माझं लगीन हून धा वर्षं झाली.

माझं लगीन हून धा वर्षं झाली. धा वर्षाआगूदर मला डोस्क्याला लै टेनशन यायचं. 
माझं शिक्षेण कमी, चवथी. रान बी लै नही आमास्नी. एक एकर हाय. त्यच्यानं मला कोण पोरगी देतील काय असं वाटायचं. मंजे मी एकटाच इचार करत हूतो. संज्या माझा दोस्त. पानपट्टी हाय त्यची. त्यचं लगीन झालं आणि माझ्या डोस्क्यात किडं पडली. त्यला पावण्यातलीच पोरगी केली. संज्या लडतरबाज. काॅलेज शिकला त्यो आणि पानपट्टी काढला. काॅलेजात पोरीस्नी चुन्ना लावत हूता आता पानपट्टीत पानाला चुन्ना लावतोय. त्यची बायकू बघून मला भ्या वाटलं. तिची नही. मला माझं कसं व्हायचं ? मलापण असली गोरट्याली पोरगी बायकू म्हणून पायजेल. संज्या खूष हूता. मी सकाळी एकदा तेवढं त्यला गाठ पडत हूतो. ते बी तंबाखचुन्ना घ्यायला. लगीन झाल्यावर त्यला भारी वाटत असणारंच. त्यला बघिटलं की मला टेंशनच यायच. लग्नाला त्यची मेव्हणी बी आलती. ती हिच्यापरास दोन वर्षानं बारकी हूती. माझं माप बसत हूतं. खरं ती शिकलेली, मला करून घील काय ? 
आसं सगळं डोशक्यात यायचं. दिवसभर तेच. म्हणून मी तंबाखचुना दूसर्या पानपट्टीतंन आणलो. लोकास्नी वाटलं माझं आणि संज्याचं वांदं झालंय. कायतर लोकास्नी वाटतंयच. म्हणून मी परत संज्याच्याच पानपट्टीत गेलो. संज्याला बी सौंशय यायचा. त्यला वाटलं अशील की ह्ये माझ्या सौंसारावर जळतंय. पण संज्या चांगला कवा काय इचारला नही मला. संज्याची बायकूबी चांगली. आईनं मला बिनसांगता संज्याला केळवानला सांगिटली. नवरा बायकू यिवून जिवून गेली. आमच्या आईला संज्याची बायकू म्हणटली भाऊजींच लगीन कवा ? 
आई म्हणटली एवढं तुळशीचं लगीन झालं की करायचं. मी बहीर बसलोतो. मला हे आयकायला आलं. मनातंन बरं वाटलं. आमची आई चांगली हाय. गावातली निम्मी लग्नं आईनं लावली. बाबा काय करत नही. माझ्या दोन भनीची लग्नं झाल्यात. राजी मोठ्ठी गावातंच दिल्यात तिला. लगीन झाल्यावर कळंल आगूदरचं ह्यंच लडतर हूतं म्हणून. काशिनाथ तिच्या नवर्याचं नाव. मी भवूजी ते म्हणत नही, काश्या म्हणतो. म्हणजे माझं बोलनंच नही. मला राग हाय. खरं न्हानगं असताना काय कळतंय ? आमची राजीचं त्यंच्या हिरीवर धुणं धूयाला जायाची. कवा पत्या नही ते काश्यानं तिला कटवलं कुणास ठावक. ? मला दोन वर्षानं कळलं लगीन झाल्यावर तिचं. म्हणून मी बोलत नही. तिची पोरगी दांडगी झाली नव्वीला हाय. मी चवथीत शाळा सोडलोतो त्यायेळंला दूसरं पोरगं बी झालं. सोनाली पुरगीचं नाव. पोराचं नाव स्वप्नील. दोघांची जावळं मीच काढलो. तवा काय समजत नव्हतं. 
आत्ता समजतंय. मी गावातल्या पोरींच्याकडं बघत नही, माझं सभाव येगळं हाय. आईनं म्हणटल्या म्हणजे करील की माझं लगीन. 
टेंशन कमी झालं. आता काय वाटत नही. पावसोळ्यात वाटायच लगीन झालं आसतं तर बरं झालं असतं. 
दसरा, दिप्वाळी झालं. तुळशीचं लगीन झालं. 
आईनं मला एकदिवस बोलवून सांगिटलं. तुझं लगीन सोनीबरोबर करूया. मी राजीला बोल्लोय. काशिनाथ तयार झाला की झालं. मला काय बोलायचं कळना. गप बसलो. नव्वीतल्या पोरगीबरोबर कसं लगीन करायचं ? 
इचार जास्त कमी व्हायला लागलं. तरीबी एक मनाला वाटलं, आपनाला कोण पोरगी दिलं, नव्वी ला असली म्हणून काय झालं, दिसायला गोरी हाय. संज्याच्या बायकूकिंदा काकण चढ. आज नही उद्या मोटी हूईलच की. मी आईला सांगिटलो, मला चालत्या म्हणून.
तिकडं काश्या तयार झाला. आई आमची बोलाली की म्होरच्याला रडवत्याचं. 
नवेंबर महिन्यात एका पावण्याच्या पोराचं लगीन यादीवर शादी हूतं. म्हणजे एकादिवसात हूणार हूतं. मी बी लग्नाला गेलो. तिथं लोकं त्या नवर्या पोराला म्हणालती. यादीवर शादी आणि झटाकन गादी !!. 
मला सोन्नी आठवली. आमचं लगीन झालं तरीबी झटाकन गादी ते काय नही...
पावण्याकडं पोराला पसंत केलं. मग त्या दिवशी पंचक लागणार हूतं. झालं लागलंच पंचक. मग लगीन पेंडीग पडलं पाच दिवस. त्या पोरगीची ध्धावी झालती. पाचदिवसानं मी आई बाबा सगळी लग्नाला गेलो. आई सकाळपारी राजीकडं गेलती. सांच्याला म्होतूर हूता. लगीन लागायच्या आगूदर आईनं मला बोलावली, म्हणटली, ह्याच मांडवात तूझंबी आज करायचं. मला करंटच लागलं. पावण्याकडची लोकंबी गडबड केली, आणि माझंबी लगीन गुमानधमकीत झालं. हाय त्या कापडावरंच. बाबानं ऊचलून ध्धा हाजार पावण्यास्नी दिलं. सोन्नी कसं तयार झाली कुणास ठाव ? काश्याबी ?
आसं माझं लगीन झालं आणि सोन्नीचा बालविवाह. ध्धावी झालं की ती नांदायला येणार असं ठरलं. कुणाला काय बोलायच नही. 
गावात आलो. लगीन झाल्यागत वाटलं नही. असंच दिवसं गेली. गाव आमच किरगाल, कुणाला तर कळलं आणि गावभर झालं. लोकं ईचारारला लागली मला. माझं मलाच लाज वाटलं. मग आता कळालं तर कळू दे. सोन्नी आली नांदायला. गावात लोकं म्हणटली हातावर पाणी तर घालायचं की सुन्या. माझं नाव सुनिल. बायकूचं सोनाली. S s . एक बारकं एक मोठं. मला तेवढं ईंग्लीश येतंय. नांदायला आली खरं मी आजून नांदत नव्हतो. रान आणि घर. एवढंच. 
बाबाला बीपीच्या गोळ्या चालू हूत्या. एकदिवस चक्कार आलं आणि बाबा गावात पडला श्ट्यांडवर. गावातल्या लोकानी आडमीट केलं. हार्ट आटक चं संभव हाय असं डाकटर सांगिटला. पाच दिवसानं डीचार्च मिळालं. आई म्हणटली बाबाला नातवं बगायची हायीत. मग मी आणि सोन्नी देवाला जावून आलो. येमेटीनं. ती मी गारेगार खाल्लो. देवळात संसार रचलो. घट्ट बसली दगडं. मी तिला बोल्लो. लाजली. मग वर्षानं आमाला एक पोरगी झाली. 
देखणी हाय. अंकिता नाव ठेवलं. पोरगं असतं तर ? 
पोरगं पायजेच. मग आणि परत आमी देवाला गेलो. पोरगं मागिटलो. सोन्नी मला आवो किती गडबड म्हणटली. मला आवो जावो करत्या. कधीकधी अरेतुरे. तेचं बरं वाटतंय. खरं एकटं असताना. 
आम्हाला पोरगं झालं. वीर नाव ठेवलं. 
आता लग्नाला लै दिवसं झाली. पोरं मोठ्ठी झाली. पोरगी तिसरीत ईंग्लीस मेडमला. पोरगं केजीला. दोघ अभ्यास करत्यात. सोन्नी आभ्यास घेत्या. मी राबतो. संज्याची पोरं पण खेळायला येत्यात. हिनं घरातंच कापडाचं दूकान काढलंय. तेवढंच पैशे मिळत्यात. रानातलं बँकेत पडतंय. घर खर्चा ती चालवत्या. माझ्याकिंदा जास्त मिळवत्या. आमी पयला पिच्चर चिमणी पाखरू बघिटल. तिथंन लै पिच्चर बघिटली. संज्या मी जोडीनं जातो. डिसकवर गाडी हाय आवरेज चांगलं देतंय. 
ती आभ्यास घ्यायलती एकदा पोरगीचं आणि म्हणटली तुझ्या पप्पा बरोबर लग्न करून झक मारली नहीतर मी आधिकारी झाली असतो. पोरांच जीव आईवर. पोरं पण हासत्यात. मला जीवाला लागतंय...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं