तिथं कुणीच नसतं

ती तालुक्याच्या पार त्याकडच्या एका खेड्यातून आली होती हे तसं कुणालाच न पटण्यासारख होतं. जीन्स टाॅप, पंजाबी कायबी घातली तर भारीच दिसायची. शुद्ध बोलायची. शुद्ध बोलणे म्हणजे अधेमधे इंग्लीश बोलणे वगैरे बोलायची. फुल्ल हायटेड होती. एकंदरीत चैनीखोर प्रकारातली. 
हा गडी दोन वर्ष बारावीनंतर गॅप टाकून काॅलेज ज्वाईन केलता. त्यात पण बोंब अशी की हा सकाळपारी यायचा नुस्तं डाव टाकायचा आणि निघून जायचा. लैच तट मारला तर कट्ट्यावर. अशातंच पहिलं वर्ष गेलं. कायतर करून दूसर्या वर्षात एटीकेटीनं आलता. 
आता सेकंड ईयर म्हणटलं की जरा पद्दशीर यायला पायजे अस त्याला वाटलं. प्रेझेंटी शिटवर नाव तर हाय का बघूया म्हणून एक रोज पहिल्या दिवशी आला ह्यो गडी. तर क्लासरूम मध्ये एफ.वायच लेक्चर चालू हुतं. बाहेर एसवायची पोरं पोरी थांबलीती, तेवढ्यात एफवायच लेक्चर सुटलं लॅब मधून पोरंपोरी रमतगमत बहीर यायलती, 
आत्तरंहिच्या ! ही आली बाहेर एक ढोली आणि एक नरफूडी पोरगी तिच्यासोबत होती. त्या याला दिसेनाश्या झाल्या ही एकटीच दिसाली. पिच्चर बघताना साईडएक्ट्रेस चांगली असली तरी बघतो कोण .? तसं आखंड एसवाय हिच्याकडंच बघालतं. आयलाह्यंच्या मी बघिटलो तर सगळ्यांनी बघायचं काय काम ? असं त्याला वाटलं. लेक्चरला गेला, मॅडमांना ह्यो गडी नवाचं वाटायला लागला, मॅडम म्हणटलीत, गेल्यावर्षी कुठ होता ? ह्यो म्हणटला कामं हुती मग हिकडंतिकडं हून विषय मिटला. नविन शैक्षणिक वर्षाचं स्वागत वगैरे झालं. सुट्टीत कोण काय केलं ? कुठं गेलं ? अशा निरर्थक गप्पा झाल्या आणि लेक्चर सुटलं. ह्याच्या डोस्क्यात फक्त तीच हूती. पुढच्या लेक्चरला दांडका लावला आणि काॅलेजभर बोंबलत हिंडला तिच्या शोधात. गावली नही. मग बास म्हणटला आणि काॅलेजातंन बाहेर पडला. गाडीला स्टार्टर मारला गेटजवळ आला, तर तिथं ही त्या दोन पोरींसोबत आणि एकीची भर पडलीती. एक ढोली, एक नरफूडी, आणि एकष्ट्राची एक काळगोळी. अशा त्या चालल्यात्या. आज हि कुठं जात्या बघायचंच म्हणटला आणि गाडी स्लो करून सूरक्षीत विनाशंकास्पद अंतरावरून चालला. काॅलेजला खेटून असलेल्या एका इमारतीत ही गँग चालली. तसं हा फास्ट होवून तिकडं गेला. तर ह्या आत जात होत्या आणि एकटी तिथून बाहेर पडत होती, तिला ह्या सगळ्या कुठं गं ? वगैरे विचारत होत्या. मुलींना असं विचारल्याशिवाय जीव गमतंच नाही. तर ही सगळी आत गेली आणि ही एकटी बाहेर आली. ही लागली वळखीची ! 
ती हिकडं गाडीकडंच यायलती तेवढ्यात ह्या गड्यानं ऊतरून गाडीचं डिग्गी खोलल्याचं नाटक केलं. वठलं. ती म्हणटली काय शोधालायसं ? ह्यो म्हणटला नोटस घेतलोय काय ते बघालतो. 
मग हा तिला विचारला आत्ता कसं काय मधीच आलतीस ? तर ती म्हणटली रिसेस होतं म्हणून आलती. ह्या गड्याला रिसेस म्हणजे काय ते नव्हतं माहिती. तसंच म्हणटला ती ऊंच हाय ती कोण ? मग ही हसली. आणि सांगिटली ह्याह्या गावास्नं आल्या. अशीतशी चांगली वगैरे आहे. हलवलेली कोकची बाटली कसं फसफसत्या तसं याच्या अंगात तिच्याबद्दल ऐकताना झालं. आवरतं घेवून थँक्स म्हणटला आणि घरी गेला. घरी परत विचार तिचाच.
दूसर्या दिवशी परत तिला बघितला. आज लेक्चर सगळी अटेंड केला. 
असं आठपंधरा दिवसं गेली. लवकर काॅलेजला यायला लागला. तेवढ्यात एक खरजूलं पोरगं हुतं ते अंदाकरणं थेरगं हुतं, गुळ लावाय पटाईत ईमोसनल बोलायचा. असं बोलत बोलत. तिचा बड्डे कवा हिचा कवा अशी माहिती काढायचा. मग त्यातंनंच त्या बेण्याची प्रतिमा चांगली झाली पोरींच्या मनात. नंबरं फोनची ह्याला दिली. ह्यो झ्यागिरदार गावातंनंच यायचा. आणि शुद्ध बोलायचा म्हणजे काय पण मागताना इंगलीशमध्ये मागायचा. म्हणजे फूटपट्टीला स्केल वगैरे म्हणायचा. 
ह्याची सटकली. तरीपण हा शांत होता. कायतर करून त्या थेरग्याबरोबर मैत्री केला. त्यो ह्यला पटवून घ्यायचा नही खरं हा त्याला शिस्तात पटवला. त्या थेरग्याला एक खास मित्र होता. पण तो लांब असायचा येडा टाईप मध्ये. थेरगं कायतर करून ढोलीच्या मागं लागलंत. ह्याला बरं वाटलं. मगं ऐकदा त्याला हा सांगितला अशानसं मला ती आवडत्या. वळखी ते करून दे. थेरगं फुल्ल काॅन्फीडन्स मध्ये म्हणटलं भावा राहा तु माझ्याबरोबर फक्त. मग हा त्याच्याबरोबर राहायला लागला. आता हळूहळू हा बदलालता म्हणजे केशभूषा, वेशभूषा. 
कधीतर तिच्याबरोबर नजरानजर व्हायची. याला ती बघिटली की डांगार खाल्यागत तोंड वाकडं करायची. असं होतं म्हणजे कुंडलीत असतं की ते, सुरवातीला पैशाची अडचण आली तरी काळजी करू नये. धनलाभाचा योग आहे. तसं याचं पण झालं. एकदा असंच हा सगळ्यांसोबत मैदानात बसला होता तिथं वाघ पाळायचा विषय निघला. त्यावेळी ती म्हणटली वाघ फक्त हाच पाळू शकतो. मग ह्यला लै भारी वाटलं. गूगला टायगर टाकून वाघाचा फोटोच मोबाईल वालपेप्राला लावला. एव्हाना तीनंच ह्यची जिगर बघून ह्याला नंबर दिला. ह्यला पंचायत जिंकल्याचा फील आला. अशा एकेक आनंददायी घटना घडल्या की हा पोरास्नी पार्टी देतं असे. आन्नदान काय पुण्यदान तसं.
मग ही कधीतर त्यची स्कूटी मागायची. हा पण द्यायचा. ती हुंदडून यायची ह्याला समाधान वाटायचं. मग कधीतर हा चहाला बोलवायचा, कधीतर ती. पण ह्या गड्याचं धाडसंच होईना बोलायचं. 
असेच भारीभारी दिवस चाललेते. तिकडं थेरगं ढोली रमलीती, थेरग्याचा मित्र नाहीनही म्हणत नरफूडीकडंन तिची भाषा शिकालता. हिकडं ह्याचं मेसेजिंग तसेच प्रत्यक्ष भेटीवर जोर वाढलाता. रविवारी सुट्टीत सुद्धा ती गेवाकडं जायची नाही. ह्यांच कायतर प्लॅनिंग ठरलेलं असायचं. 
रात्रीत पण हा तिथून फेरी मारून जायचा. 
एका रात्री असंच रोजच्यासारखं फोन लावला तर कुणी पुरषानं फोन उचलला. आवाज भसाडा आला. कोण बोलतंय ? 
ह्याला भ्या वाटली. फोन कट केला. चटाकन गाडी घेवून नवूसाडेनऊचं तिकडं धावला. रूमच्या पुढं एक टुव्हिलर होती. हा पुढं जावून परत माघारी आला तर ही बॅग घेवून चाललीती पप्पाबरोबर. ह्याच डोक काम देईना झालं. मोबाईल स्विच ऑफ केला आणि त्या गाडीला ओवरटेक मारून गेला. तीनंही पाहिलं असेल. ती एकदाची गेली ते परत आलीच नाही. हा पार मोडून पडला. बरेच महिने गेले सेमिस्टर झालं. आता पोरीच्या नादानं का हुईना सवय लागलीती काॅलेजची. ती सुटत नव्हती. तिच्यासंगतीनं झालेल्या मैत्रीणीनीही ह्याला धीर दिला आणि मित्रांनीपण. मग जानेवारीत एकदा ह्याला कळालं ती आल्या. तसं निम्म्यात काॅलेज टाकून हा त्या दोघांना घेवून गेला. तिथल्याच एका हाटेलात भेट ठरली. मग तिच्या मैत्रीणी हयाचे ते दोन मित्र अशी भेट झाली. हा तिला एका सेप्रेट टेबलजवळ यायला लावला. तीला कॅडबरी दिली. मग तिला हा अगदी फ्रीली सांगाला माझं तुझ्यावर प्रेम होतं आहे राहणारं. ती पण म्हणटली सेम हिअर ! 
जाताजाता त्याच कॅडबरीच्या कागदावर आय लव्ह यु फाॅरेवर असं ती लिवली आणि ह्याला दिली. बैठक मोडली. ह्याला आपन केलेलं काय वाया गेलं नाही याचं बरंच कौतुक वाटलं आणि ती मिळाली नाही याचं दुःख ! 
आजही तिच्या रूमची खिडकी तो बघतो, तिथं कुणीच नसतं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!