सव्वी जानेवारी

सव्वीस जानेवारीला आधी सव्वी जानेवारी म्हणत होतो. प्रजासत्ताक दिन हे शाळेत म्हणटलं तर चालायचं. त्यादिवशी सगळीकडं झंडावंदन असतंय. सकाळी शाळेत गेलं की परवतफेरी असायची. त्याला प्रभातफेरी म्हणतात ते हायस्कूलला गेल्यावर कळलं. गावात सोसाटी, मध्यवर्ती बँकेवर, चावडीवर, आणि समाजमंदिरवर झंडावंदन करून शाळेत एकदा करायचं. मग गावातली काही लोकं गोळ्या, बिस्कीट ,चाकलेट , बर्फ्या जिलेब्या वाटायची. ते रांग बदलून बदलून सगळं साठवायचं आणि तूझं लै काय माझं लै ? म्हणून भांडायच. नंतर एकमेकाला वाटायच. घरला झंडा फिरवत यायचं. दिवसभर खाकि चड्डी पांढरं शर्ट आणि त्यावरचा बिल्ला काढायच नाही. सोनेरी बिल्लं आवडायची नाहीत. पॅस्टीकची मोठ्ठीच्या मोठी बिल्लं लावायची. असं करायचं. 
दूपारी घरात पुरी बासुंदी नहीतर पुरणाची पोळी, फोडणी भात ते असायचं. किशना आज्जा आणि शिप्याचा केशव मामा आमच्यात कामाला येत हूतीत, ते आमच्यातंच जेवायचे, मी माझं आणि त्यंची ताटं घिवून तिथंच जावून त्यांच्याबरोबर जेवत बसायचो. किशना आज्जा गोष्टी सांगायचा. केशव तात्या पुस्तकला कव्हर घालून द्यायचा. एकदा कापडी बिल्ला शिवून कायमचं फिट्टं राहावं असं वाटलंतं, म्हणून केशवतात्याला तसं सांगितलो. संध्याकळी सुट्टी हूताना शर्ट दिलो. दूसर्यादिवशी शिवून आणलं. दोन कापडाच्या पट्ट्या आणी त्याच रंगाच्या टाक्यानं शिवलत. मधी पांढरी पट्टी लावली नव्हती. मला तवा वाटलंत की भगवा आणि हिरवा तेवढंच महत्वाचे असतात. मग त्या पांढर्या गॅपवर मी पेनानं अशोकचक्कार काढलं. दोन तीन दिवस घालून गेलो. नंतर पोरं चिडवाली. बायकांच्या झंपरच ते दोन कापड हायीत म्हणून. मग मलापण कसतंर वाटलं. नंतर ब्लेडपानानं ते कापून काढलो. त्यात खिसा फाटला. 
लहान असताना समडोळीच्या आत्याचा नवरा जंबुमामा आणि त्यांचा दोस्त गुंडा तांबोळी यायचा. खास रावंड बघायला. दोनतीन वाजता सगळी लोक आमच्या घरापास्नं जायची. पाण्याचं घागर भरून अंगणात ठेवलेलं असायचं. आज्जा अंगणात बसायचे पान खात. येणारी जाणारी लोकं आज्जांच्याकडं येवून बसायची. पान खायाची आणि गप्पा ठोकत दोनतीन तास बसायची. आज्जा पण पान झालं की तंबाखू खायचे. मधंनंच चहा. असं असायचं. 
मी बापांच्याबरोबर खांद्यावर बसून दूसरीपर्यंत रावंडाला जायचो. जंबुमामा ,मी ,बापा, गुंडा तांबोळी नांदणीच्या हाडकोच्या टेकाला जायचो. गारेगारच्या गाड्या यायच्या. बापा दोन रूपंय द्यायचे त्यात एक काळूबाळू आणि एक दुधी गारेगार खायाचं, त्याचं रस वघळत यिवून कोपर्यातंन ठिबकायच, मग अशी गर्दी वाढत जायची आणि धूरळा लांब कुठतर उडला की टेकावरची सगळी माणसं रस्त्याला पळायची. तिकडंन गाड्या यायच्या फपुटा उडायचा. जंबुमामा तिकडंन येतानाच काठी घेऊन यायचा आणि रस्त्यावर जावून बैलगाडीला हाणायचा. आणि म्हणायचा 'खाना खात्यात आणि पळायला काय घोडा लावत्यात व्हय ?' कुठतर हूयोच खाना घालत असल्यासारखं हा बोलायचा. 
मग एकामागंन एक गाड्या जायच्या. भकललेल्या गाड्या माघारी फिरवून कुठतर पैस कडेला घ्यायच्या. त्या गाडी भोवती गर्दी जमायची. मग मालक सापत्या सोडून बैल हिकडं तिकडं फिरवायचा. रंगाला फिरून गाड्या यायल्या कि परत धूरळा उठायचा. एकेक गाड्या जायच्या. अतिईर्षेत दोन गाड्या असल्या की सगळी वरडायची, दाब दाब !आत हाण. असं करत करत तिथंच टेकावर बसून अंदाज घालायची ह्याचा बैल पैला त्यचा बैल पैला. मग परत घरला जायची सगळी अंधार पडताना. 
मला घरात सोडून बापा, मामा आणि तांबोळी रात्री तमाशाला जायचे. एकदा पाठ लागून चाललोतो तर मम्मी लै मारली. तवापास्नं कधी एकदा तमाशा बघतो असं झालं. मग अकरावीला एकदा तमाशा बघायला गेलो तिकीट काढायला गेलो तर पुढं बापा. माझं मला कसतर वाटलं. मग घरला परतलो. नंतर वाडीला जतूरंला तमाशा बघायला गेलो. बर्याचदा बघितला. 
रात्री आज्जा गोष्टी सांगायचे गांधी, भगतसिंग, सुभाषबाबू, नेरू इ. लोक काय पावरीचे असतं ते. 
सकाळी आणलेल्या जिलेब्या रात्रीपर्यंत मऊ व्हायच्या. रात्री ते खायाचं. आणि झोपायचं. कधीतर दोन वाजता तमाशावरंन हे सगळे यायचे. आणि बाहेर ऊसाच चगळा पेटवून शेकत बसायचे. मी पण उठून चहा प्यायचो त्यांच्याबरोबर. मग अंगाला चटकं लागाली की घरात यिवून झोपायचो. 
....................................................
आता आज्जा, किशना आज्जा, जंबूमामा नाहीत. रावुंड पण नाही फक्त तमाशा असतो. आणि आता सव्वी जानेवारी नाही सव्वीस जानेवारी असते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं