पुढंच पुढं 1

ह्ये बी.काॅम केलतं. एका C.A च्या हाताखाली काम करत हूतं. तिथंच एक पोरगी पण येत हूती कामाला. मग सगळं हिशेब करता करता ह्यांचा बी हिशेब जुळला. हे बेनं मुलखाचं उडाटप्पू हुतं. गावात ह्यला कोण शिवा देणार नही ते त्या गावचं नसणारंच. गाडीवरनं गेलं की मागं म्हणायची गेलं बघ बेणं बा च्या जीवावर डबा घिवून ! 
मग निबार व्हायलतं म्हणून बाबा म्हणला दोन वर्षात लगीन लावून टाकू या. पाव्हण्यात काय पोरी कमी नहीत तु बाॅट करून दाखव नुस्तं ! हे म्हणलं बाबा माझं झंगाट हाय. तिच्याबरोबरंच करणार.
जात बित जुळत हुती त्यनं बाबा काय आडव तिडवं नही बोल्ला. तिकडं पोरगीचा बाप वकील. ही सगळ्यात बारकी त्यनं हीच बी घरात अप्रम लाड !
ती म्हणलं ते सगळं मिळत हुतं तिला.
मग असंच एका सन्डेला ही दोघं गेली पिच्चरला. कार्नर सिटवर एकमेकाला पाॅप कार्न भरवत बसली हूती. त्यातंच ईमोशनल सीन. ती ह्यच्या खांद्यावर मान टाकली हात घट्ट धरली. ह्ये पण ईमोशनल झाल्याचं नाटक केलं. कानावर बसलेली माशी तंद्रीत झटकावी तसं तीच टक्कूरं थोपटलं. बारिक आवाजात लग्नाचा ईषय काढला. ती पण हं हं करत ऐकाली. जरा भडकणार असं दिसली की हा पेप्सीचा स्ट्रा तिच्याकडं करायचा. मग ती भडकायची नाही. असंच शुद्ध टेलंट वापरून एकेक गोष्टी तिच्या ध्यानी मनी उतरावलं. नंतर म्हणला काय प्राबलेम झाला तर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे !
ती म्हणटली आमचे पप्पा माझे लाडके आहेत. ह्ये मनातल्या मनात म्हणटलं, माझा बी लाडका हुं दे !
घरला गेली दोघं आपापल्या. ह्याला बापानं इचारलं काय म्हणली ? व्हायल्या तयार ! परत बाबा वरडू लागलं म्हणाला कशाला झक माराय शारातल्या पोरी कटवायच्या ? गावातल्या सगळ्या काय जुन्या हिरीवर गेलत्या काय ?
हे परत बाबाला ईमोशनल केलं. बाबा म्हणटला कसं हुईल तसं हुईल.
तिकडं ती त्यांच्या पप्पाना रिकवेश्ट करणार हुती. घरात गेल्यावर आवरली. पप्पा लवकर आले होते. ते बघून तिला बरं वाटलं. चहा घेवून गेली. हाय माय डिअर डॅडी ! लुकींग बिझी.
नाही गं सोनु, थोडं काम होतं. मग हीनं पण चहा देत हसत खिदळत मला एकटा मुलगा आवडतो म्हणून अर्ज केला.
वकीलसायेब वर जाणार्या कपाला स्थगिती देत हसले. कोण आहे तो ? मग हिनं त्याच नाव गाव सांगितलं. व्हाटसपवरचा डीपी दाखवला. वकीलसायबांनी स्टेटस बी बघितला 'love makes life live' वकील खूश झाले. म्हणटले उद्या बोलंव त्याला घरी.
ही खूश झाली. मम्मी दारामागं उभी हुती ती पण खूश झाली. हीनं गॅलरीत जावून फोन करून त्याला सांगितलं. हे म्हणटलं मला भ्या वाटतंय. ती म्हणली अरे ते काय तुला लगेच डांबणार नाहीत. ह्यानं ठीक हाय म्हणून फोन ठेवला. माळावरच्या फावड्या रम्याकडं फार्मल शर्ट असतात हे त्येला आठवलं. मग त्यानं गाडीला किक मारली.
(पुढंच पुढं)

टिप्पण्या

Mukesh म्हणाले…
पुढंच केव्हा :D

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं