मी आंगठाबाद्दूर हाय.

मी आंगठाबाद्दूर हाय. मला सत्येचाळीस वरसं झाल्यात. जल्मतारीख शाळतंल्या दाखल्यावर येक जून हाय. आय म्हणटली तू दिवाळीसरून पांडवपचमीला जल्मलास. माझ्या आयीवर माझं इश्वास हाय. परवा म्हणटली तूला वल्लं चटणी कांडून देतो. लगेच दिलीबी. म्हणून आयीवर माझा ईश्वास हाय. तात्या पण म्हणटलाता तू दिवाळं काढूनंच जल्मलायस. त्यामूळं मी पांडवपचमीलाच जल्मलो अशीन असं वाटालंय. 
आवंदाला काय मेळ नही. पऊस कमी पडलाय. बायकू म्हणटली एक रेडकू पाळूया. आता नही म्हणटलं तरीबी रेडी मोठ्ठी व्हायला तीन वर्सं लागतात. त्यात पुढं जवून गाब गेली तर बरं नहीतर ग्व्वाड लागली की कापायला. वयीट वाटतंय. मूक्या जनावरंच.
माझी बायकू ऐदी हाय. ती चवथी शिकल्या. तिला वाचायला येतंय. मला येत नही. शनवारी मी दूकानला जातो त्यायेळला चिठ्ठी लिवून देत्या. मी जवून बाजार घिवून येतोय.
परवा ढासाचं क्वाईल लिवायच ते मच्छर लिकविड लिवली. मग दूकानदारनं दोन पिन असलेलं येक टकूचं आणि खाली बाटली दिली. घरात पिन घालायला बटनाचं सांगाडं नही. गोठ्यात हाय. दोन दिवस गोठ्यातंच लावलो. मग वायरमान ला बोलवून आणून बोर्ड तयार करून घेटलो. हे सगळं करताना मला वाटलं नाल गावलं म्हणून घोडा घ्याचं, घोडा गावलं म्हणून लडाय करायचं, मग राजा व्हायचं. आसं वाटलं. गोठ्यातंन काढून आणून मच्छर लिक्वीड घरात लावलो. रात्री झेरो बल लावलो नही. बिलं कुठलं भरायचं ? पऊस नही आवंदा.
बायकू शिकल्या. ती लिवून देत्या मी आणतो. शाळा शिकलो असतं तर बरं झालं असतं. खरं त्यात बी काय चव राह्यलं नही म्हण. पहिल्यासारकं. इंजनेर पोरास्नी पुण्यात पाच हजारवर एक रूपयं पगार नही. मच्छर लिक्विडलाच साठ रूपयं लागत्यात, स्विच बोर्डंच येगळं. कशानं भागायचं ?
मी खरतर शाळा सोडणार नव्हतो. खरं बंडगरगुरूजीचं भ्या वाटत हूतं. म्हणून सोडलो. परवा बंडगर गुरूजी भेटला. त्यला एक कानाखाली मारलो की कोलाटी खईल दोन येळा. हे आत्ताला ठिक हाय. तवा येळं तशी नव्हती. भिऊनंच मेलो.
आता भेणार नही. आज ओपन तिर्री आली पंचवीस रूपयं गेलं. चार घरं खेळलोतो. भ्यायच नही. उद्या आणि चार घरं खेळायची.
मोबायील हाय. वायर सरकावलं आणि वरलं बटान दाबून धरलं की रेडिव लागतंय. तेवढंच जीव गमतंय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं