रोजनिशी

आज नविन वर्ष चालु झालेलं आहे. आत्ता 7 वाजलेत सकाळचे. मी मसोबाला जावून आलेलो आहे. उत्तरेला तोंड करून लिहत आहे. मास्तर म्हणटला रोजनिशी लिहायला घे. घेटलेलं आहे. सकाळी अंघोळ करून वगळीतल्या मसोबाचं दर्शन घेतलेलं आहे. मसोबाला पहिल्यांदा मीच गेलेलो आहे नविन वर्षात. गणपतिला, बस्तीत, पीराच्या दर्ग्याला गर्दी असते. मसोबाचं पाप वाटलं मला. कालच संध्याकाळी डेरीतनं म्हशीच दूध आणलं होतं. म्हसोबाला म्हशीचं दूध आवडतंय. म्हसोबाला मनोभावे नमस्कार करतेलं कोण बघिटलं नाही. म्हणून मी केलोय. म्हसोबा व्रत असतं तर ? गूडगं टेकताना दोन बारिक खडक टोचलेत गूडघ्याला. कापूर लावलंय. रोजनिशी रात्री लिहायची असते. रात्र घातकी म्हणून दिवसा सूरवात केलीये. दहा वळी भरल्यात. मला शुद्ध मराठी यायला पायजे. असे मास्तर म्हणटले. आणि नंतर एकदा सुद्दीत र्हात जा म्हणटले. त्यांना शुद्ध देखील शुद्ध बोलता येत नाही. आजचा धडा : मास्तर लोक घातकी असतात.
............................................................
आज अंघोळ केलो नाही. हातपाय नीट धूतले. सर्दी आलीय. सर्दी कोरडी आहे. शनवारी सकाळशाळा असते. थंडी वाजते. डी.एच. पाटीलची गणितं सोडवली नाहीत. मारतंय बेणं. असे वाटले. खरे मारले नाहीत. विज्ञानच्या तासाला झक मारली. कृती ला कुत्री म्हणटलो मास्तरने फोडून काढले. मास्तर टकले आहेत. बायकोला ते आवडत नसतील. म्हणून आम्हाला मारतात. सूरज्या चांगला आहे कधीतर मला भडंग देतो डब्यातलं. शेवटचा तास पर्यावरणाचा होता. मला पर्यावरण म्हणता येत नाही. पर्यायवरण असे म्हणटलो.
आजचा धडा : दिसते तसे नसते.
.................................................
आज रात्री तीनला ऊठलो. हे कालच्यात लिहायचं की आजच्यात ? बारानंतर म्हणजे हे बरं आहे. आमची गई आजारी आहे. घरात गईला गाय म्हणून चालत नाही. गाय हंबरते आहे. गईच्या आयचा घोडा असं वाटत आहे. प्राणिमात्रावर दया करा असं मास्तर म्हणटले. आणि ते पॅस्टीकच्या पिशवीतलं दूध पेतात. गायीचेच दूध चांगले मस काळी असते.
आजचा धडा : ऊस ड्वोंगा परि रस नाही ड्वोंगा !
काय भूललासी वरलिया रंगा ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं