दादा हिच ती वेळ!


आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले. येऊन काय केलं? तर पवारसाहेबांवर टीका केली. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी 'भटकती आत्मा ' असा उल्लेख केला होता. त्याही आधी 'पवार शरद यांचा पराभव ' मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना करायचा आहे. असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. लोकसभेत काय झाला परिणाम? तर भाजपचा कार्यक्रम झाला. पवारसाहेबांवर बोललेलं खुद्द अजितदादांनाही आवडलं नव्हतं. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं आहे.

मूळात दादा-भाजप हि युतीच विळ्याभोपळ्याची असल्याचे खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही म्हणने आहे. दादांना त्यावेळी वाटलं होतं. पवारसाहेबांवर बोलल्याने जर नुकसान झालं होतं. तर आजही अमित शहा पवारसाहेबांवर बोलले आहेत. जिथे अनेक आमदार दादांचे आहेत. याचा फटका विधानसभेत बसणार नाही का? 



अजितदादांकडे पॉवर आहे. त्यांनी भाजपचा नाद सोडावा आणि महाविकास आघाडीचाही नाद करू नये. काय होईल ते होईल म्हणून सेप्रेट लढणं योग्य होईल. 

दादा जर सेप्रेट लढले तर दादांच्या संख्याबळाशिवाय महाराष्ट्रात कोणतेही सरकार येणार नाही. दादांकडे अनेक चेहरे असे आहेत ज्यांना इच्छा असूनही तिकीट देता येत नाही. मग नंतरून दादांना शब्द पाळावे लागतात. 

दादा काही दुपारी उठणारे नेते नाहीत. सकाळपासून कामाला लागणारे नेते आहेत. दादांबद्दल लोकांना काय आवडले नाही तर ते फक्त आणि फक्त भाजप सोबत जाणे आवडलं नाही. भाजपचा नाद जर दादांनी सोडला तर दादांकडे अनेक लोक येतील. त्यासाठी आज पुण्यात येऊन अमित शहांनी योग्य संदेश दिला आहे. त्याचा फायदा उठवावा. हिच ती वेळ आहे! 

परवाचा अर्थसंकल्प अजितदादांनी मांडला. त्यांनी यापूर्वी अनेक अर्थसंकल्प मांडलेत. मात्र असा अर्थसंकल्प त्यांनी कधी मांडला नाही. असा म्हणजे कसा? तर घोषणांचा पाऊस असलेला अर्थसंकल्प! 




फडणवीस, मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडायचे तेव्हा वाटायचं की, दादाच्या घरचा पैसा हाय काय एवढं जपून अर्थसंकल्प मांडतो दादा? 

पण दादांनी याआधीच्या कोणत्याही अर्थसंकल्पात असा योजनांचा पाऊस पाडला नव्हता. मोजून मापून घरचं असल्यासारखं काळजीपूर्वक मांडत होते. 

तर या अर्थसंकल्पात घोषणा बक्कळ झाल्या. खरंतर अविश्वसनीय वाटावं असंच आहे हे. पण ह्या अर्थसंकल्पाने काही लोकांना दिलासा मिळाला. 

७ एचपी पर्यंत च्या कृषी पंपाची बीलं माफ झाली. ह्या ७ एचपी मध्ये एकर -दोन एकर शेती असणारा अल्पभूधारक शेतकरी येतो. त्याच्याकडे कूपनलिका किंवा विहीर असते‌. त्याची परिस्थिती तशी योग्य नाही. त्याचे मोटारीचे बील लाखभर रुपयांपर्यंत थकीत होते. त्याला हा नक्कीच दिलासा आहे. 

यापूर्वीही अजितदादा ऊर्जामंत्री होते तेव्हा एकदा बील माफ झाली होती. प्रामाणिकपणाने भरलेल्यांची बील मायनसही केली होती. 

खरंतर याची स्पष्टता नव्हती. पण लोकं म्हणायची, अजित पवारानं घोषणा केल्या म्हणजे ते माफ झालंय. 

याच जागी जर फडणवीस, शिंदे, चंद्रकांत पाटील असते तर अंशतः, तत्वतः वगैरे भानगडी असत्या. पण अजितदादांनी घोषणा केल्याने लोकांचा त्यावर विश्वास बसला.

लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सगळीकडे महिलांची लगबग चालू आहे. फॉर्म भरणे ऑनलाईन ऑफलाईन हमीपत्र अशी गर्दी सगळीकडे दिसत आहे. 

लोकसभेच्या प्रचारादरम्यान एका लोकल न्यूज चॅनलवर, अजितदादा गया राखत होतं, कडबा गोळा करायला यायचं असं एकांनी सांगितलं होतं. आणि ते खरंही आहे. त्यांना शेतीचा दुग्धव्यवसायाचा अनुभव आहे.‌ गावातील अडचणी माहीत आहेत. 

त्यांच्या राजकारणाची सुरुवात डी.सी.सी बँकेपासून झालीय. या बँकेतील संचालक लोकांना सर्वाधिक शेतकऱ्याच्या अर्थकारणाविषयी माहिती असते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक अर्थसंकल्पात याआधी उमटलेले आहे. कालची वीजबिल माफी सुद्धा याचंच फलित आहे.

दादांनी अनेकदा उपमुख्यमंत्री पद भूषविले आहे. भूषणांपेक्षा दुषणं अधिक झेलावी लागली. 



दहापंधरा वर्षांपूर्वी ज्यांनी सिंचन घोटाळ्याचे प्रकरण तापवले, बैलगाडी भरून पुरावे आणले, दादाची यथेच्छ बदनामी केली. त्यांच्या सरकारात महत्वाची खाती घेऊन दादा सहभागी झालेत‌. 

दादा उजवेडावे, पुरोगामी प्रतिगामी, मनुवादी अशा भानगडीवर जादा वेळ न घालवता. कामं झटपट करण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या जनता दरबाराला भल्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली सगळेजण बघतात. कामाचा माणूस असला तरच माणसं कामं घेऊन जातात. 

आणि अशी कामं केल्यानं ते शड्डू ठोकून सांगायचे, मी मतदारसंघात न जाताही लाखाच्या पुढनं निवडून येतो आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. सगळ्या प्रतिस्पर्ध्यांची डिपॉझिट जप्त. हा कारनामा कामाच्या जीवावर! 

दादांनी साहेबांना सोडून निराळी भूमिका घेतली. टोपी,धोतर,विजार, चप्पल घालणारे लोक दादांकडून बाजूला गेले. आणि नको ते लोक उरले, झगमगाट, चमचमाट दिसला. सामान्य माणूस दूरावला आणि लोकसभेत तटकरे वगळता चारही जागेवर अपयश आलं. याला लाख कारणं आहेत. 

शिंदे, फडणवीस यांच्या तुलनेत अजित दादा सर्वच बाजूनं चांगले असूनही त्या खुर्चीवर बसायचा योग काही दादांना आला नाही. महाविकास आघाडी तर टीका करतेच, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अजितदादांवर टीका करताना दमत नाही. तसा त्यांचा राग जुना आहे. दादांनाही याची कल्पना असावी, दादांनी कोण काय म्हणेल याची पर्वा न करता विशाळगड परिसरात जाऊन अन्यायग्रस्त लोकांना भेटले. 

दादा मूळचे दादा आहेत. ते आज ना उद्या कधीतरी दिसेलच. दादांनी यावेळी उप नको मुख्य व्हावेत. यावेळी तसा स्पेस आहे. कुणाचा दबाव नाही, दडपण नाही. त्यामुळे होऊन जाऊदे! 

 रूबाबदार, महाराष्ट्राला शोभेल असा मुख्यमंत्री मिळो!

दादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?

विखे -लंके आणि राहूल गांधी