नारळीच्या झाडांच्या रट्यांचा आवाज सळसळत होता. रात्रीच्या नवाच्या सुमारला वश्या काकूबरोबर शेतात बसला होता. काकू शिवच्या दगडाला टेकणी लावून बसली होती, घराकडंन काकूसाठी आणलेला चहा आणि पव्हं काकूला देऊन बॅटरी हाणत लांब रानात अंगावर वारं झेलत गेला.मधनंच कुठतरी एखाददुसरी टिटवी टिवटिवत होती त्या वार्यात पण तिचा आवाज घुमत होता. वार्यात असंच धा वीस मिनटं असंच हिंडला. एक निळंबीची चवाटी घेवून सप सप आवाज करत फिरवत आला, काकू पव्हं खाल्लीती, चहा वाटीत वतून घेतली, थोडं राहिलंत, 'वश्या एवढं घे रे मुला' म्हणटली. वश्यानं हातातली चिवाटी फिरवत फिरवत फेकली अंधारात गुणाकार करत ती चिपाटी कुठतंर लुप्त झाली. वश्या खाली बसला, तंगड्या गळ्यात घेतल्यागत केला आणि किटलीला दातं लावून चहा प्यायला लागला. चहा चार घोटात संपला. आता सोयाबीनाची मळणी झाकायची आणि घरला जायचं होतं. आजीनं कळशीतंल्या पाण्यानं वाटी आणि किटली मुगळली किटलीत पाणी घालून दोनचारवेळा फिरवली आणि पाणी त्याच रेषेत वतली. काकू नं तंबाखुची पुडी काढली आणि चूना लावून मळली आणि तोंडात पकाणा टाकला. वश्या मातीत बोटं घालून गवताच्या गड्याला हात घालत एकेक उपसायला सुरवात केली गवत ओढलं की मातीही उडून यायची ती त्याच्या चड्डीवर पडायची. थोड्या वेळानं त्याला या गोष्टीचा कंटाळा आला. ऊठून चड्डी झाडली आणि मघाशी म्हातारी ज्या दगडाला टेकून बसलीती तिथं बसला. म्हातारीनं पेंडंच एक रिकामं पोतं हातातंन टाकलं आणि बसली.लुगडं येवस्थित करत एकदमंच बोलाली.
वश्या तुला सांगतो एक गोष्ट.
वश्या म्हणटला सांग बाये...
लै वरसामागं एकदा खपलीची मळणी हुती, त्या येळला खळ हुतीत बैलं असायची. रोळ फिरवून मळणी असायची. ह्यायेळंचच मी बसलो हुतो राखत. तुझा तात्या मी रात्रीला इथंच मळ्यात झोपायला हुतो. त्यनी भाकरी घिवून यायला घराकडं गेलतीत. मी वाट बघत बसली हुती त्यंची. लांबनं खंदील दिसल त्यनी येतेलं. त्यनी आलीत आणि म्हणालीत बायी चल घराकडं आईच काय खर्याचं दिसना, राह्यली तर भगवंताची पुण्याई. आप्या डाक्टरला बोलवाय गेलाय तु चल. कडब्याची दोन पेंड्या त्यनी डोक्यावर घेटलीत आणि मी खंदील घेटलो आणि लगालग घराकडं गेलो. तोपतर सासुबयी गेलीती, तुझा बाबा ह्यंच्या आंगावरंच आला कडबा कोणच्या मोर्तावर आणलास रे रांडच्या म्हणून वरडाला. ह्यनी बी रडालीत सासुचा ह्यंच्यावर जीव लै. शेवटाला जीव जाताना ताटातुट झाली रे. मग धा बारा दिवस मळणीकडं यायच झालं नही. पंधरा दिवसानं रानाकडं आलं ढीग हूतं तेवढंच हुतं. तेवढ्या खपल्या भरून नेलं. रोज येणजाणं चालु झालं, ह्या शिवच्या दगडाजवळंच पच्चेरभर खपली पडलीती. कुठलं पडलंय कुणास ठावक म्हणून तिकडं नदर लावली नाय. आठपंधरा दिवस गेल्यावर तिथं एका दुरडीत खीर हळद कुकु आणि नारळाच्या परटीत दुध कोणतर ठेवलंत. मला ते बघून भ्या वाटाली.तुझ्या आजीला सांगिटलो तर ती म्हणाली तिडं ध्यान दिवू नको.षमग यिक्रम सावकर एकदिवस आला आणि बघून पायानं दूरडी लवांडली. आणि गेला. मग ऊशेरनं कळालं ती सुमी आणि तिचा भवू ह्यो कळश्या दोघं मिळून चोरली हुतीत दोन पोती. ह्याहिथंच सोनाआज्जीची हाडं पुरल्यात तिनंच वडलं तिला. तवाच्यान तीच कंबराड मोडलं. लै डाक्टर केलीत ना ना ईलाज केलीत खरं सुमीची कंबार दुखायची काय थांबीना. तवा चक्रममहाराजाला देव ईचारायला गेली. त्यनं सांगिटलं सोनाम्हातारीला निवद दाखवाय पायजे नहीतर कंबार असंच मोडणार. लै येळंन त्या राणीनं ही कथा सांगिटली सुमीची !
आपली मानसं गेलीतरीबी रक्ष्येण करत्यात बघ.
वश्याचा बाबा ताटूक घिवून आला. सोयाबीन झाकलं आणि तीघं घराकडं चालली. वश्यानं म्हातारीचा हात घट्ट धरलाता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं