असंच पायजे ह्यास्नी..!!

मी आठवीला हाय. बाबा मास्तर हाय. मी आदी पप्पा म्हणायचो. पण आता योग्या म्हणटला आमचं पप्पा न म्हणता आमचा बाबा  म्हणायचं. आणि सर नही मास्तर म्हणायच. बाबा अलिकडं लै वांड झालाय. उठलंसुठलं कि वरडतच असतो. मग मम्मी बी वरडत्या. लै मस्ती हाय दोगांना. मी एकटाच हाय. तरी बी आईबा दोघं कायम बोंबलत्यात. काय दारू पिवून आल्यागत बघत्यात. योग्या म्हणटला घरातल्यास्नी मस्ती हायच रे. त्यला एक भवू हाय बारका पाचवीत. त्यो आभ्यास करतोय आणि हे शिवा खातं. 
आमचा बाबा दिवसा शाळेत शिकवतोय आणि नंतरनं हिथं माझ्यावर राग काढतोय. नुस्तं वरडतोय. आई बी. नंतर आई मंगळत येत्या. 
मग मी बी परवा मस्ती जिरवलीच. 
परवा योग्याच वाटदिवस हुतं. मी गेलतो संध्याकाळी. रात्री यायला धा वाजले. बाबा अंगावर आला वरडत. हरामखोर तुला भिताडातंच गाडीन. मला लै वईट वाटून रडायला आलं. मी म्हणटलो मारा. गाडा.
बाबानं यिवून ढकलंलं. जा लै शाना हायीस. तणतणत बसला उशेरभर. मी हिकडं यिवुन झोपलो. रडायला आलं. मुसमुसत रडलो मग सलदी झाली शेंबुड आलतं. मग मुसमुस. रडु. एवढंच. मग आई दुध घिवून आली. बाळ पे एवढं. राजा असं करायच नही. पाचदा म्हणटली रट्टा धरून उठवालती. नही उटलो. तुंबून बसायला मजा येतंय. 
जरा रडायच आवरेज कमी झालं. मग मी परत बाबाला डोळ्याफुढ आणलं. बाबाला भिताड तुटेल काय ? 
नही. 
बाबा मग प्रयत्न करेल. भिताड पाडायचं. पडणार नही भिताड. मग बाबा आईला म्हणील अगं ये दिवार क्यु नही तुटती. मग आई म्हणील. तुटेगी कशी ? आंबुजा शिमीटसे जो बनी है ! 
ईह्हु बाबाला असंच पायजे. मस्ती करतंय का ? पाड भिताड आता ! कळतंय आंबुजा शिमीट.
लै हसु आलं. तोंड दाबून हास्लो. हसताना पण शेंबुड येतंय. 
मग झोप लागली. घुर्रघुर्र.
सकाळी ऊठलो. च्या पेलो नहीच. आई लै मिनत्या केली. नही. आमराण उपोषन. कट्टर. 
पाणी चालतंय. मग आंघुळ आवरलो. आभ्यास करत. गृपाठ लिवलो. आई आली. बाळ असं करु नको. कायतर खा पोटाला. त्यंचा जीव हाय म्हणून बोलत्यात नव्हं ? 
ए जा बई हिथनं. च्चलं. तणतणलो. 
मग नऊलाच दफ्तर घिवून घराबहीर पडलो. मामा कडं गेलो. मामा गावातच हाय. बाबाच त्यच्याबरोबर वाकडं हाय. आईचंबी. मी बोलतोय मामाबरोबर. मामा माया करतंय. मागल्या ऊन्हाळ्यासुट्टीत मामानं ब्याट घिवून दिलती. आमच्या बाबानं जाळली. मामा चांगला हाय. मामा माया करतंय. 
मामीला म्हणटलो जेवायला वाडा. मामी म्हणटली भांडलायस काय ? मी व्हय म्हणटलो. मामांच्यात इंद्रायनी तांदूळ असतंय. भात भारी लागतंय. मामीला महीत हाय मी लै जेवतो. मामीनं वाढली. लै जेवलो. मामा म्हणटला मास्तर हाकल्ला काय घरातंन ? 
व्हय म्हणटलो. सगळं सांगिटलो. मामा म्हणटला आसुदे. बारकं हायीस अजून तु. मामा चांघला हाय. बाबाच्या अंगात मस्ती हाय. जेवलो. लै जेवलो. मामीनं मेणकागदात भडंग आणि राजगिर्याचं लाडु दिली. घंटा झाली कि खा म्हणटली. मी गुमानं शाळेत जवून बसलो. योग्याला सांगिटलो. योग्याचा बाबा म्हणतो मास्तरलोकं वडापाव खावून दिवसं काढत्यात. आमचा बाबा लै जेवतो. मग आंगात मस्ती येत्या. गृपाठ चेक करून घेटलो. उजीला वही दिलं. उज्जवल्ला. तीचं त्वांड वल्लं असतंय. आसुदे. 
मग हिकडं तिकडं बोंबलत हिंडून सा वाजता घरला गेलो. बाबा आलता. आई बी. दप्तार टाकलो. गल्लीत गेलो. जरा हुदडुन यावं म्हणून. बाबा खिडकीतंनं बघालता. वाकून बघालता. बघ म्हणटलो आणि नाचत गेलो. मग लै हुदडलो सन्या आणि मी. आणि परत घरला गेलो. खोलीत जावून बसलो. मास्तर बातम्या बघालता. बघु दे. आणि मान पलट करून माझ्याकडं बघिटला. मला आरशात दिसलं. बारिक हसु यायलतं. नंतर जवून खोलीत बसलो. रडु काढालतो. यिना. मग प्रेत्न केलो. डोळं च्चोळलं. पापणीच क्यास आत जवुन गुदगुल्या झाल्या. आई यायची चिन्ह दिसालतं. हातावर थुकलो आणि डोळ्याला फुसलो. हात वढत बसलो.आई आली. भजं केलती. आणि कोशींबीर ते. मसालाभात. भज्याच वास यायलतं. तोंडात यायलतं ते पाणी अश्रु म्हणून डोळ्यात पायजेलतं. 
मग आई म्हणटली बाळ खा. तुझ्यासाठी केलोय. सकाळीपण जेवला नहीस. 
नही जा म्हणालतो. पण ओरिजनल आश्रु वल्लं राहत्यात तेवढं थुकि राहात नही. मग गाल फुगवून खाली मान घालून एक भजं खालं. आणि उठून गेलो. आई म्हणटली कुठं ? 
सकाळी जेवलं नसल्यानं प्वाट बिघडलंय. जुलाब लागलंय म्हणटलो. मग आई रडकुंडीला आल्यागत दिसली. यिवु दे. मग जावून हासत बसलो. तिथं. मग आणि त्वांड धुवून आलो. बाबा आई आलीत. ताट घिवून खोलीत बाबा पण नरमलाता. खा म्हणटलीत. मग लै जेवायच मन हुतं खरं नही. मस्ती उतरली पायजे.
मग गप्प खाली मान घालून मुदामनं आवाळचवाळ खाल्लो. उटलो. जवून झोपलो. ह्यनी दोघं जेवालती. मला मळमळाय लागलं. ए्याक केलो आणि पळत बहीर गेलो. हुंबर्यावरच वकलो. मग ही दोघं ताट सोडून आली. आई रडकुंडीला आलती. मी बी लै वकलो. बाबाचं बी त्वांड पडलंतच. आता जरा बर वाटलं. 
आणि नंतर यिना झालती उल्टी खरं उगच तांब्याभर पाणी घिवून रडत वकायच नाटक केलो. आई वकलेलं फुसालती. बाबा माझ्याकडं यिवून म्हणटला चल डॉक्टर कडं जवून यिवु. मी बोल्लो नही. गेलो. हिसका मारून. झोपून परत थुक्की लवून रडालतो. आई यिवून बसली. टेंशन नही घ्यायच पिल्लु बाबा हायीत म्हणून बोलत्यात नव्हं. ? 
असला म्हणून काय झालं. मास्तर हाय पोराबरोबर वागायची अक्कल नही. हे मनातल्या मनात म्हणटलो. बाबा गाडीवरंन जवून डॉक्टर कडंन गोळ्या आणला. खा म्हणटला. बाळ रागात हुतो म्हणून बोल्लो रे. म्हणटला. 
असं परत नही बोलत म्हणटला. 
इथनं फुडं कवाच नही असं बोलणार  बोल रे आता म्हणटला.
मग मी हां म्हणटलो शेंबुड वढत. मग गबबसला. मी पांघरुण वढून झोपलो. हासु यायलंत. ऊशीला चावलो. हां. मस्ती जिरलीच कनी. असंच पायजे ह्यास्नी.
-श्रेणिक नरदे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं