आजचा धडा : वेळ वाया घालवू नये.

बुधवार पौष शुक्ल 4
आज बुधूवार आहे. वरती बुधवार लिवलं असलं तरी बुधुवार असं मी म्हणतो. उद्या ब्येसतरवार आहे. गेल्या वर्षी सहावीत असताना गुरूवार ला ब्येस्तरवार म्हणटलो तर सर म्हणटले शहाण्यासारखं वाग. काॅलरशिपच्या परिक्षेला बसलोय. घरातली म्हणत्यात आमचं पोरगं उशार हाय. शेजारची पण तसंच म्हणत्यात. शिल्पा माझ्यापेक्षा हूशार आहे. ती दूपारच्या सुट्टीत सुद्धा पुस्तक वाचत बसते. मला वाटतंय ती नाटकं करत्या. मूल्यशिक्षणचा पहिला तास होता. सर म्हणटले स्काॅलरशीपला बसल्यात तेवढेच वर्गात बसा आणि बाकिचे खेळायला जावा. पिंट्या आणि मह्यशा लगेच बोंबलत गेलीत. मी नवनीतचे गाईड काडून वाचत बसलो.
आज बुधूवार असल्याने बिगर ड्रेस यायचं असतंय. मी आज बिगर ड्रेस घालून आलोय.
आवळेकर मॅडम म्हणटल्या बाळा बिगर ड्रेस नव्हे बिगर युनिफाॅर्म.
पोरी कलर कपड्यातंच चांगल्या दिसतात. शाळेच्या कपड्यात बाद दिसतात.
माझं अभ्यासात ध्यान नही. कधी कधी मला शाळंला घोडा लावून शेती करावी वाटते. परवा नाना अंदाला म्हणत होता, आपल्यात शिकून मोठ्ठं झाल्याशिवाय कोण पोरगीच देत नाही.
तीनच्या बेलला डबा जेवलो. आप्प्याच्या घरला गेलो. येताना आवळा आणि चिचा पाडून आणलं दोघांनी. आप्या पोरिस्नी चिचा देतो आवळा देतो. आज मी पण दिलो. शिल्पा ला चिंचा दिलो. ती म्हणटली थँक्यु ! नंतर पोरींच्यात ती गेली. फावडी बंडी म्हणटली आहा गं तुला एकटीलाच काय सगळं. मग शिल्पानं सगळ्याना चिचा दिल्या.
शिल्पा चांगली आहे, ती मार्गशीष गुरूवारंच पुस्तक वाचत्या. बंडी फावडी आहे. कोकल्यांड सारखं तिचं त्वांड आहे. मला तिचा राग येतोय.
संध्याकाळला बोस्टन टी पार्टी ईतिहासच्या सरानं शिकवलं. माझं लक्ष नव्हतं. मी फुकन्या खात होतो. चार आणे ला चार येतात. सोळा होत्या. सगळ्या संपल्या दोन चोरून खायालतो तर सर म्हणटला काय कडबा खायालायसं का ? असं म्हणून मला बेंचवर ऊभं रहा म्हणटला. मी राहिलो. मास्तरड्या बाद आहे. मी हळूच पोरींच्यात बघितले. बंडी हसत होती. शिल्पा कधीतर चोरून बघत होती. फावडी मास्तरला गावली. मास्तरने तिला पण बेंचवर ऊभं केलं. ती बी खाली मान घालून बेंचवर ऊभी राह्यली. माझं आणि फावडीचं लगिन लागल्यागत वाटालंय. शिल्पाला ऊभं केलं असतं तर ?
पण ती ऊशार आहे. मरू दे तिकडं.
संध्याकाळी घरात आलो. दूध डेयरीला घालून आलो.
'माझा बाप अन मी' असं एक पूस्तक मी ग्रंथालयातनं घेवून आलो. ग्रंथपाल चांगला हाय. मला आदि ग्रंथपाल आडनावंच वाटायचे. पूस्तकातल्या जाधवांच्या घरी करडं हूती. आमच्यात गई आहे. ते मोठे झाले. करडापेक्षा गई मोट्टी असते. म्हणजे मी जाधवांपेक्षा मोट्टा हूईन.
अवांतर वाचन चांगले असते. असं हेडमास्तर म्हणटले.
अवांतर = आव आण तर !
मग फुडचं बघू. असं अशेल का ?
आज थंडी आहे. कालपण होती.
आजचा धडा : वेळ वाया घालवू नये.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं