'तो' मेलाय.

परिस्थिती घरची जेमतेम चांगली होती. म्हणजे झाली होती. डोक्याला ताप किंवा त्रास करून घ्यायचं काही काम नव्हतं. दोन्ही पोरं हाताखाली आलेली. त्यामूळं त्यांच रूटीन लावून द्यायचं हे एक काम होतं आता. मोठ्ठा पोरगा कामावर जात होता. तो महिन्याकाठला चारपाचहजार आणायचा. बारकं पोरगं हिकडं तिकडं हिंडत होतं. ते बी थोड्या दिवसात लागील नोकरीला आणि दोघा भावांचं मिळून दहा हजार पर्यंत महिन्याला येतील. असं त्याला वाटायचं.
एक दिवस मोठ्ठं पोरगं नोकरीवरून संध्याकळी पाच ला यायचं ते आलंच नाही. फोन करूनबघितलं तर मोबाईल स्वीच ऑफ येत होता. संध्याकाळी एक फोन आला. तुमचं पोरगं दवाखन्यात हाय आणि या.
लहान पोरग्याला घेवून हा दवाखन्यात गेला. तिथं गेल्यावर कळलं. पोराला कंपनीतल्याच माणसांनी मारल्यात. कारण होतं. हा तिथलं काही पार्ट चोरायचा आणि एका दुकानात विकायचा. चोरी उघड झाली होती. मालकानं आणि कंपनीतल्या पोरांनी मरूस्तवर मारून दवाखन्यात आणून टाकलं होतं आणि सत्तर हजार रूपये नुकसानभरपाई दिली पाहिजे नाहीतर केस घालणार.
ह्यान दोन दिवसाची मुदत मागितली. बँकेत एक पावती होती पन्नास हजारची. ती मोडली आणि मेव्हण्याकडनं एक दहा हजार घेऊन त्यांच भागवलं.
हात खूब्यातंन मोडला होता. दवाखान्याचं बिलं झालं बारा हजार आठ दिवसाचं. नवीन श्रीमंत आणि जुना गरीब असल्याने त्याने लाज बाळगून आणि पोलिसांना भिऊन ते पैसे भरले होते. आता शिलकीत कायचं पैसे नव्हते मग पंधरा गुंठ्याच्या तुकड्यावर दहा हजार सोसायटीतलं काढलं. मोठ्ठ्या पोरग्याची दोन महिन्याची सक्तीची विश्रांति संपली होती. बारकं पोरगं कुठतर दूकानात कामाला लागलं होतं. त्याचा तीन हजार पगार त्यालाच अपूरा पडालता. घरच्यानी पण नाही मागितलं.
हिकडं मोठ्ठं पोरगं आता गावातंच कुणाच्यातर रानात कामाला जात होतं. व्यसनं जडली होती. दहा हजार भर देण त्या मोठ्या पोरानं करून ठेवलं होतं.
हा एककलेचा होता. पण ह्या असल्या पोराच्या वागण्यामुळं त्याला कुठंच तोंड दाखवू वाटना झालतं.
एक दिवस असाच सांजच्याला हा रानात गेला होता. 'सक्सेस' नावाचं एक किटकनाशकाची बाटली त्यानं कालंच दुकानातंन घेऊन आला होता टाम्यटो ला मारायला. त्याच बाटलीतलं औषध पिवून तो रानात पडला होता कधीचा काय. शेजारनं जाणार्यानं ते बघितलं आणि गावात जावून त्यानं त्याच्या घरी सांगितलं. त्याची बायको याला म्हणाली भऊजी कुठं सांगू नकासा ह्यनी असं केल्यात म्हणून. एवढं बोलली आणि तोंडाला पदर लावून पळतंच सूटली रानाकडं...
पोरं गाडी घेवून गेली होती ती परत येतानं हिला दिसली मधी घालून आणत होती. हिच्याजवळं थांबाव अस वाटत असताना त्या दोघांनी न थांबवताच गाडी दवाखान्याकडं घालवली जायाला वीस मिनटं लागली. त्या दवाखान्यात गेल्यावर तिथं एडमिट करून घेतलं. चौदा दिवसानं ठणठणीत करून पाठवलं.
घरी आल्यापासून तो कुणाशीच बोलत नाही. जास्त खात पीत नाही आणि घरातून बाहेर देखिल पडत नाही. त्याचा रंग गोरा होतोय दिवसागणिक आणि तो रोज मरतोय किंवा 'तो' मेलाय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!