मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

Happy new year

मी आणि कैलास दोघपण गरीब हाय, त्यला आणि मला आठ हाजार पगार हाय. एमायडीशीत आमी कामाला जातो. दोघं आमची शेम परिस्तीती हाय. आमी पगार कमी आसल्यानं चैनी करत नही. मी मागल्या वर्षी बिन संकल्प करता सेकंड स्पलेंडर घेटली. आदूगर आमी सायकल नं कामाला जायचं. आता आमी माझ्या गाडीनं जातो. 
  आमी चैनी करत नही, कारण आमी गरीब हाय. आमचं आमाला कसं रहावं त्ये कळतंय. एकदा मालक राउंड मारत मारत आमच्या तिथं आलता. मग त्यानं आपुलकीनं नाव इचारलं. त्यो कैलास म्हणटला मी विलास म्हणटलो. भावाभावा सारख वाटता कि रे  म्हणटला. मग कैलास आणि मी विलास आम्हाला कंपनीत सगळी लोकं भावू म्हणत्यात. आमी कामाला दांडी मारत नही. 
 आमी आयट्याला असताना दारु पेलती, वोल्ड मंक आणि रेड रम. स्वस्त मिळते. आणि डोस्कं बी धरतंय. म्हणून आमी रेडरम पेतो. बारला जात नही. जाताजाता दुकानातंन घेतो आणि अंधार पडायच्या टायमाला तिकडं मैदानावर पिऊन जातो. कैलासकडं पावण्यांनी दिलेल्या२ लिटरच्या बिस्लेरीची बाटली हाय आणि माझ्याकडं १ लिटरच्या थामस्प ची बाटली हाय. वीस रुपयच केळी चिप्स घेतो आणि गडबडीनं दारू पेतो. 
आमी गरीब असल्याचं दारू दुकानदाराला माहीत हाय. त्यामुळं त्यो आम्हाला प्याश्टिकचं ग्लास देतोय. आणि आमी त्यातंनं दारू पेतो. जर काटा हालला कि उरलेली तितचं लपवून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी पेतो. आमचा अड्डा भारी हाय. दारू प्यायला मज्जा येत्या. माझं लगीन झालंय, कैलास अजून लोंबतंच हाय. त्यच्या घरी वास घ्यायला कोण नही. माझी बायकू वास घेत्या , त्यामुळं मी चिंगम बडीशेप, आणि पान पसंत खातो आणि घराकडं जातो. 
परवा मेव्हणा आलता. मंगळवारी. सुट्टी असत्या. सकाळी बायकूनं पुरी बासुंदीचं जेवण केलतं, तेवढं जेवला आणि मेव्हणा टिर्री वर करून झोपला , संध्याकाळच्या टायमाला मला शिस्तात इचारला, काय जिजू मेळ हाय काय ?
एक म्हणजे मला जिजू म्हणून घेणं कसतर वाटतंय. आमी आपलं आयट्या करून एमायडीशीत चिटकलेलं आणि हे बेणं जिजू म्हणतंय. गावातली कडवी ते बी गेल्यावर चार दिवस जि...जू असं कोकळेच्या तालावर बोलवत्यात. तर मग ह्यानं इचारलं, मेळ हाय काय ? 
मला शंका आलतीच तशी. पण हे गाफटं असं इचारल असं वाटलं नव्हतं. मीच फिरवून इचारलं ? कसला मेळ ? तर ते आंगठा वर करून दाखवालं. मी म्हणटलं नवीन बांधलंय पायकान हाय बघ तिकडं रिकामा हून ये. 
तर ते म्हणटलं, आवो जिजू तसं नही घेताय काय ? 
काय घेतो ?
टिमटीम वो..!
टिमटीम म्हजे ?
टमका टाकताय काय ?
हे काय असतंय ?
आवो दारू, दारू पेताय काय ?
आत्तारंतुझ्यायला ... 
पेत असला तर पेतोय म्हणून सांगा नहीतर , माझं मी बसतो..!
थांब बाळ असं एकट्यानं बसू नये. चांगलं दिसत नही.
मग जिजू तुमीबी येणार ?
येतो खरं मी कवा पेलो नही. मी थाम्साप पेतो.
मग असं संध्याकाळ व्हायला घरातंनं निघलो. कैलास ला पण घेटलो. कैलास ला पिन मारलीती मी पेत नही म्हणून. तु पेतोयस असं सांग त्यला आणि दोघं मिळून जबरदस्तीनं पाजायचं नाटक करा मला ..!
ठरल्याप्रमाणं कैलास इश्वासु हाय. कैलास वर माझा भरोसा हाय.मग कैलास बी लै पुड्या सोडलं तुझ्या दाजीला बघ कसलंच व्येसन नही. असं दणकं ठिवून दिलं. 
 मेव्हण्यानं पदरचं पैशे घालून चांगली दारू आणि बिस्लेरीच्या गार बाटल्या आणि थामस्प आणलं. 
कसं लागतंय बघा बघ म्हणून मला जबरदस्तीनं पाजवायचा प्रयत्न मेव्हणा कराय लागला तर कैलास नाटक करु लागला मी उठून चाल्ल्याचं नाटक केलं मग परत जबरदस्तीनं बसवलं. मग मी तीन प्याक पेलो. 
नवीन दारु महागाची हुती पण चांगली हुती. 
मेव्हणा दुसऱ्या दिवशी सकाळी गेला आमी कामावर गेलो. मेव्हण्याला कस फटवलं ह्यावर आमी लै हास्लो. 
आज हाप डे टाकलाय मी आणि कैलासनं. आज ह्यापी नु इअर करायच हाय. त्यामुळं मी आणि कैलास दुपारी च बसणार हाय. 
कैलास आणि मी परवाचं मेव्हण्याचा ब्रँड घ्यायच ठरवलंय. कैलास नं मेव्हण्याकडंनं पावतीवर नाव लिवून घेटलंतं दारुचं. 
तर दोनंच अक्षरं हुती BP .
ते वाचूनच माझा बीपी वाढायला लागलाय. कैलास एकदा घड्याळाकडं बघतोय, मी एकदा बघतोय. आखंड वर्ष गेलं. आणि ही चारपाच तासं जाईनात लवकर.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा