शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

लहान असताना

मी लहान असताना पाटीवर अभ्यासा व्यतिरिक्त काहीच लेखन करत नव्हतो, एकदा तसा प्रयत्न केला. पाटीवर 'व्हयमालीच्या' अशी जोडाक्षरयुक्त शिवी लिहली होती, ती शिवी मी सागर्याच्या पाटीवर लिवून त्याला उरपाट्या साईडने पाटी दिली, त्यानं ज्यावेळी पाटी बघितली, त्यो भडकला, त्यावेळी शांत त्वांड करून थांब तुझ बयीला नाव सांगतो म्हणटला आणि डिंब सागर्याने पाटी घाटगे बयीला दावली, त्यावेळी घाटगे बाई भडकून मला त्याच पाटीची कडं तुटस्तुकर मारलं. मला सागर्याची पाटी फूटली याचा आनंद झाल्ता. माझी पाटी शाबूत होती. त्यादिवसापास्न घरात येवून रात्री अकरापर्यंत अभ्यास करायचो. आज्जास्नी नाव सांगितलं तर माझं आवघड हूतं, म्हणून मी अभ्यास करताना जोरात वाचायचो. अभ्यासाव्यतिरिक्त लेखनावरनं माझं मन उठलं हुतं, तरी मला निबंध लिहायला आवडायचं.
.............................................
लहान असताना रात्री मी अंगणात शेंगा, वल्ली सांडगं, डाळ आणि गुळ खात बसायचो. वरती ढगात बघायचो आणि आपल्या हद्दीत किती चांदण्या हायीत ते बघायचो. पुर्ण तळापास्नं ढगापर्यंत आपलंच सगळ हाय असं समजायचो, आमच्याच हाद्दीतनं हि विमानं जात्यात असं वाटायचं. मला कधीकधी त्यांच्यावर कर लावावा असं वाटायचं. मग मी एकदा आमच्या शहरातल्या पावण्यांच्याकडे गेलतो ते पहिल्या मजल्यावर राहायचे, त्यांच्या घरावर पण घरं होती, ते श्रीमंत असले तरी त्यांनला ढगापर्यंत हद्द नव्हती त्यामुळे मला त्यांचं पाप वाटायचं.
नमीच्या प्रेमात पडल्यावर मी रात्री उठून एकटाच अंगणात बसायचो आणि एकेकदा चांदणी पडली की मी लै खुश व्हायचो पण ते प्रेम एकतर्फीच राहीलं, मी तिला असं काही बोलून तिला दुखवावं असं वाटायचं नाही.
....................................................
मला लहाणपणी सगळे सैनिक म्हणायचे, त्यामुळं मला झंडा दिवसादिवशी भारी वाटायचं. मी दहा रूपयेची सगळ्यात जास्त स्टीकर घ्यायचो. मी एकदा ते स्टीकर छातीवर लावलं होतं.
...........................
लहान असताना देशाचा विचार करायचो त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही कडेला सोयाबीन, शाळू अशी पिकं घेवून ज्यांना खायला नही त्यानला त्याचे पैसे द्यावे असं वाटायचं.
...............................................
लहान असताना बायीनी विचारलं हुतं तुमाला कुठला ऋतु आवडतो त्यावेळी मी पावसोळा आवडतो म्हणून सांगायचो. बायी मला शाबासकी द्यायच्या, आणि सगळ्यांना सांगायच्या श्रेणिक सगळ्यांचा विचार करतो, मग पावसाळ्यावर अर्धा तास बोलायच्या, मला पावसाळ्यात वढा यिवून शाळा चुकवायला मिळायची आणि बंधार्यातली मासं पकडायला आवडायची म्हणून मी असं म्हणटलं होतं बायीनी वेगळा अर्थ काढला.
.............
मी आता हे आठवून हसत असतो smile emoticon

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा