हिलीक्यापटरच बरं. 😊

माझ्याकडं एक हिलीक्यापटर हाय. घिवून तीन वर्षं झाली, सुरवातीला डायवर ठेवलोतो. सहा महिन्यामागं काढून टाकलं. बायकू म्हणटली, विमान घ्या. आत्ता इमान कुठंन घिवु ? 
मी म्हणटलं लै बोलू नकोस कशाला झक मारायला इमान पायजे ? 
ती म्हणटली आपल्या घरातली तेवढंच मावत्यात चॉपरमधी. माझी आई बाबा मावत नहीत, तुमी एकदाच त्यासनी जोतिबाला निवून आणला. परत कधी माह्यारला गेलं तरीबी बसता काय मामा आणतो फिरवून असं एकदा तर म्हणटला काय ?
असं म्हणून बायकू मला कायम ईमोशनल करत असते. 
डायवर सॉरी पायलट हुता ते बरं हुतं. आता मलाच हाणावं लागतंय. 
डायवर जरा कडूच हुता. जरा कुठं प्याड दिसलं कि उतरवायचा आणि तंबाखू मळ. कुठं शिग्रेट वड असं करायचा. आता मला सांगा सारखं उतरवायचं परत उडवायचं ह्यामुळं आवरेज कमी हुणार कि. आनेक पायलटची घाण सवय म्हणजे त्याच्या बा चं हिलीक्याप्टर असल्यागत एकटाच हेडफोन घालायचं आणि गाणं ऐकायचं. मला हाळूहाळू त्यचा कारभारच पसंत यिना. मग गोड बोलायला चालु केलो, हाळुहाळू कुठलं बटान कशाचं, गेर कसं टाकायच उतरवायच कसं ते शिकलो. खरं त्यला सांगिटलो नही. नहीतर उगच म्हणायचा पोटावर पाय आणला म्हणून. 
एकदिवस दुपारला मी आणि त्यो दोस्त दोघं मिळून हिलीक्याप्टर बहीर काढलं. मला येतंय का बघू म्हणून दार उघडून बसलं. कडंला एक वायर असत्या ते वढलं कि चालु हुतंय, चालु केलो. मग उडायचं बटान दाबलो. हिलीक्यापटर उडाय लागलं. म्हणून घुमवालो. टर्न माराय यिना. वरतीकडं कोकणात गेलो. मग कणकौलीत एक प्याड दिसलं तिथं उतरवलो. मग ध्यानात आलं त्याल सपलय. आता काय करायच ?
दोस्ताचा कॉनट्याक्ट दांडगा. कुठनतर दोन क्यान तेल आणलं. आंधार पडलाता. म्हणून तिथंच दोघं हिलीक्यापटरात शीट वाकडं करुन झोपलं.
सकाळी उठून बसलो, उडवलो गावाकडं आलो वरच्या पट्टीला थांबवलो. घरात जनावरास्नी वैरण नसणारच म्हणून वैरण दोन बिंडा काढलं. घराकडं आलो तर बायकु म्हणटली कुठं उलतलाता ? आणि रडायला लागली. 
का गं का रडाल्यास ? म्हणटलो.
तर ती म्हणटली, लोकं चांगली नहीत आपहरण करत्यात कीडण्या काढून घेत्यात.
मग मला बी रडू आलं. 
तर ती म्हणटली तुमाला कोण फुकटात बी विचारत नही. मग मला राग आला आणि तिच्यावर जरा प्रेम केलो. 
तर मी शिकलो उडवायला. नंतरनं लै काम लागली. आता मागल्या उन्हाळ्यात दुष्काळ पडला. बायकुची भन म्हणजे माझी मेव्हणी एकटी मराठवाडय़ात आणि एकटी विदर्भात. त्यंच्या जनावरास्नी घालायला वैरण नव्हतं. मग रोज यरवाळी ऊठून चार बिंडं वैरण काढायचं आणि घिवून जायचं. महीना दोनमहिना डेली विदर्भ मराठवाडा. लै तेल जळलं. खरं पावणं खुश झाली. 
आमोशा आली की आई म्हणायची हिलीक्यापटर धु. मला लै कटाळा येतो. मग बायकू म्हणटली मीच धुतो. बारडी आणि टमरेल घीवून धुवाय लागली. धुतली. आणि नंतरनं शिडी लावून टपावर चढली. तिला वाटलं वरचं पंखा पितळंच हाय म्हणून पितांबरी लावून घासालती. भांडी धुतल्यागत धुवाय गेली आणि पंखा वाकवून ठेवली. 
दुसर्या दिवशी उडवताना उडनाच झालं म्हणून बघिटलो. तर पंखा बारीक वाकलाता. हिला ईचारल्यावर सांगिटली. मग मंबैच्या मिस्त्रीला फोन केलो तर त्यो इथच हुता. आला म्हणटला फ्यानला आऊट आलय. लाख रूपयं खर्चा येणार. आणि धा दिवस वेटींग करायला लागल.
मी म्हणटलो, आत्ता जावा. उद्या काय करायच ते फोन करून कळवतो. 
लाख रुपंयं म्हणून मला टेंसन आलं. दोस्ताला बोलवलो. त्यो म्हणटला गावातल्या सुतारालाच बोलवुया. मग लक्षुमन सुतार ला बोलवलं. त्यला आऊट काढं म्हणटलं. मग म्हणटला थांबा सप्पय करतो. आणि हातूडीनं दोन ठोकं हाणलं. मग ट्रायल घेटलो तर उडालं. उतरवलो सुतारला बसवलो हिलीक्यापटरात. त्यो म्हणटला कुठं जायाचं ? 
मी म्हणटलो जोतिबाला. मग त्यो म्हणटला थांबा जरा झंडुची फुलं घिवून येतो. मग मेणकागद भरुन झंडुची फुलं आणला. हिलीक्यापटरातनच नदीत सांगोड्याच्या नरसोबावर फुलं टाकला. मलाबी बरं वाटलं. लाख रुपयं वाचलंत. मंबईची लोकं भामटी. 
आत्ता विमान घेटलो तर त्यचा पायलट डायवरशीटजवळं बसवून घेणार नही. 
विमान थेट उडवायला येत नही. 
धा एकर जागा लागायची वरनं पार्किंग कुठं करायचं ? 
विमान आणलं कि बायकु म्हणायची विमानात टाईलच्या फरच्या बसवून घ्या. 
पोरगीला माझ्या चित्रकला लै भारी येत्या ती विमानात चित्रं काढायची. पोरगं म्हणायचं गणपती विमानात बसवुुया. 
अशे अनेक प्रश्न पडत हायीत.२०१९ ला लोकसबा इलैक्क्षनला मोदीचं भाडं मिळल का ह्यासाठी ट्राय करालोय. 
तुरतास हिलीक्यापटरच बरं. 😊

टिप्पण्या

Kaustubh म्हणाले…
हिलीक्यापटरच बरं...हाहाहा...लै भारी रे...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं