूळ्या काडीपैलवानानं गाजवलेलं मैदान न बघताही डोळ्या पुढं ऊभा राहतंय आणि काडीपैलवानाची हानुमानउडी आणि शड्डू दिसतंय. न बघताच. आज्जा काम करतंच नव्हते हिकडं तिकडं हिंडून टाळ कुटत राहायच, पंचकी तोडायला जायचे, लोकास्नी पैशे द्यायच असलं उद्योग. बाकि नियोजन ते करायचे. एकदा म्हणटले आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा. आणि रात्री ऊशिरा आले नव्हते मला रडायला आलं, नंतर आज्जा आले पळत पळत जाऊन मिठ्ठी मारलो रडालतोच, आज्जा म्हणटले चल रे वाघ्या रडू नकोस पाया पडतो पडू नकोस !
नंतर आज्जा गेले. गोष्टी मागं ठेवून.
आज्जी माझी आऊ. जात्यावर कन्या भरडायला किंवा डाळ फोडायला बसली की गाणं म्हणायची. कुरूकुरू काना गाई गेल्या राना,
झूरझूरू पाखरा
जा माझ्या माहेरी
माहेरी कमानं दरवाजं
त्यावर बैस जा
भय्याला सांग जा
बाप माझा इठ्ठलं
कवा मला भेटलं ?
आई माझी रूकमिणी
कवा मला भेटलं ?
ही असं म्हणटली की परत मला रडायला यायचं. आज्जा म्हणायचं म्हातारीला माहेरला सोडून यायला पायजे.
शिवंच्या दगडावरंन भांडण झालंकी म्हणायची रान सगळं पड शिवंभवती रड !
श्रेणिकराजाच्या कथा सांगायची. मला अप्रप दांडगं त्यात ती गाण म्हणायची.
शरणीक बसले गजावरी
चेळण राणी बरोबरी !!
गज म्हणजे आदूगर सळी वाटायचं. नंतर हात्ती कळलं.
चवथीला काॅलरशीपला बसलो. म्हणी वाक्प्रचार पाठांतरला लै आवडायचं. ते म्हणटल की भारी वाटायच अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा.
आमच्या इथ एक सूरगोंडतात्या होते. ते मास्तर. गावाकड सकाळी आज्जा गेलं की त्यांचा पेपर आणायचे. त्यावर चर्चा करायचे. त्यांच्या घरात पूस्तक लै होती. विवेकानंदाच ते भक्त. आणि ते कम्युनिस्टही. सहावीत असताना पहिल भाषन फोडलं नाना पाटलावर. जयसिंगराव पवारअण्णा त्याचे संपादक. ते भाषन मस्त गाजल. मग नाना कोण हे बरेचजणाना माहितंच नव्हतं ते कळालं. मागच्या वर्षी जयसिंगराव आलते व्याख्यानाला. पूस्तकावर सही घेतली. ते सूद्धा हारकले.
अनेकजण माझ्या मराठीत आले. मराठी अर्थाचे अनर्थ करते पण गोडवा इथंच आहे. अजूनअजून हे वाढत जाईल. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !!!!!!
smile emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं