ट्रकडायवर

सगळं सोडून एक लेल्यांड ट्रक घिवून लांबचं भाडं करत हिंडावं असं वाटतंय.





ट्रकडायवर रात्री जेवून भाडं घिवून जात असतोय. कोणतर आडवं हात करून रस्त्याला थांबलेलं असतंय. जसजसं ट्रक पुढं यील तसं ते ट्रकच्या आडवंच येतय. ट्रकडायवर काच्चदिशीनं ब्रेक मारतोय. मग ते आडवं आलेलं माणूस दाराजवळ येतंय. थडपडत ट्रकंत चढतंय. ते लै पेलेलं असतंय ते डायवरला वळकतंय. पहिली पाचदहा मिनटं त्यो गडी गप्पगार बसतोय. नंतर दारू का पेलो ? ते सलग सांगत सूटतोय. ट्रकडायवरला दोन कानाखाली त्यच्या वढावं वाटतंय, खरं गप्प बसतोय. 
नंतर एकादं गाव आलं की ते माणूस उतरतंय. खाली उतरल्यावर परत बोंब मारतोय, 'माझं गाव मागं राह्यलं' म्हणून. ते माणूस जोरात वरडल्याने तिथली माणसं गोळा हूत्यात ट्रकडायवरची पंचीत हूत्या. झक मारलो आणि दारूड्याला घेटलो असं त्याला वाटतंय. मग डायवरला विनाकारण तिथली गाववाली लोकं कायबाय म्हणत्यात. डायवर त्या गावातल्याच डायवर दोस्ताला फोन करतोय. त्यो आल्यावर प्रकरण मिटतंय. डायवर दोस्त ह्यला म्हणतोय 'ह्यचा निकाल मी लावतो तु जा वेळ हूईल.'
डायवर थँक्यू ते काय म्हणटलं नही म्हणटलं तरी चालतंय. ट्रकडायवरला थँक्यू महित नसतंय.
डायवरचा मित्र त्या दारूड्याला घिवून जातो. ट्रकडायवर ट्रक हाणत पुढं सटकतो. जाताजाता त्या गावातल्या दारूड्याबरोबर काय संबंध नसणार्या लोकांचं वागणं आठवतं. आणि डायवर मित्राची आठवण ऊशिरा राहत्या.
कधीतर दोनचार महिन्यानं भेटल्यावर हा त्यला विचारतो, काय केलंस त्यचं ?
आणि दोन क्वाटर पाजलो आणि सोडलो म्हणून डायवरमित्र हसत हासत सांगतो. 

March 29 at 10:28p

ट्रकडायवरची बायकू गावातल्या बायकांसारखीच असत्या. ट्रकडायवर लांबच भाडं घिवून गेला की धा बारा दिवस कवाकवा महिनाभर पण येत नही. तिला रोज नवर्याची आठवण येत्या. माझा डायवर काय करत असल ? असं वाटत असतंय. 
गावात येत्यात ती जोतिष लोकं कडवी असत्यात. आगूदर आदमास काढून गेल्याली असत्यात. कुठल्यातर एका सकाळी एक जोतिष दारावर येतोय. डायवरच्या बायकूला सांगायला लागतोय. 
तू बाई लै ईमानी, कष्टाची
बाई तुझ्या ह्याच सभावानं घर चाललंय ग येवशीर.
नवरा तुझा लै कष्टात गं.
कुणाच्या वाळल्या पानावर कवा पाय नही टाकला गं त्यानं.
एवढं ऐकलं की डायवरच्या बायकूला भारी वाटतंय, त्या जोतिषाला ती आत बोलावत्या आणि सुपातंन जुंधळं घालत्या.
तेवढं झोळगीत पडलं की जोतिष बिघडतो. परत बोलतोय.
ताई गावची नजर बेकार.
जातीला जात वैरी, भावाला भाऊ वैरी
चांगलं लोकाला नही बघवत.
घरातंन माणूस बहीर पडलं की राहात नही घरंचं गं.
मिळल ते पाणी पितंय.
रस्त्याला देवं कुठलं ? भूतं ग सगळी पोरी.
आपल्या हातात काय ?
हे असं ऐकल्यावर डायवरची बायकू घाबरत्या, मनात नकोनको त्या शंका यायला चालू हुत्यात. घाबरून जोतिषाला विचारत्या आत्ता काय करायचं ?
जोतिष परत बिनउपाय सांगता ऊशीरभर कायतर अभद्र बोलतो.
नंतर थांबून म्हणतो.
पोरी तु चिंता नको करू. मी हाय की.
मग डायवरची बायकू हात जोडून ऊभं राहत्या.
हा जोतिष झोळीतंन अंगार्याच्या पुड्या काढतोय. आणि तिच्याकडं हजार रूपयं मागतोय. ही म्हणत्या पाचशे हायीत.
तसं म्हणटलं की जोतिष परत चालू हूतोय.
पैसा येतोय जातोय. माणूस नसतंय गं गेल की येत.
डायवरंन कवातर दिलेली पैशे हिनं कुठतर सापडू नये असं ठेवलेलं असत्यात.
जोतिषाला थांबवून ठिवून शेजारच्या घरातंन हातऊसणं हजार रूपये आणत्या. त्या घरात पैशे देणारी शेजारीन विचारत्या कशाला एवढं पैशे. ?
ही म्हणत्या नंतरन सांगतो.
गडबडीनं येवून जोतिषाला ते पैशे देत्या. जोतिष तीनचार अंगारच्या पुड्या देतोय. एक दोन लिंबू मंत्रून देतोय आणि सांगतोय हे एक पुडी ट्रकंत ठेव. एक लिंबू ट्रकमध्ये बांध.
आणि तो जोतिष आशिर्वाद दिवून जातोय.
डायवरला बायकू लगेच फोन लावत्या आणि चवकशी करत्या. कधी येणार ?
कधीतर डायवर येतोय. डायवरला बायकू लै माया करत्या. डायवर कुठतर बहीर गेलं की ही पदरात अंगारा आणि लिंबू घिवून गाडीत चढत्या आणि शिटखाली पद्धतशीर ठिवून गडबडीनं ट्रकतंन उतरत्या. डायवर दोन दिवसानं परत भाड्यावर रूटला जातोय. तीनचार भाडं व्यवस्थित जात्यात. कधीतर लिंबू त्या कपड्यातंन सूटून पायात येतंय. डायवर हादरतंय. आयला ही काय करणी ? कोणतर करणी केल्यागत ट्रकडायवरला वाटतंय. मग सगळं चेक केल्यावर अंगार्याची पुडी गावत्या. डायवरंच मूड जातंय. ट्रक हाय तसं खाली करून सर्व्हीसींग करून घेतोय.
घरला आल्यावर पयलासारखं खूश नसतोय. जेवणावर चित्त नसतंय. नंतरनं बायकू विचारत्या असं का ? काय झालंय काय ?
मग ट्रकडायवर बायकूला सगळं लिंबू आणि अंगारा कोणतर ठेवलंय कोणतर करणी केलंय. सापडू दे त्यला जित्तं ठेवत नही बघ. असं शिवा देत सांगतोय.
मग नंतर बायकूला म्हणतोय. उद्या कुलदैवताला जावूया आणि ट्रकची शांती करून यिवूया. डायवरची बायकू काय म्हणत नही गप्पगार बसत्या. दूसर्या दिवशी ट्रकची शांती घालायला पाच हाजार खर्च हूत्यात. डायवर परत भाड्याला जातो. डायवरच्या बायकूचं रात्र वाढल तसं मन खायाला उठत असतंय. smile emoticon



टिप्पण्या

Anchal Ghuge म्हणाले…
खूप बरं वाटलं वाचून !!
Unknown म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Jaya Gophane म्हणाले…
सुंदर लिखान

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!