कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!

कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगाव इथल्या ४० आणि ४२ वर्षीय दोन मित्रांनी एकाच दोरीला गळफास लावून आत्महत्या केली. 

या दोन्ही मित्रांचे व्यवसाय होते एकाचा ट्रक तर दूसऱ्याचा जनावरांचा गोठा. दोघांनाही कर्ज होतं आणि त्यातून आलेल्या नैराश्यापोटी दोनही मित्रांनी जीवनयात्रा संपवली.




त्यातील एकाला फक्त १० दिवसांपुर्वी मुलगी झाली होती. हृदय पिळवटून टाकणारी हि घटना घडली. त्यांनी ज्या झाडाला गळफास लावला ते झाड आत्महत्या करणेसाठी कुप्रसिद्ध झाले आहे. 

सहज हि बातमी वाचनात आली. वाईट वाटलं. मात्र ह्या वाईट वाटण्याचे हि अलिकडे काही कौतुक राहिले नाही. एवढी माणसे किड्यामुंग्यासारखी मरत आहेत. 

हि मरणारी माणसं कोण आहेत? शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक हे भारतातील सामान्य लोक. 

आणि याच इंडियातील निरव मोदी, मेहूल चौकसी, विजय माल्या, ललित मोदी आणि असेच डझनभर लोक भारतात कर्जं करून परदेशात ऐशोआरामात जगत आहेत. 

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणीचे कर्ज असेच माफ होत आहे. अंबानी, अदाणी आणि त्यासारख्या शेकडो उद्योजकांचे कर्ज असेच सरकार माफ करते आणि त्याच भारताचा नागरिक असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी काही लाखांचं कर्ज झालं म्हणून गळफास घेऊन जीवनयात्रा संपवतो हे किती दुर्दैवी आहे. याला जसं सरकार कारणीभूत आहे. तसंच काही प्रमाणात समाजही कारणीभूत आहे.

वाढलेली महागाई, दिवसागणिक घटत जाणारं उत्पन्न त्यात त्याचा मेळ बसत नाही. त्यामुळे तो बँकांची कर्जं उपसतो आणि परतफेड होत नाही. तेव्हा गावागावात तथाकथित सोज्वळ असणारे लोकंच त्याची चर्चा चव घेऊन करत राहतात. पै पाहुणे लोकही किमंत कमी करतात आणि एकप्रकारे समाजातून बहिष्कृत करण्याचे कामंच केले जाते. यातून पदरी येणारे नैराश्य त्याला जगू देत नाही. 

सहज कल्पना केली तर लक्षात येईल उद्योगपती लोकांना एवढी कर्जं असतात पण ते कधीच आत्महत्या करत नाहीत कि समाज त्यांना नावे ठेवत नाही. मात्र शेतकरी, कामगार आणि नोकरदार लोकांची आब्रू वेशीवर रोज टांगून त्याला गावकरी, नातेवाईक जगण्यास नालायक करतात आणि या साऱ्या गोष्टी त्याच्या आत्महत्येला जबाबदार ठरतात. 

आजरोजी कर्जदार नाही असा माणूस नाही. मात्र देश लुटणारे मजा मारत आहेत आणि प्रामाणिकपणे राबणारे लोक गळ्यात फास लावून मरत आहेत. हि दुही डोळ्याला दिसत असूनही आपण गप्प आहोत.

आता वेळ आली आहे, सरकार ला दुटप्पी वागण्याबद्दल जाब विचारायची.  प्रसंगी माणसाने निर्लज्ज होऊन जगावं. ज्या समाजामूळे माणूस लाज बाळगतो तो समाज या दोन मित्रांच्या हालाखीच्या परिस्थितीत आधार द्यायला आला असता तर हे दोघे मित्र आज मेले नसते. ज्यांचा काही उपयोगच नाही तर त्यांची पर्वा तर का करावी? आणि लाज तरी का बाळगावी? निर्लज्ज होऊन निर्ढावलेपणा अदाणी अंबानी सारखा कमावला असता तर आज फक्त १०दिवस ज्या चिमूरडीचं वय आहे तिला आपला बाप गमवावा लागला नसता. 

तथाकथित शेतकरी नेते, निवडणूकीवेळी सर्वसामान्यांचा कळवळा येणारे लोकप्रतिनिधी यांनी अधेमध्ये ही या मरणाऱ्या जनतेकडे बघावे.

या आत्महत्या समाजाने बहिष्कृत केले नसते आणि सरकारचे जसे मोठाल्या उद्योगपती लोकांना अभय असते तसा या दोघांनाही असता तर या आत्महत्या झाल्याच नसत्या.
सरकार आणि समाजाने केलेल्या या हत्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं