बाजार

बाजारला आलोय. कडीपत्ता, वांगी आणि फ्लावर विकायला. डाव्या हाताला आमच्या गावचा जावई बसलाय, त्याला मी भाउजी म्हणतो ते सूद्धा वांगी विकायला आलेत. त्यांची वांगी काटा आहे माझी कूडची आहे. लै दिवस बाजारला गेलं नसल्यानं भाऊजीला कस लावलाय वांगी म्हणून विचारलो
ते म्हणटलं, धा ला अर्धा . मी पिशवीतनं वांगी काढूस्तुकर गिराईक तूटून पडली. नंतरन भाउजी म्हणटलं खुळ्याबोड्याचा हायीस का तु ?
मी म्हणटलं काय झालं ? 
तुझ माल कूडची हाय, धा न पावशेर जायला पायजे. गंडवली तुला गिर्हाईक. 
मी म्हणटलं भाऊजी झक मारली.
नंतर दरात बदल केला, तोपर्यंत निम्मा माल गेलता. म्हणटलं खवू दे गरीब !
मग भाऊजीन मला काकडी खायाला दिली.वरनं म्हणटला खा आत्मा थंड हूतोय.
उजव्या बाजूला बाजारात ओळख झालेले काका आहेत, ते थोडे फार टकले आहेत. भेंडी, मुळा, आणि नारळ विकायला आलेत. त्यांना गिर्हाईक कमी आहेत. मघाशी एक गिर्हाईक आलं आणि म्हणटलं नारळ कसले आहेत ?
काका म्हणटले तुळीला बांधायला, पुजायला येतंय.
मग गिर्हाईक म्हणटलं मुळा बी पुजून बांधायचा असतो का ? काका भडकून गप्प झालं. मग मी काकांना माझ्याकडंची एक काकडी दिली. मग ते त्यांनी बरोबर मध्ये मोडलं आणि पाच मिनटानं खाल्लं.
मघाशी एक आज्जी कडीपत्ता न्यायला आलती तिला पाच रूपये ला पेंडी म्हणून सांगत असताना एकटी बायी आली कडिपत्याची पेंडी उचलून घेतली आणि टाकून गेली. आज्जी म्हणटली वास कसल घेत्यात कुणास ठाऊक बर ते बर नहीतर नाकात एखाद दुसरी काटकी जायाची.
मग मी आजीला तीन रूपये ला पेंडी दिली. आणि म्हणटलं आज्जे बघ तुला तीनला दिलो काय नही.
आज्जी म्हणटली तर रे माझ्या नातवा पेंडीचं वझ नही जाणार रं.
काकाच्या पलिकडं एक मिरचीवाला बसलाय तो श्री स्वामी समर्थ जपाच्या चालीवर एकदम लहान आवाजात चला दहा रूपये पावशेर असं म्हणतोय. गिर्हाईक नसताना पण जप चालू असतोय त्यावरनं तो भक्त असेल असे वाटते.
भाऊजीचं पोरगं आता ए याँगी याँगी अस ओरडत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं