कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

गेला महिनाभर कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गाजत होती.

 आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या, दंड बडवून,शड्डू ठोकून एकमेकाला आव्हान-प्रतिआव्हान दिलं जात होतं. 

 या निवडणुकीत स्वतः बंटी पाटील उतरल्यामुळे हि निवडणूक चर्चेची ठरली होती. ती मग जिल्हा पातळीवर न राहता राज्यपातळीवर चर्चेला आली होती. 



काल दुपारी अखेरीस चित्र स्पष्ट झालं आणि एकदाचा सोक्षमोक्ष लागून निवडणूकीचा कंडका पडला. या निवडणुकीत अप्पा महाडिक आणि त्यांच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळवत आपलं वर्चस्व कायम राखलं. 

उत्पादक गटातील महाडिकांचे उमेदवार हे १०००-१२०० अशा फरकाने निवडून आले आहेत. 

कोल्हापूर म्हणजे जल्लोष आणि तसा जल्लोष पार पडला. यशाचे अनेक भागीदार असतात, महाडिकांनी आवाडे दादा, कोरे आणि धैर्यशील माने यांच्या सहभागाबद्दल आभारही मानले. 

या निवडणुकीचा निकाल आला आणि दूसऱ्या बाजूला सोशल मिडियावर मात्र बंटी पाटील यांच्यावर काही लोक टीका करू लागले, तर त्यांना पाटील समर्थकांनी उत्तरंही दिली. अशा या चर्चा असतात. 

दहावी बारावीचा निकाल आला आणि आपण पास झालो तर कुणी विचारत नाही. मात्र नापास झालो तर दारावर येऊन डिवचून विचारलं जातं.

तोच प्रकार बंटी पाटलांबद्दल सोशल मिडियाच्या चावडी कट्ट्यावर सुरू आहे. 

काही लोकांचं म्हणनं आहे कि बंटी पाटलांचाच कंडका पडलाय!

खरंच बंटी पाटलांचा कंडका पडलाय का? 

सार्वत्रिक निवडणुका लोकसभा असो, कि विधानसभा या निवडणुकीचा माहोल वेगळा आणि सहकारी संस्थांचा माहोल वेगळा. 

एकतर हा कारखाना गेली २८ वर्षे महाडिकांच्या ताब्यात होता. सहकारी संस्थांच्या निवडणुका लागल्या कि एक वाक्य हमखास ऐकायला मिळते ते म्हणजे 'सत्ताधारी ऐकत नाहीत कधीपण!' 

हे वाक्य असंच बोललं जात नाही तर त्यामागे अनेक कारणं आहेत. सहकारी संस्थेत फक्त सभासदांना मताचा अधिकार असतो. त्यामुळे बहुतांश वेळा सत्ताधारी आपल्या मर्जीतील लोकांना शेअर्स वाटप करून आपली मतं वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. 

महाडिकांना हा कारखाना प्रदीर्घ कालावधीसाठी मिळाला होता आणि त्यांनी सहकार जवळून पाहिला असल्याने साहजिकच त्यांच्या मर्जीतले सभासद जास्त होते. 

 सहकारी संस्थांच्या निवडणुकीत राज्यात कुणाचं सरकार आहे याचाही फार मोठा रोल असतो. ते वजन महाडिकांच्या पारड्यात पडलं.

  बंटी पाटील यांनी ज्यांना सुरवातीला उमेदवारी दिली होती ते अपात्र झाले. ते उमेदवार प्रभावशाली होते त्यांच्या अपात्रतेचा फटका बंटी पाटील यांना बसला. तिथेच बंटी पाटलांच्या कोयत्याची धार बोथट झाली.

संस्थात्मक असोत कि प्रशासकीय दोन्ही बाजू महाडिकांच्या मजबूत होत्या. 

गोकुळ सारखी बलाढ्य संस्थाही महाडिकांच्या ताब्यात प्रदीर्घ कालावधीसाठी होती, तिथेही दोन तीन वेळेस धडका देऊन महाडिकांचं वर्चस्व बंटी पाटलांनी संपुष्टात आणलं‌. त्यावेळी राज्यात मविआ सरकार होतं, हेही लक्षात घ्यायला हवं. 

लोकसभा विधानसभा निवडणुकीत लाटेवर भावनेवर माणूस निवडून येऊ शकतो पण सहकारी संस्थांच्या निवडणुका या पुर्णपणे वेगळ्या असतात. इथे भल्याभल्यांचा कस लागतो.

सभासद सांभाळावा लागतो, तसेच संस्था गट असतो तिथे गावातील संस्थेच्या निवडणुकीत तिथल्या कार्यकर्त्याला मदत करून त्याला निवडून आणावं लागतं, तो निवडून आला तरच त्याच्या गटाचा ठराव मिळतो आणि मग तुम्हाला मतदान होऊ शकतं. 

वरवर ट्विटरवर,. फेसबुकवर आणि इतर सोशल मिडियावर राजकीय विश्लेषक बनलेल्या बहुसंख्य लोकांना अशा कसरतींची माहितीही नसते. त्यांच्या लेखी जय पराजय या दोनच गोष्टींवर एखाद्या नेत्याचे मुल्यमापन केले जाते. 

बंटी पाटील यांचा इतिहास पाहिल्यास त्यांच्या लढाईत जिंकणे हेच होतं, मात्र जिंकण्यापूर्वी गोकुळात त्यांनी पराभव पचवला होता, मात्र त्या पराभवाने खचून न जाता त्याचा अभ्यास करून त्यांनी गोकुळ सारखी बलाढ्य संस्था ताब्यात घेतली. 

विधानसभेत झालेल्या पराभवाचा वचपा विधानपरिषदेवर काढला होता. ज्या विधानसभेत ते पराभूत झाले तिथेच मोठ्या मताधिक्याने पुतण्याला विजयी केलं. कोल्हापूर उत्तर जागेवरच्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत श्रीमती जाधव यांना विजयी केलं आणि या सर्व कसोटीतली त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून काँग्रेस पक्षाने गटनेते पदी निवड केली. असा त्यांचा प्रवास गुलालांनी न्हाऊन निघाला होता. 

मात्र राजाराम निवडणूकीत त्यांना एक अपयश आलं. जे तांत्रिकदृष्ट्या अपयश नाहीच हे कुणीही संस्थात्मक टेक्निकल गोष्टी जाणणारा माणूस सांगेल. तरीही त्या पराभवाची 'कंडका पडला' अशी चर्चा मोठ्याने होत आहे. 

ज्या ज्यावेळी बंटी पाटलांचा पराभव झाला तेव्हा त्यांनी फार वेळ वाट न पाहता लगेचच पुढच्या निवडणुकीत दुप्पट ताकदीने लढून यश खेचून आणले आहे. या निवडणुकीत काहीच आपल्या बाजूला नाही हे बंटी पाटील यांच्यासारख्या नेत्याला माहित नाही असे होणार नाही. ज्या अर्थी त्यांनी धडका दिला त्या अर्थी त्यांनी तिथून बरंच काही कमवलं असेलही.

या पराभवात आणखी एक गोष्ट दिसते, ती म्हणजे या कारखान्याच्या मतदारांचे सरासरी वय हे थोडे वयस्कर असावे, त्यामुळे बंटी पाटील यांचे सोशल मिडिया कँम्पेन त्यांना टार्गेट करू शकले नाहीत. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सोशल मिडिया कँम्पेन चा फारसा उपयोग होत नाही. त्याने सभासद प्रभावी होत नाहीत हेही सिद्ध झाले म्हणायला हरकत नसावी‌. 

या पराभवाने बंटी पाटीलच नाही तर जिल्ह्यातील अनेक नेते सतर्क होऊन आपापल्या सहकारी संस्था टिकवण्यासाठी त्यावरची पकड घट्ट करण्यासाठी, 'संस्थात्मक करेक्शन' करून आपली पकड घट्ट करणार. 

या निवडणुकीत महाडिकांचा कंडका पडला नाहीच, पण बंटी पाटील यांचाही कंडका पडला नाही. कंडका पडणार काय फाकळी पडणार हे ठरवायला अजून एक वर्ष वाट बघावी लागणार तोवर दोन्ही टोळ्यांनी कोयत्याची धार काढायला घ्यावी!

कारण कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं