योगा .....!!!!

गावात एकदा मराठी शाळेत योगा -प्राणायम ह्या गोष्टी तेजीत असताना एकदा ते पतंजली वाले लोक आले होते. मी सातवीला असेन. माझे सगळे दोस्त लोकांचे असे मत होते की आपन हे केलं की आपन हूशार होईन, अभ्यास चांगला होईल त्यामूळे मी बी रामपारी उठून घरातली समृद्धी प्लॅस्टीकची चटई घेऊन जात असे. अशी चटई घेऊन जाणे पण समृद्धीच लक्षन असे. त्या दगडामातीच्या ठिकाणी आपली चांगली हातरताना मला वाईट वाटत असे, पण हूशार झालो तर पैसे फिटतील असं समजून चटई पसरायची. मग त्यांच स्टेजवरचं सेटींग हूपर्यंत चटयी वर स्वतःला पसरून घ्यायचं. सूरवात झाली की पहीला लूझनींग असायचं म्हातारे कोतारे लोक बी आधीच हलत असताना आणखी हलायचे म्हणजे एखाद्याचं मान हलत असलं तर त्यो बी आणि जरा जोर लावायचा.
बायकापोरींच्या झिंज्या वेण्या पलिकडचीला बडवायच्या कधी कधी.
हसायला लावायचे हॅ हॅ हॅ असं गावातले हसायचे आणि हा हा हा असं ते हसायचे मध्येच कुणाला तर हसताना खाकरायला यायचं. आलेलं मटरेल तसंच त्यो बिचारा आत ढकलायचा.
हात पाय सट्रेटनींग करायला लावायचे. त्यावेळी माझी खाकि चड्डी फाटली होती. म्हणून मी दोन दिवस शाळेलाच गेलो नव्हतो.
मग आलकट पलकट घालून बसायला लावायचे आवदान येवूपतूर हाल व्हायचं. एकहात खांद्यावरनं आणि एक हात मागनं धरायला लावायचे त्यात एकेकाचे शर्ट फाटले होते.
मग ध्यान लावायला लावायचे होऽऽऽऽऽऽ करून वरडायचे सगळे त्यातल्या त्यात चार सुशिक्षीत लोकं ओऽऽऽऽ आणि शेवट म्म्मऽऽऽऽ करायचे बाकिचे सगळे होम पेटवून रिकामे. त्यात अनेक घोळ म्हणजे कोण पहिला ओ करतोय ? मला तर सूर चुकायची लै भ्या वाटत असे.
शेवटच्या दिवशी आयुर्वेदिक चहा होता मी तीन वेगवेगळ्या रांगेत चटईसकट जागा बदलून तीन कप चहा झाडला होता.
मी कायम जर योगा करत राहिलो असतो तर आतापर्यंत इंजनेर झालो असतो असं आमच्या एका पाव्हण्याचं मत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं