शनिवार, २५ मार्च, २०१७

आज्जा आणि आण्णा

वर्षाला रानात शाळू असायचा, आतापण हाय. आज्जा हुतं तवा सांजच्या टायमाला आम्ही फिरायला जायचो. माळा असायचा आम्ही आंटा म्हणायचं त्याला. कन्नड भाषेत एक घाण म्हण हाय. 'आंटा इल्लरे शंटा इल्ल'  म्हणजे  ते रान पिकलं नसायचं. ह्या दिवसात संध्याकाळी एक असलं मस्त वातावरण असायच काय विचारायला नको असं. तवा अजिबात मोबाईल कंप्युटर असलं काय काय नसायचं. आज्जांची दोस्तं लै. 
आज्जा फिरत असायचे. पंढरपूर ची वारी करणारा आज्जा गावात एकटं. लोकांच्या उपयोगाला पडायच, हे मला दुसरीत सांगायचीत. काय घंटा कळतंय ? मी उगचच रुबाबात हांहां म्हणायचो. 
पुढं पैलीदुसरीत गेल्यावर सकाळी संध्याकाळी आज्जा न्यायला आणायला यायचीत. 
केस कटींगला गेलं कि आज्जा टक्कल करायचीत आणि शेंडी ठेवायचीत. संध्याकाळी भजनाला आजरेकरवाड्यात. तिथंच आज्जांचा दोस्त पैलवान तातबा लठ्ठे. त्यांची खासियत हुती लै खुराक लागायचा, मग आम्ही जेवायला बसल्यावर जरा जास्त जेवलो कि आज्जा म्हणायचीत भजी पाव- तात्या लठ्ठ्या. दुसरं दोस्त निशानदार आज्जा त्यांचं टोपन नाव बताशा. बताशा आज्जा  प्रसिद्ध माणूस. कुस्त्यांचं मैदान घ्यायचं पैलवान आणायची तयार करायची कामं करणारा माणूस. त्यांच्या मळ्यात आज्जा गेलते, तीन दिवस रानात बोलत बसलेते. मी कुठतर गावात जरा वेळ थांबलो कि हे हमखास ऐकायला गावायचं. आज्जांनी पैलवानकी केली आणि नंतरनं सोडली. नांदणी हे आमचं मुळ गाव. आता तिथं पडका वाडा राह्यला. दारं तुळ्या पांढरी माती. 
राऊ भोसले, बाळु कदम, आप्पा कोळी, बापु माळी, बाळू परीट, किशना कोळी, केशव शिंपी, महादा कांबळे, देवगोंड आदगोंड मलगोंड पाटील, कधी पत्तं पिसत बसायची चावडीवर तर कवा पत्रक घिवून मापं काढत बसायचीत. 
इलेक्षन लागलं कि रत्नाप्पा कुंभार हे आमचं लेबल फिक्स लागलंतं. आण्णा आज्जांची दांडगी मैत्री. कारखाना, सुतगिरणी, चावडी  आज्जा कुंभारचा माणूस. 
आण्णापण आमदार मंत्री झालीत खरं कधी माणसं विसरली नहीत.
आज्जांच्याकडंनं महाभारत, रामायण ह्या गोष्टी लै मजेनं ऐकायला मिळायच्या. श्रावणबाळाची गोष्ट आली, किंवा ज्ञानोबा महाराजांची समाधी आली कि रडायला यायचं. तेच मुक्ताबाईनं चांग्या मेल्या चौदा वर्षे तपश्या करून अजून कोरडाच काय रे ?
किंवा जनाबाई म्हणायची विठ्या मेल्या तुझी रांड रंडकि झाली, नामदेव दगडाला खोलीत कोंडून ठेवताना, पुण्याचा टग्या मंबईचा भामटा ऐकताना लै लै पडून हसायला व्हायचं. रिपीट सांगा सांगा म्हणून लागायचो मागं. आणि कधीतर मग झोपून जायचो. 
आज्जांबरोबर लै हिंडायला लागायचं. चॉकलेट मिळायचं नही खायला. फुटाणं वटाणं चिरमुरं शेंगदानं खारेडाळ खारेबिस्कुट लै मिळायचं. राजुतात्याच्या दुकानात बसून आज्जा पेपर  वाचायचं मी खात बसायचो. मज्जा तर यायची. खायला संपलं कि कसतर वाटायच. 
आज्जांनी गावातल्या बाळू परिट नावाच्या माणसाला दुकान काढून दिलतं. आज्जा जित्तं असताना च त्यानं दुकानात फोटो लावलाता. आज्जा बक्कळ जगले. १०३ वर्षं. 
जनावरातलं लै कळायचं. जनावर बाजार हमखास ठरलेलं, तसंच माळव्याचा बाजार. मिरजेत एक दलाल हुते. हाजी गुलाब हानिफ डोंगरे. फ्लावर संपल्यावर त्यांनी दोन हजार रूपये चुकभुल म्हणून घरात आणून दिलं. 
बॉस म्हणून धोंडीराम वायचळ नावाचे एक टेंपो डायवर हुते त्यांचा टेंपो माळव्याला असायचा, लै फेमस माणूस. त्यानंतर सदा गोंदकर सदामामा आला. हे सगळे कडेपर्यंत राह्यले. 
सांगलीला शब्बीर आणि कोल्हापूर ला बशीरभाई बागवान अशी दोन दलालं त्यांच्या दुकान ला माल जायचा. कधी एका पैशाचा हिशेब आज्जा विचारले नहीत. 
हे सगळं बक्कळ असायचं. 
माझं दुसरं आज्जा म्हणजे आईचे वडील. त्यांना सगळी आण्णाच म्हणत्यात. आगदी आज्जीपण. माझी मम्मी सगळ्यात थोरली. त्यामुळं तिला सगळी आक्का म्हणायची. मी सगळ्यात थोरला दिवटा नातू. मी जन्मलो तवा नवीन घर तयार झालं तिकडंच. आणि जल्मल्यावर फरशीवर आण्णांनी जन्म तारीख कोरली. आण्णा परवापरवा गेले. अट्याक यायच्या आधी आण्णा त्या जागेवर जाऊन ती फरशी स्वच्छ करालते असं आज्जी सांगिटली. 
आज्जा आणि आण्णा दोघं दोन टोकाचे. आज्जांच्याकडं वारकरी संप्रदाय तर तिकडं जैन पुराण. जिनसेन महाराजांच्या जवळचे. गावातल्या पालखीचा भैरोबाचा आणि बस्तीचा पुढचा मान आण्णांच्या घरी. जत्रेला आण्णा म्हणजे आमची बँक. सकाळ दुपार आणि संध्याकाळ असं तीन टर्म पैशे मागून घ्यायचो. 
सुट्टीला सगळी मामाच्या गावाला जायची. आमच्या मामाचं गाव पलिकडंच. आम्हाला काय लै कौतुक नसायचं. पण फटाकड्या हिकडच्या तिकडच्या आणि कपडे ह्यासाठी आण्णा आणि मामाच्या मागं लागायचो आणि ते मिळायचीत. म्हणून तिकडं पळत जायचं. संध्याकाळ झाली कि मी माझा भाऊ सिद्धार्थ आणि चुलत मामा वैभव आम्ही आणि आण्णा फिरायला जायचो. आण्णा महावीर भगवान नेमिनाथ पार्श्वनाथ गुळव्वा च्या गोष्टी सांगायचीत. फ्लावर त्यांचा मुंबई ला जायचा. भुजबळ दलाल कडे असायचा, त्यावेळी करंड्या भरायची पद्धत हुती. त्यावर लेबल लावायची, लेबलं लिवायचं काम माझ्याकडं असायचं. सगळी काम शिकलो तिथं. पण हे घर ते घर भयंकर वेगळं. 
आण्णा शिखरजीला जायचे तवा पत्र लिवायचे तिकडंन ते शाळेत यायचं. घाटगेबाई सगळ्यांपुढं वाचून दाखवायच्या. मग मी पण आण्णा आलीत कि आमच्या गावातंनं पत्र टाकायचो. आणि परत तिकडं गेलंय काय बघायला जायचो.  ती पण मजा यायची. आण्णानी पालखी धरायला गेलं कि खोबरं उधळायच्या टायमाला स्वतः चा टावेल काढून द्यायचे. आणि स्वतः तसंच जायचे. अलिकडं कधीतर पेपरात लिवलेलं दाखवलं कि हारकायचीत. आण्णांनी बक्कळ जीव लावला. शेवटपर्यंत काय ना काय जाताना सांगायचे. मी बसून ऐकायचो. आण्णा गेले आज्जापण गेले. बर्याच आठवणी राह्यल्या. 
विचार करतो मी किती नशिबवान हुतो ? ही अशी माणसं मिळाली. 
तुकोबा ज्ञानोबा महाभारत रामायण पुराण व्यवहारातल्या बक्कळ गोष्टी कळाल्या. शेती कळली, गाणी कळली, किर्तन कळलं, पैसा कळला आणि त्यावेळचा वेळ काय वाया नही गेला. उलट त्यांना वेळ हुता ही गोष्ट माझ्या किती भल्याची हुती. दोनतीन तास ह्याच आठवणीवर घरात बडबडत बसलोतो. मला रडायला लै येत नही पण आत रडत बसतो. सगळ्या नातवांना अशी म्हातारी माणसं मिळूदेत आणि ऐकायला वेळ मिळूदे. काय बोलावं डोंबाल ?
काळ बाकी बदलला. ☺💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: