शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

दिवाळीचं बाजार

बंड्या दिवाळीचं बाजार आणायला दूकानला गेलता. सामानाची चिठ्ठी दुकानदारकडे दिली, ठराविक सामान कुठलं द्यायचं ते दुकानदारानं विचारून घेतलं, म्हणजे उदबत्ती झेड ब्लॅक, वाशेल तेल आल्मंड ड्राप्स, साबन मोती. असं. चिठ्ठीच्या वर दोन दोन उभ्या रेषा मारून त्यात मध्येच श्री असं लिवलं.
मग ती चिट्टी आमल्याकडं दिली, आमल्यानं फूटाणंडाळ तोंडात टाकत टाकत एक नजर चिठ्ठीवरंन फिरवली, चिठ्ठीवर निप्पो सेल ठेवलं आणि पेनानं टिकमार्क करत एकेक वस्तू द्यायला. 
बंड्या उगंचच हिकड तिकडं बघत ऊभा राहिला. तेवढ्यातंच एकटी पोरगी लेडिज सायकलवरून आली, आली ते आली पळत आली, कावंटरवर येवून पिशवी आदळली, आणि म्हणटली, काका काका, 
दूकानदार पण काय बाळा असं चष्म्याच्या आतंनच डोळं मीचकत मायेने म्हणटला, नाहीतर बंड्या चिठ्ठी देताना दूकानदारानं चिठ्ठी हिसकावून घेतली होती. पुढं ती मुलगी म्हणटली काका तुम्ही मघाशी मला पिसा साखर दिली, मामीना लेसा साखर हवी होती. 
दूकानदार म्हणटला, अच्छा अच्छा, आमोल हिला लेसा दे. 
दूकानदारात मोठ्ठा बदल झालता, आमल्या म्हणायचं, ते आमोल म्हणटला. म्हणून काय आमल्या हारकला नही, शांत थोबाड करून बेसनपीठाच्या मेणकागदाला गाठ मारत तिच्याकडं थोबाड पाडून बघत तसंच गेला आणि लेसा देवून आला. परत त्या पोरगीनं दहा रूपये देत म्हणटल काका, फाईव्ह स्टार द्या. परत काका हारकला, खुर्चीतंन उठत जवळच असलेल्या कॅडबेरीच्या चौकोनी पेटीतून दोन फाईव्ह स्टार काढून दिलं, बंड्या मनातल्या मनात विचार करत होता. गोड गोड वस्तू दूकानदार स्वतःजवळ ठेवून घेतो, आणि नोकराला तेवढं फूफाट्यात घालतो. विचार आला आणि गेला, मग त्या पोरगीनं पिशवी हातात सरकवली आणि ऊसाची चिपाडं काढावी तसं दातानंच चाॅकलेटचं कागद फाडलं, बंड्या तिकडंच बघत होता, तीनं पण बंड्याकडं बघितलं, बंड्या हसला. जाता जाता तिनं कानावर आलेली केसं बोटानं माग सारली, आणि चाॅकलेट खात गेली, त्यात फाईव्ह स्टार हे चाॅकलेट बिळबिळीत त्यामुळं ती तोंड गोलाकार फिरवत गेली. बंड्या येडं झालतं. आमल्याला म्हणटला सामान भरून ठेव पैशे घिवून येतो. आमल्या म्हणटला लवकर ये .
बंड्या तिच्या माग माग चालंल, वाटंत गण्या भेटला, गण्या लै बोलतंय तेवढ्यात डाव जायाचा असं त्याला वाटलं. गण्याला म्हणटला गण्या जरा आरजंट काम हाय, संध्याकाळला चौकात बसूया.
गण्याला गंडवून हे तिच्या मागं गेलं. शेवटला ती बाळूकाकाच्या घरात घूसली. ही त्या बाळ्याची भाची हे बंड्यानं वळखल. 
आलंय ते आलंय राज्याला भेटून जावूया म्हणटला राज्याच्या घरात गेला तोपर्यंत घराला कुलूप. याला बरं वाटलं राज्या काय कोणपण कवानहीकवा कामाला येतोयच. परत मागं फिरून येताना ती बाहेर येवून बाळ्याच्या पोराला चाॅकलेट चारतेल बघितलं. तिरकस बघत चालला, ती पण एकटाक बघत होती, एकदा शेवटच बघून घ्याव म्हणून सरळ बघितलं तर काटापैकी स्माईल दिली. बंड्या हवत गेलं. ही काय सूधरू देणार नही असं वाटलं. मग त्यानं दोनी हात खिशात घातलं पँटच्या आणि जोरात चालत सूटलं. मध्येच त्याला वाटलं आपन उगचच जोरात चालतोय. 
दूकानला आला, पैशे भागवलं, सामान घेटलं, घरात आणून टेकवलं आणि बाहेर कट्यावर येवून बसला. विनाकारणंच डोकं खाजवत बसला, कायपण होवू दे हिला नाय सोडायचं हे सारख सारखं म्हणत बसला. घड्याळात सारख बघायला लागला कधी एकदा संध्याकाळ होत्या अस त्याला वाटलं. कायतर करत करत वेळ काढला. 
संध्याकाळला घरात थाप ठोकली राज्याकडं चाललोय म्हणून आणि सटकला. 
तिच्या घरापुढं आला, तर ती सूतळी बाँब लावत होती, आयला असहिष्णू ! बाँब लावायची आणि लांब जावून कानात बोटं घालून उभा राहायची, हिच्यासारख्या पोरीनं फुरफुरबाजा उडवला तर किती छान दिसली असती असं त्याला वाटलं, मग ती घरात घूसली ह्याला वाईट वाटलं. मग हा राज्याच्या कट्ट्यावर जावून बसला. राज्याचा बाबा तंबाखू मळत बाहेर आला, काय बंड्या लै दिवसातंन ? बंड्या म्हणटला राजूकडं आलतो.
तंबाखू चिमटीतंन धरून वटात ठेवत राज्याचा बाबा म्हणटला गेलाय कुठतर गावात यील पाच मिनटात बस तवर. असं सांगून ते आत गेले. बंड्या ते आत जायचीच वाट बघत होता. तेवढ्यात ती पोरगी गॅलरीत आली. बंड्याकडं बघत होती. तिच्या हातात मोबाईल होता, ती कायतर खुणवत होती. बंड्याच्या ध्यानात ते येईना. मग ती मोबाईल वर बोट नाचवत असलेल यानं बघितलं, मग उगच मान डूलवली तर तीनं मोबाईल खाली ठिवून हाताची नऊ बोटं दोन वेळा दाखवली. ह्याची ट्युब पेटली, हा परत मानहलव्या झाला, मग तीनं अशा भाषेतंच अख्खा मोबाईल नंबर सांगितला. काॅनटेक्ट बाळू नावानं सेव्ह केलं आणि व्हाटसपला जावून तीला शोधला, hi....... असा मेसेज पाठवला, मग तीनं एक स्माईली पाठवली, आणि खरोखर पण स्माईल देत आत गेली. 
राज्याला लागू दे घोडा म्हणटला आणि हा घरला गेला. तीन परिणीती चोप्राचा डीपी ठेवला होता, आणि स्टेटस enjoying holidays m.u my friends heart emoticon असा ठेवला होता. बाकबाक मेसेजवर मेसेज करत राहिला, name ?
Clg ? 
वगैरे. एकपण रिप्लाय परतला नाही. कंट्ळून झोपला.
दूसर्या दिवशी सकाळी उठून पाहतोय तर पंधरा मेसेज तिचे आलते, वरनं तिनसुद्धा ह्याचा बायोडेटा दोनचार रकानं वाढवूनंच म्हणजे hobby, fav hero? Sport, bike वगैरे विचारलं. बंड्यानं सगळी उत्तर दिली. ती ऑनलाईनच होती, एकेक करत रिप्लाय देताना, wow, nice, awesome असे तिचे रिप्लाय येत असल्याने ह्याला बरं वाटलं. मग तिला प्रपोज कराय पाहीजे अस वाटत असताना तिचा मेसेज आला gf ? 
मग यानं नाही असं सांगितलं, सोबत दोन रडक्या स्मायल्य पाठवल्या, मग तिला कोण bf आहे का असं त्यानं विचारलं. स्टिल आय म सिंगल अस तीनं सांगितलं. ह्याला बेक्कार घाई झालती i love you फाॅरवर्ड केलं. ब्लु टीक दिसली बराच वेळ ती ऑनलाईन होती. हे वाट बघत बसलं, गोलात दिसणारी परिणीता एकदमचं गायब झाली, तीनं ब्लाक केलतं. ........
पुढंच पुढं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा