गवारी



गवारी ही भाजी मला अजिबात आवडत नही. पण मापात पैशे करुन देतंय म्हणून दरवर्षी दोन प्लाट गवारी निघतंय. सौद्यात चाळीस रेट निघतो बसून विकलं तर ६०रुपये ते ८० रुपयांपर्यंत विकता येतंय. आणि त्यात मला बाजारात बसायला लै आवडतंय. आवडायच कारण म्हणजे आपण पैशे कमवत असतो हे प्रमुख कारण. बाजारात बसून लोकांचा अंदाज घेणे त्या गिर्हाईकाला त्यामापाने वेळ देणे, गिऱ्हाईक नसतंय त्यावेळी फुकटात निरीक्षण करणे असा उद्योग चालतो आणि त्यात मजा येते. 
मी पाचवीला झाडावरची पेरू विकायला सुरवात केली. मी भावाला घेऊन जायचो, म्हणजे ते बारकं हुतं घरात ताप देतंय म्हणून माझ्याबरोबर असायच. मग लै काय नहीं तर पाचपन्नास रुपये व्हायचं. मग येताना त्याला गोळ्या बिस्किट चाकलेट चिरमूर फुटाणं वगैरे कायतर घ्यायचो म्हणजे त्यो एक आनंद असायचा भावाला कायतर घेऊन देतोय. असं कायबाय वाटायच. मग तिथंन पुढं नगावर म्हणजे उदाहरणार्थ कोथमीरच्या पेंड्या, मेथी,लालफोफळा असं विकण्याची बढती मिळाली. शाळेतले मास्तर म्याडम आलीत कि फुकटात एकदोन पेंड्या देऊन टाकत. त्याचा उपयोग मला झाला. मग परत शाळेत ते कधी तर नाव काढत नरदे तु दिलेली मेथीची भाजी आमच्या सरांना आवडली , असा नुस्ता अभिप्राय आला तरी दुसऱ्या दिवशी परत मी दोन पेंड्या मेथी नेऊन म्याडमांना देत असे.  त्यात एक आनंदच असतोय. 
 पुढं जाऊन गवारी भेंडी मिरची वांगी सकट काटा हाती आला, काटा करण्यात बरीच लोकं गंडवतात. तसं मी पण गंडलो नंतर शिकलो. आमच्या पावण्यात एक म्हातारी लोणी विकून पंधरा एकर रान स्वस्ताईत विकत घेतल्याची कथा होती. पुढं ती म्हातारी काटा मारून असं केल्यानंच पुढच्या पिढ्या भिकेला लागल्या म्हणं हे ऐकून मला मिशाही फुटल्या नहीत अशा वयात मी बायकापोरं पुढची पिढी वगैरे चा विचार करुन चार गवाऱ्या जास्तच टाकत आलोय. त्यामुळं बाजारात माझ्याबदल कुणाला शंका नसते. 
 बाजारात बसल्यावर खरेदीदार लोकांचं निरीक्षण करत बसणं हा छंद मला प्रिय असतो. काही ठिकाणी नवीन जोडपी येतात, काका काकु येतात, सिंगल लोक येतात, म्हातारी आज्जा आज्जी येतात, सर्वधर्माची जातीची लोकं येतात. 
 प्रत्येकाची तऱ्हा निराळी. 
गवारीची भाजी एवढा मर्यादित विषय घेटला तर त्याच्या ग्राहकवर्गाबद्दल मी ऐंशी टक्के एवढा अभ्यास केलाय. म्हणजे मला त्या लोकांच्या क्लासबद्दल सांगता येतंय. गवारी ही भाजी महागडी असते पण ती गरीब मध्यमवर्गीय आणि श्रीमंत ह्या सगळ्या लोकांत खाल्ली जातेच. स्त्री आणि पुरुष अशी वर्गवारी केली तर, ज्या स्त्रिया अन्नपुर्णा असतात त्या स्वताच बाजारात येतात नवऱ्यांना पाठवत नाहीत किंवा नवऱ्यासोबत येतात पण भाजी निवडप्रक्रियेत त्याचा काय रोल नसतो, तो फक्त खिशातून सुट्टं पैशे काढून देतो आणि पिशव्या सांभाळतो. तर स्वतः जी स्त्री येऊन शिर असलेल्या नसलेल्या गवाऱ्या निवडते कवळी निबार (जून) बघून घेते ती अन्नपुर्णाच असते. 
तर जी स्त्री येऊन थेट पैशे काढून पावशेर वजन करा म्हणते ती चवीत बदल म्हणून नेत असते.
 हा प्रकार पुरषांबद्दल जर आला तर त्यात निवडून घेणाऱ्याला बायकोने पाठवलंय म्हणजे हे असं असं पाहिजे असं त्याच मत म्हणजे तिचच असतं. 
आता जो तूरडाळीची उसळ, डाळकांदा, मुग, बटाटा वगैरे खाऊन घरात जो पकलेला पिडीत पुरुष असतो. त्याला चवीत बदल म्हणजेच गवारीच्या भाजीत गवारी मस्त तेलात भाजून त्या भाजीत शेंगदाण्याचा कुट्ट पडुन जरा बदल मिळावा हा हेतू असतो. मुळात त्याला शेंगदाण्याच्या कुटावर जीव असल्याने तो गवारी घेतो, त्याचंही म्हणनं पावशेर वजन कर असंच असतं. 
 मला कधीतर वेळ मिळाला आणि हौस आली घरात कोण नसलं तर उपलब्ध भाजीपाला वापरून भाजी करण्याचा प्रयोग करतो. कधीतर बेष्ट जमतं तर कधी नही.
पण आपला प्रयत्न असतो. त्यात गवारीची भाजी करून बघिटली ती मध्यम करपली तर शेंगदाण्यासह शहाजिरं घातल्यास चव येते हा निष्कर्ष काढलाय. एखादी मोहरी जर दातात आली आणि तुटली तर मला कसतर म्हणजे जेवणावरन मन उठतं म्हणून मोहरी घालूच नये.
 आम्ही बंदरी गवारी म्हणजे हायब्रीड करतो, देशी गवारीला खाज सुटते त्यामुळं तोडायला येणाऱ्या बायकांना त्रास होतो आणि देशी भाजी करताना जर ते कमी शिजवलं किंवा करपवलं तर तोंडात ही खाज सुटते. म्हणून आम्ही समस्त जनतेच कल्याण मनी धरून बंदरीच गवारी लावतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं