मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

क्रांतीसिंह नाना पाटील

चौथीची उन्हाळी सुट्टी होती. घराशेजारच्या सुरगोंड मास्तरना सुट्टी असायची. मग ते कोल्हापूर हून गावाकडं यायचे. त्यांच्या घरात ढीगभर पुस्तकं, त्यात गोष्टीची, इसापनिती, चंपक, पेपरमधले अंकूर बालमित्र हे सगळं वाचायला लै आवडायच, म्हणून मी तिथं सदानकदा पडाक सकाळचा नाष्टा पण तिथंच व्हायचा आणि कधीकधी रात्रीच जेवणपण. 
त्या सुट्टीत मास्तर परत कोल्हापूरला जाताना एक पुस्तक देवून गेले. जे मी त्यांना अजूनही परत देत नही. पुस्तकाचं नाव क्रांतिसिंह नाना पाटील. नाव वाचून तर भारीच वाटलं म्हणटलं क्रांतिशिंव आणि पाटलाचा नाना हे जवळच वाटलं. पुस्तक ईतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवारांनी संपादित केलेलं आणि अरुंधती प्रकाशनानं प्रकाशित केलेलं. नाना पाटीलला कुठल्या महान ठिकाणी जन्म मिळाला नव्हता. आमच्या सारख्या लहानशा शेतकरी कुटुंबात जन्मलेलं नाना, घरी वारकरी संप्रदायातले आईवडील. साधंसुध कुटुंब काहीही पार्श्वभूमी नसताना नाना तलाठी पदापर्यंत पोचले. ब्रिटीश सरकार जनतेचं शोषन करत होतं. जिकडंतिकडं पोलीस हुते. हे सगळं बघून नानांच मन अस्वस्थ झालं तलाठ्याच्या नोकरीला राजीनामा दिला आणि घेतली ऊडी गांधीबाबाच्या चळवळीत !
अंतरगात संवेदनशीलता मापक रांगडेपणा, भाषेचा गावरान गोडवा ह्या बळावर नाना लोकांत लोकप्रिय व्हायला लागले, नाना भुमिगत असायचे पोलिसांना गुंगारा देण्यात नाना चतूर होते, बळाच काम नसून ते डोक्याच होतं कुणीतरी एक पवाडा रचला होता, बहुतेक लाड नाव असावं.
एकदा काय प्रकार घडला
नाना पाटील बसला दाढी करायला
तेचा लागला सुगावा पोलिसाला 
पोलिस गेलं पाटलाला पकडायला
नाना पाटील लई चतुराइवाला
त्यानं आपल्या दाढीचा साबण पुसला
आणि लावला न्हाव्याच्या दाढीला
नाना पाटील लागला दाढी करायला
तोवर पोलिसाचा वेढा पडला
पोलिसांनी न्हाव्यालाच ऊचलून नेला
आणि धोपटीसह नाना पाटील पळून गेला 
जी जी जी
...........................................
नानांनी आपल्या बळावर माणसं ऊभं केली. भुमिगत असताना हिंडत असताना जवळ पैशे नसायचं, त्यावेळी नाना मसोबाची चांदीची डोळं काढून घ्यायचे. स्वतः च्या लग्नात स्वतःच मंगलष्टक म्हणून त्यांनी आदर्श घालून दिलं. आज पाठीमागं वळून बघताना त्या काळात हे सहजसोप नव्हतं हे ध्यानात येतंयच. आजही बर्याचजणांना नाना माहीत नाहीत. मी हायस्कुलात होतो तेव्हा गांधी नेहरू टिळक ह्यापलिकडचे नेते कुणाला माहिती नव्हते. सुदैवानं मास्तरच्या कृपेने ते पुस्तक माझ्या हातालालागलं आणि नानांची गळाभेटच झाली. जयसिंगराव पवार मागं एकदाजयसिंगपूरात व्याख्यानाला आलते तेव्हा त्यांची सही घेतली. ते सुद्धा भारावले. एकंदरीत ज्या माणसाला वाचून एवढं भारावायला होतं त्या माणसाच्या काळात माहोल काय असेल ? याची कल्पना केली तरी आंगावर काटं ऊभी राहत्यात. 
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: